विज्ञान-रंजन – ध्वनीपाषाण!

जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही काही मित्र, खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने दक्षिण हिंदुस्थानात गेलो होतो. त्या वेळी तो अद्वितीय नैसर्गिक सोहळा पाहिल्यानंतर पुढचे पंधरा दिवस कर्नाटक, आंध्र, तेलंगण, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा केला. या काळात तिथली अनेक वैशिष्टय़पूर्ण मंदिरं आणि त्यातील अप्रतिम शिल्पकला पाहिली. त्या वेळी आमच्याकडे प्रभावी कॅमेरे नव्हते आणि अनेक ठिकाणी छायाचित्रण करूही देत नव्हते. त्यामुळे तिथल्या अनेक विस्मयशिल्पांचे फोटो घेता आले नाहीत. तामीळनाडूच्या बृहदेश्वर मंदिरात तर तंजावूरच्या राजांनी नोंदलेला मराठी शिलालेख आहे.

…तर फिरता फिरता आम्ही कन्याकुमारीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शुचिंद्रम मंदिरात गेलो. तिथे हनुमानाची दहा-बारा फुटांची भव्य मूर्ती तर आहेच, पण विशेष म्हणजे तिथे मधुर ध्वनी निर्माण करणारे दगडी खांबही आहेत. ते विशिष्ट पद्धतीने वाजवून तिथल्या जाणकाराने आम्हाला पाषाणातून उमटलेली ‘सरगम’ ऐकवली.

वाद्यं ही बहुदा तंतू, वायू किंवा चामड्याचा वापर करून ध्वनी निर्माण करणारी असतात. मात्र ‘घट्टम’सारख्या वाद्यात माठासारख्या मातीचा कुंभ वापरला जातो. अनेक दक्षिणी नृत्यगायनाचा तो महत्त्वाचा भाग असतो. तरी मातीचे कण तसे खूप ‘घन’ नसतात. त्यातून ध्वनी निर्माण करणंही अवघडच, पण ‘घट्टम’च्या आतील पोकळी आणि ताल साधण्याची कला यातून ‘रझोनन्स’च्या किंवा ‘संस्पंदना’च्या तत्त्वावर ध्वनिनिर्मिती होत असते.

लाकूडही तसं ‘पोरस’ किंवा अतिसूक्ष्म छिंद्र असलेलं असल्याने टेबलावरही ताल धरता येतो. टेबलाच्या फळीला कान लावून एका हाताने बाजूला ताल धरलात तर वेगळाच ध्वनी कस्प ऐकू येतो. याचे ‘प्रयोग’ आम्ही शाळेतही करायचो. (नि छड्या खायचो) काही वेळा असा आवाज ग्रॅनाईटमधूनही आल्याचं कोणी अनुभवलं असेल, परंतु भक्कम पाषाण स्तभांमधून विविध प्रकारचा ध्वनी ही तेव्हा चकित करणारी गोष्ट वाटली.

त्यानंतरच्या काळात देशातील अनेक मंदिर-शिल्पांमध्ये अशा ध्वनीपाषाणांचा वापर केल्याची माहिती मिळत गेली. आता तर यू टय़ूबवर अनेकांनी वाजणाऱ्या स्तंभांच्या चित्रफितीही टाकलेल्या आढळतील. दक्षिणी मंदिरातील, कर्नाटकात हम्पी येथे असलेल्या मंदिर संपुलांमध्ये अशी अनेक विस्मयशिल्पे आणि ध्वनीस्तंभ आहेत. महेश नाईक यांनी अशा कित्येक मंदिरांचा अभ्यास केला असून त्यांनीच घेतलेला सुरेल ध्वनी-पायऱ्याचा फोटो या लेखासोबत आहे. तो कुंभकोणच्या ऐरावतेश्वर मंदिरातला.

मुळात विज्ञान रंजनाच्या दृष्टीने प्रश्न असा की, हे खांब वाजतात कसे? यामध्ये त्यांची पाषाण रचना, त्यांचा आकार, लांबी यांचं प्रमाण या सर्व गोष्टींचा वैज्ञानिक विचार केलेला आढळतो. ‘रंगमंडपम’मध्ये वाद्यासारखा ध्वनी निर्माण करण्याची कल्पकता आणि रसिकता तत्कालीन शिल्पकारांनी दाखवली आहे. शेकडो वर्षे प्राचीन असलेले हे स्तंभ आजही मधुरध्वनीचे गुंजन करतात. अर्थात वादक, त्यातील मर्म जाणणारा असायला हवा. त्याला त्यामागचं वैज्ञानिक तंत्र अवगत असलं पाहिजे. तसं आपणही ताल धरला तर ते खांब ध्वनी निर्माण करतातच, पण त्यातून ‘सरगम’ साधणं सोपं नाही.

अशा खांबांसाठी वापरलेल्या ‘ग्रॅनाईट’ प्रकारच्या पाषाणातील घटकांमध्ये जी ‘क्रिस्टलाइज्ड’ किंवा पैलुदार नैसर्गिक संरचना असते. त्यातील ऑर्थोक्लेस हा घटक ध्वनीनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरतो. याशिवाय ‘स्ट्रिंग इन्स्टमेंट’ किंवा ‘तंतुवाद्यां’प्रमाणे दगडाचा वापर करायचा तर त्या खांबाचा व्यास, लांबी आणि उंची यांचं सुयोग असं गणिती गुणोत्तर तंतोतंत जुळलं पाहिजे. याची जाणीव आणि अभ्यास असलेलं शिल्पज्ञ त्या काळात होते, याचा आपल्याला आनंद वाटायला हवा आणि हा अमूल्य ठेवा जपायलाही पाहिजे.

अमेरिकेत, पेन्सिल्वेनिया राज्यातील ‘लेक डिस्ट्रिक्ट’ परिसरात असे असंख्य ‘रिंगिंग रॉक’ आढळतात. खनिजतज्ञ एडगर व्हेरी यानी अग्निजन्य खडकांचा अभ्यास करताना प्रथमच या वाजणाऱ्या पाषाणांचा सखोल विचार केला. त्यानंतर ठिकठिकाणच्या ‘रिंगिंग रॉक’चा शोध लागत गेला. व्हेरी यांच्या आधीही रेल्वेचे रूळ टाकताना 1742 मध्ये काही कामगारांना दगड पह्डत असताना त्यातील ‘ध्वनीप्रसारण’ क्षमता लक्षात आली होती, परंतु प्रस्तरशास्त्रानुसार त्याचं विवरण केलं गेलं आणि ते ‘वाजण्या’मागचं इंगित उलगडलं. अर्थात युरोप-अमेरिकेच्या या संशोधनाच्या शेकडो वर्षे आधी आपल्याकडे त्यातून नक्षीदार गान-स्तंभ उभारले गेले होते हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या सांस्पृतिक संचिताचा वृथा नको, पण यथार्थ अभिमान असायलाच हवा.

विनायक