सत्याचा शोध- बी फुलझाडाचे!

>> चंद्रसेन टिळेकर

तर्कबुद्धी अन् विज्ञानाचे ज्ञान वापरून सत्य काय आणि असत्य काय, हे कळतं. म्हणूनच शिक्षणासोबत आपली विवेकबुद्धी संवर्धित करणेही तेवढेच महत्त्वाचे. हे करताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायची तयारी ठेवावीच लागते. ही सामाजिक बांधिलकी जपणाऱया अनेक लहानथोर समाजसेवकांनी आपल्या आयुष्याचे नंदनवन केले आहे.

आमचे मित्र सदूभाऊ यांना अकस्मात टपकण्याची जन्मजात खोड आहे. ध्यानीमानी नसताना सदूभाऊ म्हणजे आमचा बालमित्र सद्या अचानक टपकला.

‘‘काय चाललंय रे?’’

‘‘काही नाही रे! एक-दोन वृत्तपत्रांसाठी सदर लिखाण चालू आहे, त्याची लिखापढी चाललीय, दुसरं काय?’’

‘‘तुझी लिखापढी म्हणजे लोकांना बोधामृत पाजणं हेच की नाही?’’

‘‘अरे बाबा, मी कोणाला ज्ञानामृत किंवा बोधामृत पाजत नाही. देवाधर्माच्या नावाने जिथे अतिरेक होतोय, श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासल्या जाताहेत, त्याचा दुष्परिणाम समाजातल्या आबालवृद्धांवर कसा होतोय तेच सांगतोय, किंबहुना सांगण्याचा प्रयत्न करतोय!’’

‘‘अरे पण, तुला उठाठेव करण्याची गरजच काय? तुला हा अधिकार कोणी दिला?’’

‘‘मी करतोय ती उठाठेव नाही, तर त्याला प्रबोधन म्हणतात आणि तो अधिकार मला छत्रपती शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी दिला.’’

‘‘उगाच असामान्य लोकांच्या मांडीला मांडी लावण्याचा प्रयत्न करू नकोस.’’

‘‘मी मुळीच तसा अगोचरपणा करणार नाही. ते समाजधुरीण असामान्यच होते, ते असामान्य झाले ते आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने! दोन घास ते तसे सुखानेच खात होते. त्यांना लष्कराच्या भाकऱया भाजायची मुळीच गरज नव्हती. शाहूराजे तर छत्रपतीच होते, पण राजा राममोहन रॉय आणि ज्योतिबा ऐश्वर्यमानच होते. त्या मानाने बाबासाहेब आणि प्रबोधनकार यांची परिस्थिती यथातथाच होती. परंतु अवतीभवती अनेकांचे संसार दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धा इत्यादी कारणांमुळे उधळले जात असताना स्वतच्या संसाराचा सारीपाट मांडून तो खेळत बसणे त्यांना रुचणे शक्यच नव्हते.’’

‘‘पण समर्थ रामदास तर म्हणतात की, ‘आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका’, त्याचे काय?’’

‘‘ते बरोबरच आहे. या मंडळींनी इतरांचा संसार सावरताना स्वतचे संसार उधळून दिले नाहीत! पण सामाजिक बांधिलकीही त्यांनी तेवढीच महत्त्वाची मानली. आता जरी समाज सुधारकांच्या प्रयत्नांमुळे, प्रबोधनामुळे हुंडा देणे-घेणे कमी झाले असले तरी एकेकाळी या दुष्ट प्रथेमुळे कितीतरी मुलींच्या आयुष्याची धूळधाण झाली होती. या प्रथेविरुद्ध प्रबोधनकारांनी त्या वेळी मोठी चळवळ उभारली होती. एखाद्या मुलाने हुंडा घेतल्याचे समजले की, एका गाढवाच्या गळ्यात एक पाटी लटकावत. त्यावर लिहिलेले असे की, ‘मी गाढव आहे. मी हुंडा घेतलेला आहे’ आणि त्या गाढवाला ते चक्क त्या हुंडा घेतलेल्या मुलाच्या लग्न समारंभात आणत. संबंधित वऱहाडी मंडळींना मेल्याहून मेल्यासारखे होत असे. पुढे ही प्रथा बरीचशी कमी झाली आणि कितीतरी मुलींचे आयुष्य मार्गी लागले. मग आता त्यांनाही तू विचारणार आहेस का, तुम्हाला कोणी हा अधिकार दिला म्हणून?’’

