>> डॉ. समिरा गुजर जोशी
रावणाने सीतेचे अपहरण केले ते त्याच्या बहिणीच्या, शूर्पणखेच्या सांगण्यावरून असाच आपला समज असतो. ते कारण नाही असे नाही. ‘वाल्मीकी रामायणा’मध्ये शूर्पणखा आहे. राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत राहू लागल्यावर तिची आणि त्यांची भेट होते. अरण्यकांडात अठराव्या सर्गात ही शूर्पणखा भेट वर्णन केलेली आहे. ही दिसायला कुरूप दिसणारी, वयाने थोराड राक्षसी तरुण रामाला पाहून त्याच्या प्रेमात पडते. त्याला थेट लग्नाची मागणी घालते. स्वतचा परिचय करून देत असताना ती रावणाबरोबरच अन्य चार बलाढ्य राक्षसांची बहीण आहे हे सांगते. ‘वाल्मीकी रामायणा’मध्ये शूर्पणखा आपल्या खऱ्या रूपातच भेटते. इतर रामायणांमध्ये ती सुंदर स्त्राrचे रूप घेऊन भेटते, तसे वर्णन इथे आलेले नाही, पण शूर्पणखेच्या या बोलण्याला खूप गांभीर्याने घ्यावे असे राम – लक्ष्मण यांना वाटत नाही. राम म्हणतात, “माझे लग्न झाले आहे. तू लक्ष्मणाला विचार.” लक्ष्मण म्हणतो, “मी वडील भावाच्या आज्ञेत राहणारा आहे. तुला असे परावलंबी जिणे चालेल का?” शूर्पणखेला यातला थट्टेचा सूर कळत नाही. ती म्हणते, “त्यापेक्षा मी रामाशी लग्न करेन. अडसर काय तो सीतेचा आहे ना? तिला मी खाऊनच टाकते. म्हणजे प्रश्न मिटला.” असे म्हणून ती खरोखरच सीतेवर चाल करून जाते. त्या वेळी राम लक्ष्मणाला म्हणतात, “क्रूर आणि असभ्य लोकांची थट्टा करू नये हेच खरे.” यानिमित्ताने लक्षात येते की, थट्टा कळणे आणि ती स्वीकारता येणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे, पण अनेकांना थट्टा सहन होत नाही. ती स्वीकारण्याची खिलाडू वृत्ती त्यांच्याकडे नसते. शूर्पणखेच्या वर्तनाकडे पाहिले की, हेही पटते, आसुरी वृत्तीच्या लोकांना नकार पचवता येत नाही. “मी राक्षसी आहे, मी आताच्या आता सीतेला खाऊन टाकणार” असे म्हणून ती अंगावर धावून जाते. त्या वेळी प्रतिकार करताना प्रभू श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा देतात की, तिला विद्रूप कर. यानंतर शूर्पणखा विव्हळत आपल्या भावाकडे…खर नावाच्या राक्षसाकडे जाते. आपली एरवी परामी असणारी बहीण अशी रक्तबंबाळ अवस्थेत पाहून त्याला आश्चर्य वाटते. तिच्याकडून वनात आलेल्या या जटाधारी राजकुमारांबद्दल आणि सीतेबद्दल त्याला सर्व वृत्तांत कळतो, पण ते मानव आहेत की देव? याविषयी शूर्पणखेलाही खात्रीने सांगता येत नाही. इथे खरे तर तिचा राग लक्ष्मणावर किंवा राम-लक्ष्मणांवर असायला हवा, पण ती सांगते, “खर, या घटनेचा सूड घे. दोघांना मार आणि सीतेचे रक्त मला पिता येईल असे कर.” खर या गोष्टीला तयार होतो. चौदा महाबली राक्षस आणि त्यांच्या बरोबर शूर्पणखा पंचवटीत येतात. आता हे मोठे विचित्र युद्ध आहे. राम सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला पाठवतात. त्यामुळे प्रभू श्रीराम विरुद्ध चौदा राक्षस असे हे युद्ध आहे, पण आजच्या काळातील कोणत्याही चित्रपट नायकाला लाजवील असा हा प्रसंग आहे. एकटे श्रीराम एका वेळी एकाच धनुष्यातून चौदा बाण मारतात आणि त्या सर्व राक्षसांना ठार मारतात. शूर्पणखा या प्रसंगाने विलक्षण भेदरून पुन्हा खरकडे जाते. मग हे दोन भाऊ साधेसुधे नाहीत हे जाणून खर – दूषणालाही बरोबर घेतो आणि हजारोंचे सैन्य घेऊन स्वारी करतो. याही वेळी श्रीराम एकटेच शत्रूला सामोरे जातात. लक्ष्मण अजूनही सीतेच्या रक्षणासाठी तैनात आहे. एका बाजूला चौदा हजार राक्षस आणि दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीराम, पण याही युद्धात प्रभू श्रीराम विजयी होतात. तो प्रसंग फार रोचक आहे, पण विस्ताराअभावी येथे संपूर्ण सांगत नाही. युद्ध पाहण्यासाठी वनातील वनवासी आणि ऋषींनीही गर्दी केली आहे. श्रीराम विजयी झाल्यानंतर ते सगळे जयघोष करू लागतात. या सगळ्या गोंधळात एक अकंपन नावाचा राक्षस रावणाकडे जाऊन त्याला घडला प्रकार सांगतो. हा राक्षस त्याला सांगतो की, राम अजिंक्य आहे. त्याच्याशी लढून तू त्याला हरवू शकणार नाहीस. रामाला सीतेचा वियोग घडवून आण. मग तो मनाने कमकुवत होईल आणि त्याला हरवणे कदाचित तुला शक्य होईल. यानंतर काही काळाने शूर्पणखा तिथे पोहोचते आणि पुन्हा एकदा रावणाला रामावर विजय मिळवण्यास सांगते. यादरम्यान रावण मारीच राक्षसाला भेटून रामाशी युद्ध करण्याविषयी सुचवतो. पण मारीच मात्र त्याला असं न करण्याविषयी परोपरीने सांगतो. रावण त्याला कांचनमृगाचे रूप घेण्यास बळजबरीने तयार करतो.
खर आणि दूषण यांचा दारुण पराभव हे थेट राक्षसराज्यावर आलेले संकट आहे. सीतेचे अपहरण होण्याआधी हे इतके काही झाले आहे याची आपल्याला सहसा कल्पना नसते. श्रीरामांचे युद्धकौशल्यही इथे प्रकर्षाने दिसते.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)