निमित्त- क्रांतिज्योती

>> वर्षा चोपडे

सरस्वती आपण कधी पाहिलीच नाही, फक्त पुराणात वाचली. पण आपल्या देशात जोतिबाची सावित्री हिच्या रूपाने तिचे कणखर शिक्षिका या रूपात दर्शन घडले. स्त्री शिक्षणाची गंगोत्री असणाऱया साऊमायचा 3 जानेवारी हा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त…

विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱया धनाहून

तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन

असे सांगणाऱ्या जोतिबाच्या सावित्रीचा 3 जानेवारी हा जन्म दिवस. तिला नमन करण्याचाही हा दिन. तिचा आदर आहे आणि कायम राहील. खरे तर सरस्वती आपण कधी पाहिलीच नाही, फक्त पुराणात वाचली. पण आपल्या देशात जोतिबाची सावित्री हिच्या रूपात तिचे कणखर शिक्षिका या रूपात दर्शन घडले. या सावित्रीने भारतातील सगळ्या जाती धर्माच्या माय भगिनीने शिक्षित व्हावे म्हणून खंबीरपणे लढा दिला. त्या काळात ती स्त्राr शिक्षणाचा विरोध करणाऱया विरोधकांविरुद्ध मोठय़ा जिद्दीने लढली. सावित्री वाघीण होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सावित्रीबाईने  स्त्रियांना  शिक्षण, समानतेचे  व अक्षराचे  महत्त्व पटवून दिले. जीवनातील सशक्त ताकदीचे परिवर्तन शिक्षणाने साध्य होईल याची शिकवण त्यांनी समस्त स्त्राr जातीस दिली. सावित्रीबाई फुले यांनी पती जोतिराव फुले यांच्यासमवेत मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी चळवळ सुरू करून पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. खूप त्रास झाला, खूप विघ्ने आली,  शेण-चिखलाचा मारा झाला. पण फुले दाम्पत्यांनी जी शिक्षणाची क्रांती आणली त्याला तोड नाही. अनेक समाजसुधारकांनी या दाम्पत्यास प्रोत्साहन व पाठिंबा दिला. सावित्रीबाईंना अंधश्रद्धाळू, भोळसट लोकांच्या मनात घर करून बसलेल्या समाज विघातक रुढी नष्ट व्हाव्या असे मनापासून वाटायचे. जातीभेद चरम सीमेवर होते. गरिबी आणि दारिद्रय़ाने दलित गुराढोरांप्रमाणे जीवन जगत होते. बालविवाह, जरठ विवाह या चालीरीतीचे तेव्हा स्तोम होते. यात चार वर्षांपासूनच्या बालविधवा नरकमय जीवन जगत होत्या. धर्माच्या नावाखाली अनेक महिला सती जात होत्या. त्यांच्या वेदना आणि भयंकर मरणाविषयी वाचले तरी अंगावर काटे येतात. अगदीच लहान मुलींची म्हाताऱया,  वयस्कर व्यक्तींशी लग्ने लावून दिली जायची. हे सारे सावित्री बघत होती आणि त्याचा रोष आपल्या कवितेतून व्यक्त करीत होती. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे तिला पक्के कळून चुकले होते. एक महिला शिक्षित असली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे साधे गणित होते. जिवंतपणी नरक भोगणाऱया महिलांना सावित्रीबाईने बळ दिले, शिक्षणास प्रेरित केले. 1890 साली म. फुले यांचे निधन झाल्यावर म. फुलेंच्या अंत्ययात्रेच्या वेळी नातलगांनी त्यांच्या दत्तक पुत्रास टिटवे म्हणजे मातीचे मडके घेण्यास मनाई केली. त्या वेळी अत्यंत दुःखात असलेल्या सावित्रीबाईने स्वत मडके हातात घेतले. सोबत मुलगा होता, इतर नातलग होते. या शोक समयी त्या आपल्या जोडीदारास अंतिम निरोप देण्यास स्मशानभूमीवर पोहोचल्या. त्यानंतर  त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी झुगारून सावित्रीने स्वतःला  समाजकार्यात झोकून दिले. काळापुढे चालणारी स्त्राr अशी जोतिबाच्या सावित्रीची उत्तुंग ओळख होती. म. फुले यांना देवाच्या कथा-कल्पना मान्य नव्हत्या. पण सावित्रीबाईंची देवावर श्रद्धा होती हे त्यांच्या कवितेत जाणवते. एका कवितेत त्यांनी शिवशंभूला नमन केले आहे. पण त्या अंधश्रद्धा,भोंदूबाजी मानीत नव्हत्या हेही तेवढेच खरे. सावित्रीबाईंविषयी लिहायला शब्द अपुरे पडतील असे त्यांचे असामान्य कर्तृत्व आहे. सुरुवाती}ा लिहिलेली या महान स्त्राrविषयीची कविता त्यांचे अतुल कार्य व्यक्त करण्याचा मी एक बालिश प्रयत्न करत आहे.

आजही स्त्राr अत्याचार थांबले नाहीत, परंतु त्याचे प्रमाण खूप कमी झाले. निस्वार्थपणे काम करणारे तुरळकच असतात. आजच्या काळात तर केवळ स्वार्थ असला तरच लोक एकमेकांची विचारपूस करतात. काही चांगली निस्वार्थी लोकही आहेत. परंतु  तुरळक, पण याच मूठभर चांगल्या लोकांमुळे जग चालते हे सत्य कुणीही झुगारु शकत नाही. सावित्रीच्या काही लेकी तिचा वारसा चालवायचा प्रयत्न करीत आहेत. समाजासाठी चांगले काम करीत आहेत. पण सावित्रीबाई फुले यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. एक साधारण स्त्राr पण तिचा उद्देश खूप निर्मळ होता, पैशाची हाव नव्हती; केवळ लेकी शिक्षित व्हाव्यात ही तिची धडपड  होती. काव्यफुले, इतर पुस्तके लिहून त्यांनी प्रबोधन केले. विधवांना मदत केली, दुष्काळात काम केले.

ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्म दिन हा ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्त्राr शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले या हिंदुस्थानी महिलांचे कायम प्रेरणास्थान राहिल्या आहेत. त्यांना कोटी कोटी नमन!

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)