उमेद – आदिवासींची‘प्रगती’साधणारे प्रतिष्ठान!

>> सुरेश चव्हाण

जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम भागांतील आदिवासींच्या पुढील पिढ्य़ांचं भविष्य 1972 पासून सुनंदाताई आणि वसंतराव पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून घडत आहे. आदिवासींच्या मूक-बधिर मुलांची दिशाहीनता, हतबलता जाणून 1985 पासून खास अशा मुलांचे जगणे सुलभ करण्यासह त्यांना रोजगारनिर्मितीचे विशेष प्रशिक्षण देणारी निवासी शाळा ही प्रतिष्ठानची समाजाप्रतिची सजगता दर्शवते. शिक्षण आणि आरोग्य याव्यतिरिक्त प्रतिष्ठानने या दुर्गम भागाच्या पायाभूत विकासातही मोठी कामगिरी केली आहे.

‘प्रगती प्रतिष्ठान’ची स्थापना वसंतराव पटवर्धन यांनी 1972 साली ठाण्यात केली. जव्हार, मोखाडा या आदिवासी भागांत फिरत असताना आदिवासी बंधू-भगिनींना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासाठी काहीतरी केले पाहिजे. यातून ‘प्रगती प्रतिष्ठान’ने मोखाडय़ातील आदिवासी भागातील मुलांच्या 1979 साली शिक्षणासाठी एक वसतिगृह सुरू केले. या मुलांना शिक्षणासाठी एकाच ठिकाणी सुरक्षित जागा मिळाली. आतापर्यंत 700 हून अधिक विद्यार्थी या वसतिगृहातून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यातील काहींनी उच्च शिक्षण घेऊन ते आता नोकरी, व्यवसाय करत आहेत.

प्रतिष्ठानने 1985 झाली जव्हार येथे मूक-बधिर मुलांसाठी एक विशेष निवासी शाळा सुरू केली. अशा मुलांना विशेष शिक्षण देऊन स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न प्रतिष्ठानमध्ये केला जातो. आतापर्यंत 400 हून अधिक मुलांना याचा लाभ मिळाला आहे. आजही 73 विद्यार्थी या निवासी शाळेत शिकत आहेत. मी जेव्हा या शाळेला भेट दिली, त्या वेळेस येथील मुले दिवाळीसाठी कंदील बनवत होती. त्याचबरोबर दिवाळी भेटकार्ड, वारली चित्रकला, विणकाम, शिलाई मशीनवरील शिवणकामातून वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या, पर्सेस तसेच बांबूपासून विविध वस्तू बनवतात. या कामांचा त्यांना मोबदलाही दिला जातो. ज्यातून ही मुलं आपल्या घराला हातभार लावतात. प्रतिष्ठानने आदिवासींच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचे आणि त्यांना आधुनिक आव्हानांची जुळवून घेण्यास मदत केली आहे. 1993 मध्ये स्थापन झालेले ‘वारली हस्तकला केंद्र’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. या केंद्रात शंभरहून अधिक युवा कलाकार व अपंग विद्यार्थ्यांना पारंपरिक कला आणि हस्तकलेचे प्रशिक्षण दिले आहे. ज्यामुळे त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींना परदेशातील बाजारपेठेतही स्थान मिळाले आहे.

शिक्षण आणि आरोग्य याव्यतिरिक्त प्रतिष्ठानने या दुर्गम भागाच्या पायाभूत विकासातही मोठी कामगिरी केली आहे. आदिवासी महिलांना पाण्यासाठी खूप दूरवर डोंगर-दऱयांतून जावे लागत होते, परंतु आता संस्थेच्या प्रयत्नांमुळे दीडशेपेक्षा जास्त पाडय़ांवर नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. संस्थेने आदिवासींचे होणारे स्थलांतर आणि बेरोजगारी समस्यांवरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. 2003 पासून सिमेंटचे बंधारे, जाळीचे बंधारे आणि शेततळ्यांच्या बांधकामामुळे वर्षभर आदिवासी बांधव आता शेती व भाजीपाला अशी पिके घेत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रगती प्रतिष्ठानच्या ‘सौर मायक्रो ग्रीड‘च्या माध्यमातून वीजपुरवठा केल्यामुळे 26 गावे प्रकाशमान झाली आहेत. हे सर्व करण्यामागे वसंतराव पटवर्धन यांच्या बरोबरीने व त्यांच्या नंतर सुनंदाताई पटवर्धन यांचा मोलाचा वाटा आहे. कौशल्य विकास प्रकल्प, स्वयंरोजगार उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी संस्थेमार्फत बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच संगणक कोर्स, महिलांसाठी शिवणकाम, वारली चित्रकला अशा विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते.

जव्हार, मोखाडा या दुर्गम भागांत फक्त पावसाळी शेती होत होती. या शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून ग्रामस्थ मोलमजुरीसाठी स्थलांतरित होत होते. हे स्थलांतर थांबावे व गावातच शेतीतून उत्पन्न मिळावे या उद्देशाने स्थानिक संसाधनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबक सिंचन योजनेमुळे संस्थेने चार वर्षांपूर्वी मोखाडा तालुक्यात तुळ्याचा पाडा, केळीचा पाडा व भाये पाडा या गावांत भुईमूग लागवड प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात एकूण 108 शेतकरी आपल्या जागेत प्रत्येकी अर्धा एकरावर भुईमूग लागवड करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून शेतकऱयांना भुईमुगाचे चांगले उत्पन्न मिळत आहे. पॅनासॉनिक कंपनीच्या सहकार्याने सौर पंपाच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे जव्हारमधील सोनगिरी पाडा, वझेर पाडा आणि घाटाळ पाडा या तीन पाडय़ांत गेल्या पाच वर्षांपासून भाजीपाल्याची लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून आदिवासींच्या हातात भाजी विकून चार पैसे येत आहेत. तसेच या पाण्याचा उपयोग शेतीबरोबर गुरांना पाणी पिण्यासाठी होत आहे. ज्या ठिकाणी जलस्त्राsत उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी सिमेंटचे बांधारे बांधून बारमाही शेतीकरिता पाण्याची उपलब्धता निर्माण केली आहे. तेथील शेतकऱयांचा बचत गट तयार करून शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱयांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे या भागातील मजुरीसाठी होणारे स्थलांतर कमी होत आहे.

वारली आदिवासींच्या आयुष्यात वसंतराव व सुनंदाताई पटवर्धन यांनी जे परिवर्तन घडवले आहे, आज ते सन्मानाने जगत आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, यासाठी सुनंदाताईंना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. सुनंदाताईंनंतर त्यांचे सुपुत्र श्रीराम पटवर्धन यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले आहे.

[email protected]