
>> विठ्ठल देवकाते
कबड्डीचं मैदान गाजवणाऱया आणि सातासमुद्रापार महाराष्ट्राबरोबरच हिंदुस्थानचाही डंका वाजवणाऱया मराठमोळय़ा कबड्डीपटू शपुंतला खटावकर यांना महाराष्ट्रातील ऑस्कर समजला जाणारा या वर्षीचा राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला. ‘कबड्डी’ या खेळासाठी आयुष्य वेचलेल्या शकुंतलाताईंना हा मानाचा पुरस्कार जाहीर होताच, खऱया अर्थाने या पुरस्काराचीदेखील उंची वाढली, असं म्हटल्यास नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. पारंपरिक कबड्डीसारख्या मैदानी खेळाला आधुनिकतेची जोड देत शकूताईंनी कबड्डीच्या मैदानात आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. ‘कबड्डी हाच माझा प्राण अन् कबड्डी हाच माझा श्वास’ या ब्रीदवाक्याला जागत शकुंतला खटावकर यांनी वयाच्या 73 व्या वर्षीही आपली कबड्डीची सेवा अखंडपणे सुरूच ठेवली आहे. साताऱयातील पुसेगाव (ता. खटाव) या छोटय़ाशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात 1 जून 1952 साली शकुंतलाताईंचा जन्म झाला. पुसेगावच्या श्री सेवागिरी शाळेतून शकुंतला पुण्यात एमईएस कॉलेज (आताचे गरवारे कॉलेज) शिक्षणासाठी आल्या. शिवरामपंत दामले सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अल्पावधीतच अॅथलेटिक्सचं मैदान गाजवायला सुरुवात केली. गरवारे नायलॉन कंपनीच्या अॅथलेटिक्स क्लबकडून तेव्हा त्या 100 मीटर, 200 मीटर, रिले शर्यत आणि थाळीफेक, गोलाफेकचं मैदान गाजवायच्या, मात्र दामले सरांचं निधन झालं आणि त्या अॅथलेटिक्सपासून दुरावल्या. त्यावेळी पुण्यात महाराणा प्रताप क्लबचा दबदबा होता. या क्लबचे चंद्रकांत केळकर यांनी शकुंतला खटावकर यांना कबड्डी खेळाची ओळख करून दिली. केळकर सरांनीच त्यांच्यामधील कबड्डी खेळाडूला पैलू पाडून घडवलं. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत शकुंतला यांनी वयाच्या 18 व्या वर्षी अल्पावधीतच कबड्डीच्या मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मध्यरक्षकाची जबाबदारी चोखपणे बजावत त्यांनी आपल्या खोलवर अन् चौफेर चढायांनी कबड्डीच्या मैदानात आपली दहशत निर्माण केली. 1971-72 मध्ये अखिल भारतीय मुंबई महापौर स्पर्धेच्या निमित्ताने शकुंतला खटावकर प्रथमच पुण्याबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी छाया बांदोडकर, शैला रायकर अशा नामवंत कबड्डीपटू ‘विश्वशांती’ कबड्डी संघात होत्या. या खेळाडूंना नामोहरम करून कबड्डीच्या क्षितिजावर शपुंतला खटावकर नावाचा उदय झाला. पुढील एक तप महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कबड्डीत याच अष्टपैलू खेळाडूच्या नावाचा दम घुमत राहिला. तेव्हा राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम बंगालच्या मोनिका नाथ नावाच्या वादळालाही शकुंतलाने रोखून कबड्डीतील आपला दरारा वाढवला होता. त्या दशकात शपुंतला नावाचं तुफान मैदानावर कोणीच रोखू शकलं नाही. पदलालित्य, चपळाई, जोश, भेदक नजर, कणखर पंजा ही त्यांची प्रमुख अस्त्रs होती. त्यांच्या अफलातून खेळाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने शपुंतला खटावकर यांना 1976 साली प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरविले. केंद्र सरकारनेही 1978 साली त्यांना मानाच्या ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित केलं. 1982 मध्ये आलेप्पी येथील राष्ट्रीय स्पर्धेनंतर शकुंतला खटावकर यांनी वयाच्या 30 व्या वर्षी कबड्डीतून निवृत्ती घेतली. तब्बल 12 वर्षे कबड्डीचं मैदान गाजविताना शकुंतला खटावकर यांनी 11 राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या, मात्र निवृत्त होऊनही त्या कबड्डी खेळापासून दूर जाऊ शकल्या नाहीत. पंच, प्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका पार पाडत शकुंतला खटावकर यांनी आजपर्यंत कबड्डी खेळाशी असलेली आपली नाळ तुटू दिली नाही. शेकडो राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱया शकुंतला खटावकर यांनी सुमती पुजारी आणि दीपिका जोसेफ या दोन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूही घडविल्या. पूर्वी नेहमीच ट्रक सूटमध्ये वावरणाऱया शपुंतलाताई आता साडी, कधी कधी सैल ड्रेस, पायात चप्पल, डोक्यावर पदर अन् कपाळावर मोठी टिकली अशा मराठमोळय़ा पेहरावात हसतमुख मुद्रेने वावरत असतात. कबड्डीसोबतच इतर खेळांच्या मैदानावरही शकुंतला खटावकर पुण्यामध्ये सातत्याने वावरताना दिसत असतात. कुठल्याही कार्यक्रमाला वेळेच्या आधी हजर राहण्यातून त्यांचा शिस्तपणा अधोरेखित होतो.