>> राजू वेर्णेकर
मध्यपूर्वेतील सीरियात क्रांती होऊन असद परिवाराची पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेली राजवट मोडीत निघाली असून राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर ‘हयात तहरीर अल शाम’चा अध्यक्ष आणि बंडखोरांचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी याच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
‘सीरियन नॅशनल आर्मी’ आणि ‘अहरार अल शाम’ या बंडखोरांच्या संस्थादेखील ‘हयात तहरीर अल शाम’ला (एचटीएस) साथ देत आहेत. सीरियात मार्च 2011 पासून गृहयुद्ध सुरू होते. या युद्धात राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हुकूमशाहीमुळे 3.5 लाखांहून अधिक लोक मारले गेले आणि जवळ जवळ 1.30 कोटी लोक विस्थापित झाले असा आरोप आहे.
बशर अल असद यांचे पिता हफीज अल असद यांनी 1963 मध्ये बाथ पक्षाची स्थापना करून सीरियाचा ताबा घेतला आणि नंतर 1971 ते 2000 पर्यंत सीरियावर हुकमत गाजवली. त्यांच्या नंतर आतापर्यंत बशर अल असद सर्वेसर्वा होते. या काळात नागरिकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून बशर अल असद यांनी आपली जुलुमी राजवट सुरू ठेवली असे म्हटले जाते.
2006 नंतरच्या काही वर्षांत पडलेल्या दुष्काळामध्ये शेतकऱयांचे आणि इतरांचे फार हाल झाले. बेरोजगारी, मानवी हक्कांचे उल्लंघन, भ्रष्टाचार. नागरिकांचा छळ यात सीरिया देश होरपळून निघाला. 2007 मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बशर अल असद फिरून एकवार भरघोस मतांनी निवडून आले, पण त्यांनी दडपशाही सुरूच ठेवली. अबू मोहम्मद अल जोलानी आधी अल कायदाचा कमांडर होता. त्याने 2016 मध्ये अल कायदापासून फारकत घेऊन मध्यपूर्वेत भूमध्य माहासागराजवळ असलेल्या शाम (जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन, इस्रायल, पॅलेस्टाईन यांचा उपप्रदेश) या भागाला स्वतंत्र करण्यासाठी ‘जबात अल नुसरा’ या संघटनेची स्थापना केली. नंतर 2011 मध्ये या संघटनेचे ‘हयात तहरीर अल शाम’ (एचटीएस) असे नामकरण करण्यात आले. एक दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या गृहयुद्धात ‘हयात तहरीर अल शाम’ने वायव्य सीरियाच्या काही भागांचा ताबा 2017 मध्येच मिळविला होता.
रशिया व इराणचा सीरियाला पाठिंबा असला तरी युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देत असलेला इराण सध्या तरी या सत्तापरिवर्तन घडामोडीपासून दूर आहे. मात्र टर्की बंडखोरांना खुले उत्तेजन देत आहे. मधल्या काळात इस्लामिक स्टेट, हिजबुल्लाहसारख्या इतर इस्लामिक कट्टरवादी संघटना बऱ्याच प्रमाणात निष्प्रभ झाल्या होत्या. त्या आता बदलत्या राजकीय परिस्थितीत डोके वर काढण्याची शक्यता आहे. भारत आणि सीरियाचे बऱ्याच वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कश्मीर मुद्दय़ावर सीरिया नेहमीच भारताच्या बाजूने असतो. याशिवाय भारताचे सीरियाबरोबर मोठय़ा प्रमाणात वाणिज्यिक व्यवहार आहेत. दरवर्षी सीरिय़ाकडून भारत 20 ते 30 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढय़ा किमतीचे तेल आयात करतो. याचबरोबर सीरियाच्या तेल उत्खनन ‘ब्लॉक 24’मध्ये भारतीय ओएनजीसी विदेशची 60 टक्के गुंतवणूक आहे. शिवाय औष्णिक ऊर्जा निर्मितीसह सीरियाच्या पायाभूत सेवा देणाऱ्या बऱ्याच प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग आहे. यात तिशरीन औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. 43 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढय़ा गुंतवणुकीने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात भारताची 52 टक्के गुंतवणूक आहे.
याशिवाय 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढय़ा गुंतवणुकीचा हमा आयर्न ऍण्ड स्टील प्लॅन्ट भारतीय कंपनी अपोलो इंटरनॅशनल लिमिटेड आणि सीरियन कंपनी गेकोस्टील यांच्या संयुक्त विद्यमाने 2017 मध्ये उभारण्यात आला. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2010 मध्ये सीरियाला भेट दिली होती, तर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद 2008 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. या परिस्थितीत सीरियात लवकर शांती प्रस्थापित होणे भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.