जाऊ शब्दांच्या गावा – सात दिवसांचा ‘आठ’वडा?

>> साधना गोरे

भाषेत काही शब्द अगदीच आडमुठे असतात. म्हणजे काय की, ते काही केल्या स्वतःचा थांगच लागू देत नाहीत. असे शब्द सवयीने आपण एका विशिष्ट अर्थानं वापरतो खरे, पण परंपरेने चालत आलेला त्यांचा अर्थ आणि तका&ने लावलेला अर्थ यांचा काही केल्या मेळच बसत नाही. त्यातलाच एक शब्द म्हणजे ‘आठवडा’. कुणाला वाटेल यात कसला मेळ बसायचा? सात दिवसांचा असतो तो आठवडा. एकदम बरोबर, पण हा झाला परंपरेने चालत आलेला अर्थ. पण आठवडा हा त्याच्या नावाप्रमाणे आठ दिवसांचा कालावधी असायला हवा. जसं संस्कृतमध्ये सात दिवसांच्या कालावधीला ‘सप्ताह’ म्हटलं जातं, पण मराठीतल्या आठवडा शब्दाचं तसं नाही. हा नावाला आठवडा आहे, पण त्यात दिवस तर सातच असतात. काही ‘टोटलच’ लागत नाय ना!

या आडमुठय़ा आठवडय़ाबद्दल वि. का. राजवाडे काय म्हणतात बघू. ते म्हणतात, ‘‘संस्कृतमधील ‘अष्टावर्त’ या शब्दाचा अपभ्रंश होत गेला. म्हणजे तो शब्द बदलत गेला. कालांतराने त्याचे रूप अठ्ठावडअ -अठावडा-आठवडा असे झाले. आठव्या दिवशी पुन्हा तोच वार म्हणजे आवर्त येतो म्हणून आठवडा म्हटले जाते.’’ ‘व्युत्पत्तिकोश’कार कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते मात्र तोच वार सात दिवसांनंतर येतो. आठ दिवसांनंतर नाही. तो दिवस सोडून पुढील दिवस मोजत गेल्यास कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा तोच वार सात दिवसांनी येतो, पण तो दिवसही मोजला तर राजेवाडे म्हणतात त्याप्रमाणे आठ दिवसांनी तोच वार येतो. आता आली का पंचाईत? याचा अर्थ राजवाडे आणि कुलकर्णी यांच्यात तर दिवस मोजण्यापासून मेळ नाही.

पण कुलकर्णींनी प्राकृतमधील आणखी एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, ‘‘प्राकृतमध्ये ‘अट्टवाड’, ‘अट्ठाह’ असे शब्द आहेत. त्यावरून ‘आठवडा’ शब्द आला असावा.’’ मराठीशिवाय हा ‘आठवडा’ शब्द हिंदी, सिंधी आणि गुजराती या भाषांतही आहे. हिंदीमध्ये त्याची ‘अठवाहा’, ‘आठवारा’, ‘अठोडिया’ अशी रूपं आहेत. सिंधीमध्ये ‘अठिडयो’, तर गुजरातीमध्ये ‘अठवाडियुं’ म्हटलं जातं. याविषयी कुलकर्णींनी सांगितलेली माहिती फार रोचक आहे. ते म्हणतात, ‘‘नेमाडी भाषेत (मध्य प्रदेशातील नेमाड प्रांताची भाषा) सात या संख्येला हाट म्हणतात. सुरत गुजरातीमध्ये हात म्हणतात. हाट म्हणजे बाजार असाही अर्थ आहे. नेमाडीत सात दिवसांच्या मजुरीला ‘हाटवडी’ म्हणतात व त्यावरून ‘आठवडा’ असा शब्द निघाला असावा.’’

कुलकर्णींच्या या संदर्भाला आणखी एक दुजोरा देता येईल. संस्कृतमधील ‘अट्ट’ व ‘हट्ट’ या दोन्हीही शब्दांच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ ‘बाजार’ असाही आहे. फारसीतला ‘बाझार’ आणि संस्कृतमधला ‘हट्ट’ यावरून मराठीत ‘बाजारहाट’ असाही शब्द प्रचलित आहे. तर सांगायचा मुद्दा असा की, शहर असो किंवा गाव, पूर्वी असे बाजार विशिष्ट दिवसाला, वाराला भरायचे. आजही गावागावातून, तालुक्याच्या ठिकाणी असे आठवडी बाजार सर्रास भरतात. मेट्रो सिटी बनलेल्या, रोजच्या रोज एखाद्या मोठय़ा जत्रेइतकी गजबज, गर्दी असलेल्या शहरांतूनही आजसुद्धा एखाद्या रस्त्यावर पूर्वापार चालत आलेले असे आठवडी बाजार भरताना दिसतात. मात्र गावातली अर्थव्यवस्था आजही या आठवडी बाजाराशी एक प्रकारे जोडलेली असते. कारण गावाकडे आजही शेतातल्या मजुरांना मजुरी देण्यासाठी, गवळ्याकडून दुधाचे पैसे घेण्यासाठी बाजाराच्या दिवसाचे वायदे केले जातात. असे वायदे अर्थातच फक्त गावातल्या लोकांपुरते मर्यादित राहणं शक्यच नव्हतं. अशा बाजारात होणाऱया देवघेवीच्या मोठमोठय़ा उलाढाली वाढत जाऊन पुढे त्याचा कायदेशीर वायदेबाजार झाला, पण केलेल्या वायद्यानुसार वस्तू व पैशांची भविष्यात करायची पूर्तता हा अर्थ मात्र कायम राहिला.

थोडक्यात काय तर, ‘अट्ट’ किंवा ‘हट्ट’ म्हणजे बाजार. अशा विशिष्ट दिवशी भरणाऱया बाजाराच्या कालावधीवरून ‘आठवडा’ शब्द आला असावा का? बाजाराच हा अर्थ घेतला की, आठवडा आठ दिवसांचा की सात दिवसांचा यांचा मेळ घालण्याचा प्रश्नच येत नाही. असा हा ‘आठवडा’ शब्द त्याच्या मुळाशी पोहोचण्याच्या अनेक शक्यता निर्माण करतो.

सुरुवातीला ‘आठवडा’ शब्दाला आडमुठा म्हटलं ते याच अर्थानं. त्याला पर्वाच नाहीये कोण आपल्याला आठ दिवसांचा म्हणतं की सात दिवसांचा, की अट्ट, हट्ट, बाजार यांच्याशी जोडतं. तो आपला त्याच्याच तोऱयात येतो आणि जातो.