आभाळमाया – दोन दीर्घिकांची होते अंतराळी भेट…

>> वैश्विक, [email protected]

शीर्षक जरा लांबलचक झालं खरं, पण ‘गदिमां’नी लिहिलेल्या ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट’ या चालीवर ते सुचलं आणि लक्षात आलं की, ओंडक्यांप्रमाणे दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने या दीर्घिका क्षणात विलग होणाऱया नाहीत, तर परस्परांमध्ये विलीनच होणार आहेत. त्यांचं ‘मर्जर’ किंवा मिलन सुमारे साडेचार अब्ज वर्षांनी घडणार आहे.

कुठल्या आहेत या दोन दीर्घिका किंवा गॅलॅक्सी… आपला-त्यांचा काय संबंध… तसं पाहिलं तर विश्वातील प्रत्येक गोष्टीशी आपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येतोच. त्यातून ‘त्या’ दोन दीर्घिकांमधली एक आपलीच आकाशगंगा किंवा ‘मिल्की-वे’ आणि दुसरी आपल्या ‘शेजारची देवयानी किंवा ऍन्ड्रोमिडा’. एडवीन हबल यांच्या तत्त्वानुसार विश्वातील परस्परांपासून दूर जाणाऱया वस्तूंचा ‘रेड शिफ्ट’ तर जवळ येणाऱयांचा ‘ब्लू-शिफ्ट’ असतो. स्पेक्ट्रम किंवा वर्णपटातील रंगांवरून ही मांडणी केली आहे.

आपलं विश्व प्रसरणशील आहे हे मान्य झालंय. त्यामुळे विश्वातल्या अनेक ट्रिलियन (एकावर बारा शून्य) दीर्घिका परस्परांपासून दूर जातायत. मात्र यामध्येच काही स्थानिक दीर्घिकांच्या जवळ येण्याची प्रक्रियासुद्धा अंतर्भूत आहे. त्यामुळेच आपल्यापासून ‘फक्त’ 22 ते 25 लाख प्रकाशवर्षे अंतरावर असलेली देवयानी किंवा ‘ऍन्ड्रोमिडा’ दीर्घिका आणि आपली आकाशगंगा ऊर्फ ‘मिल्की-वे’ यांची ‘गळाभेट’ होणारच आहे… कारण या दोन दीर्घिकांना ‘ब्लू-शिफ्ट’ निगमजवळ आणतोय.
या दोन्ही दीर्घिका सर्पिलाकृती किंवा स्पायरल पद्धतीच्या आहेत. आपल्या दीर्घिकेला अगदी जवळच्या छोटय़ा दोन दीर्घिका म्हणजे लार्ज आणि स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउड. त्यांच्याविषयी नंतर सविस्तर जाणून घेऊ. जवळची मोठी दीर्घिका देवयानीच. आता ‘जवळ’ म्हणजे प्रकाशाच्या, सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगाने 25 लाख वर्ष प्रवास केल्यावर पोचता येईल ‘इतकी’ जवळ! वैश्विक अंतरांच्या विराटतेमध्ये हे अंतर काहीच नाही. त्यामुळेच देवयानी किंवा ऍन्ड्रोमिडा आपल्या आकाशगंगेची सख्खी ‘मैत्रीण’ आहे. सध्या सेकंदाला 110 किलोमीटर वेगाने ऍन्ड्रोमिडा आपल्या गॅलॅक्सीला भेटायला धाव घेत असून या वेगानेही सुमारे साडेचार अब्ज वर्षांनंतर ‘गळाभेट’ शक्य आहे.

ही महाभेट (किंवा टक्कर) अंतराळात होईल तेव्हा नेमकं काय घडेल? कारण आपली सूर्यमालाही आकाशगंगेचा एक भाग आहेच. तेव्हा आपल्या सूर्यासह सर्व ग्रहमालेची आणि पृथ्वीवरच्या सजीवांची परिस्थिती तेव्हा काय होईल?

देवयानी आणि आकाशगंगा या ‘लोकल ग्रुप’ किंवा 40 स्थानिक दीर्घिकांमधल्या आहेत. या सर्व दीर्घिका एकमेकींशी गुरुत्वाकर्षणाने बांधलेल्या असून वर्गी किंवा ‘कन्या’ या महातारकागुच्छाचा (सुपर क्लस्टरचा) भाग आहेत. पुन्हा सारा ‘गट’ आणखी मोठय़ा सुपर-सुपर क्लस्टरच्या अंतर्गत येतो.

देवयानी किंवा ऍन्ड्रोमिडा गॅलेक्सी निरभ्र अंधाऱया रात्री आपण नुसत्या डोळय़ांनीही पाहू शकतो. आकाशदर्शनाच थोडा सराव मात्र करायला हवा. या दीर्घिकेच्या जवळच आणखीही एक दीर्घिका दिसते. दुर्बिणीतून ऍन्ड्रोमिडा पाहाणं ‘विज्ञान’ आणि ‘रंजन’ या दोन्ही प्रकारे छान वाटतं. या दीर्घिकेची लांबी (व्यास) 2 लाख 60 हजार प्रकाशवर्षे असून त्यात किमान 1 ट्रिलियन (1000000000000) तारे आहेत. आपल्या आकशगंगा किंवा ‘मिल्की-वे’चा विस्तार 1 लाख प्रकाशवर्षे असून त्यात 300 अब्ज तारे आहेत. या दीर्घिकेच्या केंद्रापासून आपली सूर्यमाला 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर (म्हणजे तुलनेने ‘जवळ’) आहे.

जेव्हा या दोन दीर्घिकांचा मिलाफ, टक्कर वगैरे होईल तेव्हा त्या एकमेकीत मिसळून जातील. ही ‘भेट’ घडण्यापूर्वी त्या जवळ येऊन पुन्हा किंचित दूर सरकतील आणि नंतर दोन्ही दीर्घिकांमधल्या ताऱयांसह जास्त वस्तुमानाची महादीर्घिका तयार होईल. या टकरीत काही तारे परस्परांवर आदळून नाश पावतील. काही ग्रहांची तीच गत होईल. पण बहुतेक तारे या टकरीतून बचावतील. याचं कारण म्हणजे (किंवा दीर्घिकेतल्या दोन ताऱयांची अंतरंसुद्धा प्रचंड आहेत. आपल्या जवळचा असला प्रॉक्झिमा सेन्टॉरी तारा (मित्र तारा) आपल्यापासून साडेचार प्रकाशवर्षे अंतरावर आहे… आणि एक प्रकाशवर्षे म्हणजे 9460 अब्ज किलोमीटर. हे लक्षात घेतलं तर ताऱयांमधल्या अंतरांची कल्पना येईल.

अर्थात या सगळय़ा 4 अब्ज वर्षांनी घडणाऱया घटना आहेत. तोपर्यंत बहुदा सूर्याचं लाल महाताऱयात रुपांतर व्हायला लागलेलं असेल आणि सर्व ग्रहांसह सूर्यमाला ‘मृत्युपंथा’ला लागेल. सूर्य 5 अब्ज वर्षांनी त्याचं धगधगणं थांबवणार. त्यापूर्वी पृथ्वी आणि अगदी मंगळावर वस्ती केली तर तीसुद्धा या ‘रेडजायंट’ ताऱयाच्या तप्त ‘कोपा’तून वाचणार नाही. हे सारं अनुभवायचं तर पृथ्वीवरच्या सर्व सजीवांसह माणसाने टिकून राहाणं आवश्यक आहे आणि नेमकं तेवढंच आपल्याला समजत नाहीये!