मुद्दा – सतीश प्रधान

>> राजेश पोवळे

तो काळ प्रचंड भारावलेला होता. मराठी माणसावरील अन्यायाविरोधात पेटून उठत 19 जून 1966 मध्ये  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना दादरच्या  छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर केली. त्याच्या पुढच्याच वर्षी ठाण्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले. शिवसेना या निवडणुकीत उतरली आणि शिवसेनेला पहिली सत्ता 13 ऑगस्ट 1967  मध्ये ठाण्याने दिली. शिवसेनेचे 12 नगरसेवक विजयी झाले. यात सतीश प्रधानही होते. या विजयाने भारावलेल्या बाळासाहेबांनी शिवसेनेच्या विजयाची सभा गावदेवी मैदानात घेतली. ‘‘ठाणेकरांनो, मी तुमच्या या प्रेमापुढे कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे. तुम्हाला काय हवे ते सांगा,’’ अशी साद बाळासाहेबांनी घातली आणि गर्दीतून एक चिठ्ठी आली. ‘आम्हाला एक नाट्यगृह हवे’ असा त्यावर उल्लेख होता. शिवसेनाप्रमुखांनी ही प्रेमाची मागणी तत्काळ मंजूर केली, परंतु काही कारणामुळे नाट्यगृहाचे काम सुरू होऊ शकले नाही.

1974 साली नगराध्यक्ष जनतेतून निवडून देण्याच्या पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत सतीश प्रधान दणदणीत मतांनी विजयी झाले आणि ठाणे शहराचे पहिले नगराध्यक्ष झाले.त्यांनी सर्वप्रथम पूर्तता केली ती आपल्या दैवताने जनतेला दिलेल्या वचनाची. त्यांनी नाट्यगृहाचे श्रीफळ शिवसेनाप्रमुखांच्या हस्तेच वाढवले. तेच ठाण्याचे सांस्कृतिक वैभव असलेले गडकरी रंगायतन होय. 15 डिसेंबर 1978 रोजी गडकरी रंगायतनचे काम पूर्ण झाले आणि त्याचे उद्घाटनही शिवसेनाप्रमुखांच्याच हस्ते झाले. आपल्या नेत्याने दिले वचन पाठपुरावा करून कसे पूर्ण करावे याचा एक आदर्श वस्तूपाठ घालून देणारे शिवसेनेचे नेते म्हणजेच सतीश प्रधान.

प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी मध्य प्रदेशातील धार येथे झाला, पण त्यांची कर्मभूमी ठाणे हीच होती. विसाव्या वर्षी कट्टर शिवसैनिक बनलेल्या सतीश प्रधान यांची नंतर शिवसेनेचे नगराध्यक्ष ते खासदार अशी देदीप्यमान वाटचाल होती. 5 जुलै 1992 ते 4 जुलै 1998 आणि 5 जुलै 1998  ते 4  जुलै 2004 या काळात ते राज्यसभेचे दोनदा खासदार होते. त्यांनी संसदीय गटनेते म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. तसेच केंद्रातील विविध समित्यांवरही ते कार्यरत होते. ठाण्यात शिवसेनेचा पाया रोवण्यात सतीश प्रधान यांचा मोलाचा वाटा होता. 1974 ते 1981 या काळात ठाण्यात जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला, तर 1986-87 या काळात त्यांनी ठाणे शहराचे पहिले महापौरपदही भूषवले.

राजकारणासोबत क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रधान यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिवसेनेच्या जुन्या-जाणत्या नेत्यांपैकी एक आणि अभ्यासू नेता ही त्यांची ओळख होती. ठाणे शहराच्या विकासात आणि जडणघडणीत प्रधान यांचे मोलाचे योगदान होते. संघटनात्मक मजबुतीसाठी त्यांनी झोकून दिल्याने शिवसेनेचे मोठे काम ठाण्यात उभे राहिले.

शैक्षणिक क्षेत्रातही प्रधान यांनी आपल्या ठसा उमटवला. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अनेक महाविद्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नकारघंटा ऐकावी लागते. पर्यायाने त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो आणि हे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर फेकले जातात, शिक्षणाला मुकतात ही बाब लक्षात घेऊन प्रधान यांनी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली. सर्वसामान्य ठाणेकरांच्या मुलांना सहज प्रवेश देऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणाची वाट सोपी करून दिली. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेली असंख्य मुले आपल्या कर्तबगारीने विविध क्षेत्रांत तळपत आहेत. आता हे महाविद्यालय सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय या नावाने ओळखले जाते.

सतीश प्रधान हे स्वतः अॅथलीट होते. त्यामुळे ठाण्यातील खेळाडू हे राज्य पातळीवर आणि देश पातळीवर चमकावेत यासाठी एक भव्य स्टेडियम उभारले पाहिजे याचा ध्यास त्यांनी घेतला व त्यातूनच उभे राहिले ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम. सर्व सुविधांनी युक्त अशा या स्टेडियमवर आता रणजी क्रिकेटचे सामनेही खेळवण्याची तयारी सुरू झाली आहे. ठाणे शहरात महापौर वर्षा मॅरेथॉन ही प्रधान यांनीच सर्वप्रथम सुरू केली. ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्याची दूरदृष्टी त्यांच्यात होती.

आज ठाण्यात काही ठिकाणी मोठी विमाने उतरतील असे प्रचंड रुंदीचे मजबूत पक्के रस्ते निर्माण राहिले आहेत. या रस्ता रुंदीकरणासाठी झटणारे पहिले नेते होते सतीश प्रधान. त्याकाळी ठाणेकरांना रुंद व सुटसुटीत रस्ते मिळावेत अशी अपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली होती. सतीश प्रधान यांनी नगराध्यक्ष असताना हा आदेश प्रमाण मानून अत्यंत कौशल्याने रस्ते रुंद करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन आखला आणि तो यशस्वीही करून दाखवला.

सतीश प्रधान यांना मराठीचा जाज्वल्य अभिमान होता. त्याकाळी शासनाचे सर्व आदेश मराठीतून पाठवण्याऐवजी ते इंग्रजीतून पाठवले जात. हे आदेश मराठीतून पाठवण्यासाठी प्रधान आग्रही असायचे. 1974 साली प्रधान यांनी या इंग्रजी जीआरला कडाडून विरोध करत ते मराठीतून पाठवा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने मराठीतून जीआर काढण्यास सुरुवात केली. सरकारी जीआर मराठीतून निघण्याचा पहिला लढा हा शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सतीश प्रधान यांनीच उभारला होता.

गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली आणि रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रधान यांच्या निधनाने कडवट शिवसैनिक, कर्तृत्ववान नेता, दूरदृष्टी असलेला राजकारणी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण असलेला समाजकारणी हरपला आहे.