>> धनंजय साठे
‘किट्टू सब जानती है’ या सहारा वन वाहिनीवरील मालिकेचा मी कार्यकारी निर्माता आणि प्रमुख भूमिकेत काम करणारी तेव्हाची नवखी, परंतु आताची ताकदीची अभिनेत्री अमी त्रिवेदी. आमच्यातील विसंवाद संवादाच्या पातळीवर येत एक छान नातं आमच्यात तयार झालं. त्याचाच हा किस्सा.
2005 साली टेलिव्हिजन रिपोटर्सच्या आयुष्यावर आधारित एक मालिका आली होती. मालिकेचे नाव होतं ‘किट्टू सब जानती है’ त्या काळातल्या प्रसिद्ध सहारा वन या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत असे. या मालिकेचा मी कार्यकारी निर्माता होतो. या मालिकेत बरेच चेहरे एकदम हटके होते. नायिकेच्या भूमिकेसाठी बरेच दिवस शोध चालू होता. मुख्य आणि मध्यवर्ती भूमिका असल्यामुळे आम्ही निर्मात्याच्या वतीने अनेक अभिनेत्रींना आमच्या कार्यालयात ऑडिशन्ससाठी बोलवायचो, पण वाहिनीवाल्यांना कोणताच चेहरा पटेना. अतिशय संघर्षाचा तो काळ होता. वाहिनीचं म्हणणं होतं की, दिसायला साधी, पण बाणेदार व्यक्तिमत्त्व असलेली उत्तम अभिनेत्री हवी आणि एका संध्याकाळी आमच्या आर्टिस्ट को-ऑर्डिनेटरकडून मला एक नंबर देण्यात आला. गुजराती रंगभूमीवर बालकलाकारापासून सुरुवात करणारी, जी आता नायिका असलेली अभिनेत्री अमी त्रिवेदीचा तो नंबर होता.
मी लगेच अमीला कॉल केला आणि तिचे एकूण कामाचे स्वरूप समजून घेतल्यावर तिने काही फोटोज आम्हाला पाठवावे असे सांगितले. यावर तिने आश्चर्यकारक उत्तर दिले, “माझ्याकडे प्रोफेशनल फोटोंचा पोर्टफोलिओ नाही. पासपोर्ट साइज फोटो चालेल का?” हे तिने अत्यंत निरागसपणे विचारलं होतं मला. असो.
पुढे तिची निवड झाली किट्टूच्या मुख्य भूमिकेसाठी. तिच्या वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते नरेश सुरी, आईच्या भूमिकेत शमा देशपांडे (अभिनेते राजा गोसावी यांची कन्या), भावाच्या भूमिकेत हर्ष खुराना, नायकाच्या भूमिकेत होता देखणा अमित वर्मा, त्याच्या आईच्या भूमिकेत उषा बच्छानी… अन्य कलाकार होते तरुण खन्ना, दयाशंकर पांडे, बेनिका, प्रणीत भट्ट (ज्याने पुढे ‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका गाजवली होती.) तर असे बरेच नवोदित कलाकार होते, ज्यांनी पुढे जाऊन बरेच काम केले.
