
>> साधना गोरे
मधुमेहासारखा आजार मागे लागल्याने माणूस साखर जपून खायला लागला खरा, पण सर्व प्रकारच्या अन्नात साखर विविध रूपांत असतेच. मग त्यात फळे, भाज्या, तृणधान्ये, कडधान्ये इ. सर्व प्रकार आले. मुद्दा काय, तर साखरेने जसे माणसाचे सगळे अन्नच व्यापले आहे, तसा किती तरी भाषांना ‘साखर’ या शब्दाच्या सारखेपणाने गोडवा आला आहे.
मराठीतल्या साखरेला इतर भारतीय भाषांमध्ये काय म्हणतात? हिंदी – उर्दू – पंजाबीत ‘शक्कर’, गुजरातीत ‘साकर’, तर सिंधीमध्ये ‘हकुरू’ म्हटले जाते. साखरेला तामीळमध्ये ‘चक्कर’, तेलुगूमध्ये ‘चक्करे’, कानडीत ‘सक्करे’ असे शब्द आहेत. प्राचीन भारतीय भाषांमध्ये साखरेसाठी काय शब्द आहेत? संस्कृतमध्ये ‘शर्करा’, प्राकृत आणि पालीमध्ये ‘सक्करा’ असे शब्द आहेत.
प्राचीन आणि सध्याच्या भारतीय भाषांमध्ये ‘साखर’ या शब्दाच्या उच्चारांत किती साम्य आहे, हे ते शब्द उच्चारून पाहिले की लगेच ध्यानात येते. यावरून मूळ शब्द संस्कृत असावा आणि तो प्राकृत, पाली व इतर भारतीय भाषांमध्ये गेला असावा असे आपल्या क्षणभर मनात येते, पण कृ. पां. कुलकर्णींच्या ‘व्युत्पत्तिकोशा’तून वेगळीच माहिती समोर येते. कुलकर्णी म्हणतात, संस्कृत ‘शर्करा’ किंवा पाली व प्राकृतमधले ‘सक्करा’ हे नंतर आलेले शब्द आहेत. मूळ शब्द मॉन्ख्मेर भाषेतील आहे. त्या भाषेत साखरेचा अर्थ ‘भुकटी’ असा होतो. आश्चर्य म्हणजे संस्कृतमधील ‘शर्करा’ शब्दाचा एक अर्थ साखर आहेच, पण वाळू, रेती, वाळूयुक्त माती असादेखील त्याचा अर्थ आहे. हा अर्थ मॉन्ख्मेर भाषेतील अर्थाशी अधिक जवळचा आहे, पण मॉन्ख्मेर भाषेतील तो मूळ शब्द कोणता हे मात्र कुलकर्णींनी सांगितलेलं नाही.
मात्र ‘व्युत्पत्तिकोशा’च्या प्रस्तावनेत कुलकर्णी म्हणतात, आर्य भारतात येण्यापूर्वी येथे आदिवासी जाती असल्याच पाहिजेत. त्यांचा व आर्य भाषांचा परस्पर निकट संबंध आलाच असला पाहिजे. या आदिवासींची मुख्य भाषा म्हणजे ऑस्ट्रो-आशियायी भाषा. वर उल्लेख केलेली मॉन्ख्मेर ही ऑस्ट्रो-आशियायी कुळातीलच एक भाषा आहे.
इंग्लिशमध्ये गुळाला Jaggery (जॉगरी) असा शब्द आहे. या उच्चारांशी साम्य असणारे उच्चार जर्मन, फ्रेंच इ. युरोपी भाषांमध्येही आहेत. या उच्चारांचं संस्कृत ‘शर्करा’शी थेट साम्य दिसत नाही, पण आपल्याकडील द्राविडी ‘चक्कर’ (तामीळ), ‘चक्करे’ (तेलुगू), ‘सक्करे’ (कानडी) या उच्चारांशी मात्र त्याचा तोंडवळा मिळतो. आणखी एक रोचक माहिती म्हणजे मल्याळीमध्ये गुळाला ‘शर्करा’ म्हटले जाते.
हिंदी आणि उर्दू भाषेत साखरेला ‘चिनी’ आणि ‘मिश्री’ अशीही नावे आहेत. ही नावे देशाच्या नावांवरून पडलेली आहेत. चीनवरून चिनी आणि मिसरवरून मिश्री अशी नावे पडली. या दोन देशांत साखर तयार होई. मिसर हे इजिप्तचे अरबी भाषेतले नाव आहे.
साखर हा पदार्थ गोड असल्याने त्यावरून मराठीत अनेक शब्दप्रयोग रुजले आहेत. सतत गोड गोड बोलणारा माणूस म्हणजे गोडबोल्या, तर आपला हेतू साध्य करण्यासाठी गोड बोलले जाते तेव्हा ‘साखर पेरणं’ हा वाक्प्रयोग केला जातो. नशीबवान माणसाला काहीही कमी पडत नाही या अर्थाने ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ ही म्हण वापरली जाते. तोंडदेखलं गोड बोलून प्रत्यक्षात मात्र कपटकारस्थानं केली जातात तेव्हा ‘हातावर साखर मानेवर कातर’ ही म्हण वापरली जाते.
या सगळ्याचा कळस म्हणावा असा वाक्प्रयोग म्हणजे ‘साखरेची साल काढणं.’ साखरेचा कण तो केवढा! त्याची साल काढायची म्हणजे केवढा तो बारकावा! अर्थात, अतिशय बारकाईने पाहण्याला, अति चिकित्सा करण्याला ‘साखरेची साल काढणं’ म्हणतात. आता आवरतं घेतलेलं बरं, नाहीतर साखरेवरच्या लेखाचीच कुणी साखरेची साल काढायचं!
- साखर शब्द मूळचा संस्कृत, प्राकृत, द्राविडी किंवा मॉन्ख्मेर यांपैकी कोणत्याही भाषेतला असो, तो जगातल्या अनेक भाषांत पोहोचला. तो कसा? तर अर्थातच साखरेच्या निर्यातीबरोबर. ऊस हे उष्ण कटिबंधातले म्हणजे दक्षिण, आग्नेय आशियातले पीक. अर्थात उसाच्या साखरेची आणि गुळाची निर्मितीही याच भागात झाली. लॅटिन भाषेत साखरेला Saccharum, तर ग्रीकमध्ये चक्क ‘साखारो’ असा शब्द आहे. इंग्लिशमध्ये ‘शुगर’, ‘सैक्रीन’ अशी रूपे आहेत. जर्मनमध्ये Zucker आणि फ्रेंचमध्ये एल्मी म्हटले जाते. अरबीत ‘सुक्कर’, तर फारसीत ‘शकर’ असे शब्द आहेत. या शब्दांच्या उच्चारांत केवढं तरी साम्य दिसतं.