वेब न्यूज – मोसाद ते रॉ

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात कट्टरतावादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह हा ठार झाला आणि इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद पुन्हा एकदा चर्चेत आली. जगातील एक अत्यंत धोकादायक संघटना म्हणून मोसादची ओळख आहे. 13 डिसेंबर 1949 रोजी पंतप्रधान डेव्हिड गुरियन यांनी या संघटनेची स्थापना केली होती. आजच्या घडीला मोसादचे वार्षिक बजेट 2.73 अब्ज डॉलर्स अर्थात 22,810 कोटी रुपये इतके आहे. एका अंदाजानुसार जवळपास 7000 लोक मोसादसाठी जगभरात कार्यरत आहेत. मोसादच्या तोडीच्या म्हणून इतर अनेक गुप्तचर संघटना या निमित्ताने चर्चेत आलेल्या आहेत. यामध्ये अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA), युनायटेड किंगडमची MI6, रशियाची FSB आणि हिंदुस्थानची रॉ (RAW) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अमेरिकेची ‘फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CIA ची स्थापना 1947 साली करण्यात आली. परदेशात हेरगिरी करणे आणि परदेशातून आलेल्या गुप्तचरांचा बीमोड करणे हा तिचा प्रमुख उद्देश. कबुतरांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध गोष्टींचा वापर हेरगिरीसाठी करणे हे CIA चे वैशिष्ट्य. हिटलरच्या पराभवात मोठी भूमिका बजावणारी संस्था असा यूकेच्या MI6 या गुप्तचर संघटनेचा लौकिक आहे. दहशतवादाचा प्रतिकार करणे, देशात व देशाबाहेर हेरगिरी अशी प्रमुख कामे ही संस्था करते. ही संस्था इतक्या गुप्तपणे कार्य करते की, तिच्याबद्दल फार थोडी माहिती आजवर समोर आली आहे.

1995 साली स्थापन झालेली रशियाची FSB आणि 1968 साली स्थापन झालेली हिंदुस्थानची RAW या दोन्ही संघटनादेखील दहशतवादाचा बीमोड, देशाच्या सीमांचे रक्षण करणे, सायबर हल्ल्यापासून बचाव अशा महत्त्वाच्या कार्यात सहभाग घेतात. 1971 साली झालेल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात RAW ने नेत्रदीपक कामगिरी केली होती. ही संघटना पाकिस्तानमध्ये केलेल्या अनेक कामांमुळे आणि तिच्या अफलातून कर्तृत्वामुळे जगभरात एक धोकादायक संघटना म्हणून ओळखली जायला लागली. RAW च्या एजंटांनी पार पाडलेल्या अनेक रोमहर्षक मोहिमा कायम चर्चेत राहिलेल्या आहेत.

स्पायडरमॅन