मालिकेचे चित्रीकरण जोगेश्वरी इथल्या ‘निरात’ बंगल्यामध्ये सुरू झाले. योगायोग म्हणजे बंगल्याच्या मालकीणबाईचे नावसुद्धा अमी त्रिवेदीच होते. मालिका हळूहळू प्रेक्षकांना आवडू लागली आणि बघता बघता सहारा वाहिनीची नंबर दोनची मालिका बनली. अमीची ही पहिलीच मालिका होती. आज ती स्वत जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा अनेक वेळा मला “सॉरी” म्हणते. कारण आज इतकं काम केल्यानंतर करीअरच्या या टप्प्यावर तिला तिने केलेल्या चुका साफ दिसत असाव्यात. मला “सॉरी” म्हणण्यामागे एक मजेशीर किस्सा घडला होता. चित्रीकरण चालू असताना मी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. तेव्हा अमी तिथे आली आणि माझ्याशी गप्पा मारायला लागली. मी तिला शांतपणे खुणावलं की, दोन मिनिटं शांत बस, पण तरीही ती बडबड करत आणि मला चिडवत राहिली. मी तिच्याकडे लक्ष न देता वर्तमानपत्राचं वाचन चालूच ठेवलं. अचानक अमीच्या अंगात काय संचारलं कोणास ठाऊक! तिने तिच्या बाजूला पडलेली एक उशी माझ्या दिशेने भिरकावली. काही कळायच्या आत ती माझ्या चेहऱयावर आदळली आणि माझा नवीन विकत घेतलेला चष्मा जमिनीवर पडून त्याचा चक्काचूर झाला. अचानक सेटवर शांतता पसरली. अमी घाबरली आणि माझ्याकडे धावत येऊन “सॉरी सॉरी” म्हणायला लागली. त्यावेळी ती मला म्हणाली की, नवीन चष्मा बनवून देईन. आज या गोष्टीला इतकी वर्षे होऊन गेली, तरीही आज मी त्या नवीन चष्म्याची वाट पाहत आहे.
यापेक्षा अजून एक जालीम किस्सा आहे. जुहूच्या अजंता हॉटेलमध्ये चित्रीकरणादरम्यान दुपारच्या जेवणाचा ब्रेक झाला. तो अजंता
हॉटेलमधला दुसरा दिवस होता. अन्य कलाकार, तंत्रज्ञांबरोबर मी जेवायला बसलो होतो. तेवढ्यात अमी वायुवेगाने आली आणि काही कळायच्या आत “आज पुन्हा जेवणात भेंडीची भाजी का आहे?” असं आवाज चढवून मला विचारायला लागली. मी संयम राखून तिला म्हणालो की, जेवणात कोणत्या भाज्या असतात हे मी ठरवत नाही. तेव्हा तिने तिची पीडा
प्रॉडक्शन मॅनेजरला कळवावी, पण अमी काहीच ऐकायला तयार नव्हती. तिचा शब्दांचा मारा माझ्यावर चालूच होता. आमची खूप बाचाबाची झाली आणि अन्य मंडळींच्या मध्यस्थीने ती तात्पुरती मिटवून चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली. पण याचे अनेक दिवस पडसाद उमटत होते. इतके की, मालिकेचा कार्यकारी निर्माता आणि मालिकेच्या मुख्य नायिकेमध्ये अनेक दिवस अबोला होता. म्हणजे इतकं की, तिला एखाद्या दिवशी लवकर घरी जायचं असल्यास ती माझ्या सहायकाला कळवायची. मग तो मला येऊन सांगायचा आणि कामाचं शेड्यूल पाहून मी नकार द्यायचो. मग उरलेला दिवस अमी तोंड फुगवून काम करायची. शेवटी आमच्या मालिकेच्या नायकाने मध्यस्थी करून आमच्यामधला तिढा सोडवला. हा अबोला तब्बल तीन महिने चालला होता.
आज आमच्या गप्पा होतात तेव्हा इतक्या वर्षांपूर्वीच्या भांडणाची आठवण काढून आम्ही दोघेही मनमुराद हसतो. आज इतक्या विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर अमीमध्ये स्वतची चूक समजून घेऊन त्याबद्दा समोरच्याची माफी मागण्याची मॅच्युरिटी नक्कीच आली आहे.
अमी त्रिवेदी एक ताकदीची अभिनेत्री आहे. सब टीव्हीच्या ‘पापड पोल’मध्ये स्वप्नील जोशीबरोबर ती झळकली. ‘साजन रे झूठ मत बोलो’मध्ये सुमित राघवनबरोबर चमकली. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये पण तिने उत्तम काम केलं आहे.
अनेक मजेदार प्रसंगांनी भरलेली ही मालिका आजही आमच्या स्मृतीत घर करून गेली आहे. माझ्या आजवरच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड नक्कीच म्हणता येईल अशा या ‘किट्टू सब जानती है’ मालिकेचे 363 एपिसोड्स प्रसारित झाले.