
>> तुषार प्रीती देशमुख
नवऱ्याची नोकरी गेली म्हणून न खचता, न लाजता, कोणाचीही पर्वा न करता व नकारात्मक टोमणे ऐकत व्यवसायात मोलाची साथ देणाऱया तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे स्त्री उभी असते. पण माझ्या यशामागे माझा नवरा खंबीरपणे उभा आहे, असे अभिमानाने सांगणाऱया सुषमा भिसे व सुभाष भिसे यांची ही रुचकर केमिस्ट्री.
सुषमाताईंचे पती सुभाष भिसे हे ज्या कंपनीमध्ये कामाला होते ती कंपनी अचानक बंद पडली. पुढे काय करायचे, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून तिच्यासमोर तो मांडला. सुषमाताईंने घरगुती जेवणाचा व्यवसाय सुरू करण्याचे सुचवले व सुभाषदादांनी त्वरित त्याला होकार दिला. मग दोघा नवराबायकोने मिळून व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
सुषमाताईंच्या आई आशालता देसाई यांना अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद होता. त्या उत्तम सुगरण होत्या. आईने मुलीला आशीर्वादरुपी हाच सुगरणीचा वसा तिच्या पदरात घातला होता. व्यवसाय कोणताही असो, कितीही छोटा-मोठा असो, पण त्यात येणाऱया अडीअडचणी व आव्हाने ही तितकीच गंभीर असतात. तशीच आव्हाने या दोघांना त्यांच्या व्यवसायातही अनुभवायला मिळाली. घरगुती जेवणाचा व्यवसाय करायचे ठरवल्यावर अनेकांच्या डब्यांची
ऑर्डरदेखील मिळाल्या. त्यामुळे त्यांना कधीच त्यांचा व्यवसाय प्रोमोट करावा लागला नाही. डब्यामधला पदार्थ खाणारी व्यक्ती तृप्त होऊन अनेकांना त्या पदार्थांच्या चवीचे वर्णन करायची व त्यांच्याकडूनच डबा मागवण्याचे सुचवायची.
बघता बघता काही महिन्यांतच एक-दोन डब्यांवरून जास्त डब्यांची मागणी येऊ लागली. त्यातच दादर येथील गणेश पेठ लेन, वीरा विहार येथे राहत असल्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले `शिवाजी मंदिर’ नाटय़गृह. तिथल्या काहींनी त्यांचा डबा मागवल्यामुळे व त्याची चव त्यांना आवडल्यामुळे शिवाजी मंदिरमध्ये चालणाऱया नाटकांच्या तालमी दरम्यान कलाकार व टीमसाठी लागणारे जेवण त्यांच्याकडून मागवण्यात येऊ लागले. कलाकारांच्या धावपळीच्या व्यस्त जीवनात त्यांच्या जेवणाच्या वेळा या कधीच निश्चित नसतात. त्यामुळे त्यांना मिळालेला नाश्ता असो वा जेवण, ते उत्तम दर्जाचे असेल तरच त्यांना पोटभर खाऊन त्याचा आनंद घेता येतो. तसेच त्यांची तब्येत सुदृढही राहते. यामुळेच त्यांना पुन्हा जेवणाची ऑर्डर दिली गेली.
पहिल्या ऑर्डरपासून चवीतले सातत्य, पदार्थांसाठी वापरलेल्या जिन्नसांचा उत्कृष्ट दर्जा, अत्यंत महत्त्वाचे म्हणजे खायचा सोडा न वापरता केलेला भात व इतर स्वयंपाक, कोणत्याही प्रकारचा हानिकारक रंग न वापरता घरगुती तयार केलेल्या मसाल्यांपासून सुषमाताई जेवण बनवायच्या. जेवणासाठी लागणारे सर्व जिन्नस, भाज्या व मासे सुभाषदादा स्वत जाऊन आणायचे. त्यामुळे जेवणात वापरलेले सर्व सामान हे पारखलेले असायचे. आयत्या वेळी एखादी गोष्ट कमी पडलीच की ताबडतो ते स्वत मार्केट गाठायचे. भल्यामोठय़ा पिशव्यांमध्ये जेवणाचे डबे भरून सगळ्यांना घरपोच करण्याचे कामदेखील सुभाषदादाच करायचे. सुषमाताईंना त्यांच्या आईकडून मिळालेला स्वयंपाकाचा वसा हा त्यांची मुलगी चैताली हिलादेखील लाभला आहे. लहानपणापासूनच चैताली आईला पोळ्या/चपात्या करण्यासाठी मदत करायची. व्यवसायाची जसजशी व्याप्ती वाढत गेली तसे त्यांना दिवसाला 400 पोळ्या लागायच्या. शिवाजी मंदिर नाटय़गृहामध्ये नाष्टा, जेवणाची ऑर्डर संचित नाईक यांच्यामुळे सुषमाताईंना मिळू लागली. त्यानंतर `सुयोग’चे सुधीर भट यांच्याकडून त्यांना अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. कधी कधी रात्रीचे नाटक संपायला खूप उशीर व्हायचा. नाटय़गृहाच्या बाहेर सुभाषदादा एका टेबलवर सगळे जेवणाचे डबे ठेवून सर्व कलाकारांना व टीमला स्वत जेवण वाढायचे. मोहन वाघ व लता नार्वेकर यांच्याकडूनही त्यांना खूप ऑर्डर्स यायच्या. अनेक कलाकार प्रामुख्याने श्रीराम लागू, अशोक सराफ अशा दिग्गजांनी त्यांच्या जेवणाचे कौतुक केले आहे.
दोन्ही मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव टिकवले. दुबईमधील पंचतारांकित हॉटेलमधले एक्झिक्युटिव्ह शेफ असलेल्या गुरुदास गुप्ते यांच्याशी चैतालीचे लग्न झाले. गुरुदास जेव्हा कधी भारतात सासू-सासऱयांच्या घरी यायचा तेव्हा तो त्यांचा जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून त्यांच्या व्यवसायात मदत करायचा. कालांतराने सुशांतलादेखील चांगली नोकरी लागली, तेव्हा चैताली-गुरुदास व सुशांतने सुषमाताई व सुभाषदादांना व्यवसायातून रिटायरमेंट घेण्यासाठी आग्रह धरला. आपले आई-वडील कधीच कुठे फिरायला गेले नाहीत, ना कधी कोणता सणवार साजरा करू शकले याची खंत त्या दोघांनाही होती. त्यानंतरही त्या दोघांनी एक-दोन वर्षं व्यवसाय सुरू ठेवला आणि मुलांचा मान राखण्यासाठी व्यवसायातून रिटायरमेंट घेतली.
आजही अनेक जण सुभाषदादांना फोन करून जेवणाची ऑर्डर घेऊ शकाल का याची चौकशी करतात हेच त्यांच्या 25 वर्षांच्या व्यवसायाचे यश आहे. आज जरी दोघेही व्यवसायातून रिटायर झाले असले तरी त्यांची नातवंडं आदिती व श्रीयांशसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालत असतात. अशी ही सुषमाताई व सुभाषदादांची आंबट-गोड-तिखट जीवनाची प्रेमळ केमिस्ट्री! या दोघांच्या जीवनातील व्यवसायाच्या संघर्षातून एक मात्र शिकण्यासारखे आहे – कितीही झाले तरी कुणाचीही पर्वा न करता आपल्या कुटुंबासाठी आपण घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून यशस्वी व्हायचेच.
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)