‘‘कोणाला विचारायचे होते? प्रबोधनकारांना? माझी काय टाप लागली होती त्यांना विचारायची!’’

‘‘हो, पण तेवढेच कर्तव्यकठोर आणि निस्पृहही! शाहूराजांनी एका ग्रंथाच्या लिखाणासाठी पाठवलेली भलीमोठी रक्कम त्यांच्या आजारपणामुळे त्यांना लिहिणे शक्य नसल्यामुळे परत पाठवली. शाहूराजांनी त्यांना ‘ती तुमच्या आजारपणासाठी वापरा’ असे सांगूनही ती रक्कम त्यांनी वापरली नाही.’’

‘‘पण मानवी आयुष्यात श्रद्धेला काही स्थान आहे की नाही? हे जग जसे विश्वासावर चालते तसे श्रद्धेवरही चालते हे विसरू नकोस.’’

‘‘हो, पण तुम्ही कशावर विश्वास ठेवता अन् कोणत्या श्रद्धा उराशी बाळगता हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमची तर्कबुद्धी अन् विज्ञानाचे ज्ञान वापरून सत्य काय आणि असत्य काय, हे तुम्हाला कळू शकतं. तुकोबा कोणत्या शाळेत गेले होते? पण ‘ऐसे नवसाये कन्यापुत्र होती तर का करावा लागे पती?’ असा तर्कसंगत रोखठोक प्रश्न त्यांनी अंधश्रद्धाळूंना विचारला होताच ना? गाडगेबाबा तर जेमतेम दोन इयत्ता तरी शिकले होते की नाही कुणास ठाऊक! पण गावी-आडगावी जाऊन शिक्षण आणि स्वच्छता यांची गोडी त्यांनी ग्रामीण जनतेत निर्माण केलीच ना? तेव्हा नुसते शिक्षण घेऊन उपयोगाचे नाही, तर त्याबरोबरच आपली विवेकबुद्धी संवर्धित करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ती बुद्धी नुसती जोपासूनही फायद्याचे नाही, तर तिचा उपयोग अनुचित प्रसंग टाळण्यासाठीही केला पाहिजे. केसात आलेली बट म्हणजेच जटा कापणे अशुभ म्हणून शेकडो मुलींची आयुष्य जीवघेणी झाली होती. त्याविरुद्ध अनिस या संस्थेच्या नंदिनी जाधव या महिलेने अक्षरश शेकडो मैल पायपीट करून पाचशेच्या वर मुलींच्या जटांचे निर्मूलन केले. कौमार्य चाचणीच्या विरुद्ध लढा देऊन नाशिकच्या कृष्णा चांदगुडेने शेकडो भगिनींना आत्महत्या करण्यापासून वाचवलं. आपला वकिली व्यवसाय सांभाळून संगमनेरच्या अॅड. रंजना गवांदे मॅडम यांनी कितीतरी स्त्रियांना चेटकीण म्हणून होत असलेली अमानुष मारहाण थांबवून त्यांचे संसार मार्गी लावले. तेव्हा या सर्वांनी तू ज्याला उठाठेव म्हणतोस ना, ती केली नसती तर काय झाले असते याची कल्पना कर. अरे, स्वतसाठी तर कुणीही जगते, पण दुसऱयासाठी जगणं हेच तर खरं जगणं असते. सामाजिक बांधीलकी जपणाऱया या सर्व लहानथोर समाजसेवकांनी तसेच प्रयोगशाळेत स्वतला गाडून घेणाऱया शास्त्रज्ञांनी तुमच्या आमच्या आयुष्याचे नंदनवन केले आहे. मग आपलेही त्या नंदनवनात एखादे विवेकाचे फुलझाड लावणे कर्तव्य नाही का?’’

सदूभाऊ भारावलेल्या अवस्थेत माझे हात हातात घेऊन म्हणाला, “गडय़ा, तू जेव्हा असे फुलझाड लावायला जाशील ना, तेव्हा मला हाक मार.’’

मला एका फुलझाडाचे बी सापडले होते.

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)