>> वैश्विक, [email protected]
आपल्या सूर्याला जवळचा तारा आपण मानतो तो प्रॉक्झिमा सेन्टॉरी किंवा ‘मित्र’ तारा. परंतु त्यापेक्षाही जवळचा एखादा तारा किंवा सूर्याचा ‘जुळा भाऊ’ आहे का, याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. अवकाशात घडणाऱ्या गोष्टी किंवा त्यामुळे पृथ्वीवर होणाऱया घडामोडी म्हणजे धूमकेतू, अशनी पृथ्वीवर धडकणे वगैरे याचा मागोवा घेताना याला ‘जबाबदार’ कोण? तर बहुतेक ‘नेमिसिस’ असं अनेक अभ्यासकांना वाटू लागलं. ही समजूत फार पूर्वी नव्हे तर अगदी अलीकडे म्हणजे 1984 मध्ये निर्माण झाली. सूर्यापासून 95 हजार ‘एयू’ म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतराच्या 95 हजार पट दूर असलेला आणि 1.5 प्रकाशवर्षे अंतरावरचा, धूमकेतूंच्या ‘उर्ट क्लाऊड’च्या पलीकडचा हा रक्तवर्णी किंवा तपकिरी खुजा तारा सूर्याचा ‘साथी’ आहे असं म्हटलं गेलं. हे कशावरून तर पृथ्वीच्या इतिहासात दर 26 दशलक्ष वर्षांनी होणारे उत्पात या नेमिसिसच्या (किंवा नेमेसिस) प्रभावाने होतात असा एक कयास केला गेला. 2017 मध्ये सारा सेडेवॉय आणि स्टेहलर यांनी एका शोधनिबंधात म्हटलं की, आपला सूर्य हा द्वैती ताऱ्यांपैकी एक आहे म्हणजे त्याला ‘जुळा भाऊ’ आहे. मात्र सूर्य जन्माच्या वेळी किंवा पाच अब्ज वर्षांपूर्वी ‘जुळा’ असलेला हा ‘भाऊ’ कालांतराने दुरावला. ही ‘भाऊबंदकी’ सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वीच झाली असावी. याचा अर्थ सूर्याचा हा जोडतारा त्याच्याबरोबर एकच अब्ज वर्ष होता. त्यामुळे गेल्या काही कोटी वर्षांत पृथ्वीवर झालेल्या अवकाशी उत्पातांबद्दल त्याला जबाबदार धरता येणार नाही. त्यानंतरच्या मतांप्रमाणे दीर्घिकेचं गुरुत्वीय प्रतल सौरमालेच्या दूरस्थ प्रतलावर परिणाम करतं. त्यामुळे सौरमालेच्या प्रतलात काही चलबिचल होत असावी. त्याचा परिणाम म्हणून भरकटलेले अशनी (महाभाषाण) किंवा धूमकेतू पृथ्वीसह इतर ग्रहांना धडक देत असावेत. आता या ‘प्रतलां’चं गणित क्लिष्ट होईल, पण एपूणच विश्वाचा आपण छोटासा भाग असल्याने आपल्या आकाशगंगा दीर्घिकेमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या सौरमालेवर आणि आपल्या एकमेव प्रगत ग्रहावर पडणं साहजिक आहे. 1984 मध्ये मात्र डेव्हिड रॉक आणि जॅक सेक्सोस्की यांनी पृथ्वीवरच्या 25 कोटी वर्षांमधल्या ‘प्रलयां’चा कालांतर शोधण्याचा दावा केला. आतापर्यंत असे ‘प्रलय’ (संपूर्ण नष्टता) सुमारे 12 वेळा घडले असून त्यांचा कालावधी सुमारे अडीच कोटी वर्षांच्या अंतराने येतो. त्यानंतर अल्बर्ट जॅक्सन, मार्क डेव्हिस, पायेट हट तसेच रिचर्ड म्युलर यांनी असाच शोधनिबंध मांडून या ‘प्रलया’च्या कालक्रमाला पुष्टी दिली. त्यामधून आपल्या सूर्याला अज्ञात जोडतारा किंवा जुळाभाऊ असावा असं म्हटलं. तो अतिलंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती (किंवा सूर्यासह) फिरत असून तोच ‘उर्ट क्लाऊड’मधल्या धूमकेतूंना विचलित करतो. त्यामुळे ते ‘उर्ट’च्या ढगातून निसटून सूर्याकडे झेपावतात आणि काही शूमेकर – लेव्ही- 9 या धूमकेतूसारखे ‘गुरू’ ग्रहावर आढळताना दिसतात. ‘एवंगुणविशिष्ट नेमिसिस’ खरोखरच अस्तित्वात असला तरी त्याचा निश्चित ठावठिकाणा नाही. मग तो ‘काल्पनिक’ आहे का? तर तसंही नाही. अनेकांच्या अभ्यासाचे निष्कर्ष त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देतात तरीही ‘तो’ सापडत का नाही. म्युलर यांच्या मते तो लालखुजा ग्रह असून त्याची दृश्य तेजस्विता 7 ते 12 इतकी अंधूक आहे. (व्याध ताऱयाची त्यावरून इतर ताऱ्यांची कमी-जास्त दृश्य प्रत ठरवली जाते.) मात्र 9 प्रतीचा बर्नार्ड तारा जर 1916 मध्ये सापडला, तर नेमिसिस आढळायला काय हरकत आहे? पण आजतागायत त्याचं ठोस उत्तर गवसलेलं नाही. 2012 पासून सुमारे 1800 लाल किंवा तपकिरी खुजा ताऱ्यांची नोंद झाली आहे. कारण असंही मानलं जातं की, विश्वनिर्मितीच्या काळात तारे समूहाने (क्लस्टर) पिंवा सहकाऱ्याबरोबर (द्वैती) दिसत. काळाच्या अब्जावधी वर्षांच्या ओघात ही ‘एकत्र कुटुंब’ विभक्त होत काही साथी तारे आजही एकमेकाला सांभाळून असतात त्यांना जोडतारे म्हणतात. मृग नक्षत्रातील ‘राजन्य’ (रिगेल) हा जोडतारा आहे. इतर मात्र आपल्या सूर्यासारखे एकाकी (किंवा नेमिसिससारख्या ताऱयांच्या जत्रेत हरवलेल्या जुळ्या अज्ञात भावासारखे) असतात. परंतु आता ‘जेम्स वेब’सारख्या प्रभावशाली अवकाश दुर्बिणी दूरस्थ अवकाशाचा यशस्वी वेध घेतायत. त्यांना ‘नेमिसिस’ का दिसत नाही हा एक प्रश्नच आहे. ‘इन्फ्रारेड’ किरणांद्वारे सौरमालेच्या जवळपासचं बरंच अवकाश पिंजून काढलंय. त्यातून 150 अंश केल्विन किंवा सेल्सिअस तापमानाचे तारे शोधता येत असतील आणि 10 प्रकाशवर्षे दूरच्या ताऱयांचाही मागोवा घेता येत असेल तर तुलनेने सूर्याला खूप जवळचा मानला जाणारा नेमिसिस पुठे लपलाय? विज्ञानातही असे अनेक पूट-गूढ (एनिग्मॅटिक) कोडी असतात. त्यांचं सर्वमान्य उत्तर निश्चित पुराव्यासह सापडत नाही. तोपर्यंत नुसत्या कल्पनाविलासाचा (गेसवर्प) स्वीकार होत नाही. विज्ञान म्हणजे काल्पनिक कथा-कादंबरी नव्हे. विज्ञान कथांमध्ये काल्पनिक विज्ञान आणता येतं, पण खऱया विज्ञानाचं कथानक प्रतिभेपेक्षा पुराव्यावर आधारित असतं. ‘नेमिसिस’ असेल नसेल त्याचा शोध सुरूच राहील. कदाचित त्यातूनही काही नवनवल गवसेल! विज्ञानाची रंजकता त्यातच आहे.