ठसा – निर्माता सलीम अख्तर

>> दिलीप ठाकूर

काही फिल्मवाल्यांचा दृष्टिकोन अथवा फोकस अगदी स्पष्ट असतो. आपण निर्माण केलेला चित्रपट यशस्वी ठरो अथवा अपयशी, आपण अजिबात थांबायचे नाही. एक चित्रपट झाला की दुसरा चित्रपट निर्माण करायचा असे करत करत अनेक चित्रपटांची निर्मिती करायची. ती करताना काही दिग्दर्शकांना वारंवार संधी देणे, काही नवीन कलाकारांनी त्यांच्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले असा एक सतत क्रियाशील निर्माता म्हणजे सलीम अख्तर. तो मूळचा कोलकात्यातील, म्हणून तो हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम कोलकात्तावाला म्हणून ओळखला जाई. कोलकात्यातील आपल्या अन्य काही व्यवसायांचे बस्तान व्यवस्थित बसवून ते सांभाळून मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने घट्ट पाय रोवले. 8 एप्रिल 2025 रोजी मुंबईत त्याचे निधन झाले. एखाद्या नायकासारखे उत्तम देखणे व्यक्तिमत्त्व असलेला सलीम अख्तर उत्तम आहार व आवश्यक व्यायाम यासाठी ओळखला जाई.

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्याने चित्रपट निर्मितीचे उत्तम सातत्य ठेवले. ते करताना प्रचलित (एस्टॅब्लिश) दिग्दर्शकांकडून बहुचर्चित चित्रपटांची निर्मिती केली. राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘कयामत’, जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बटवारा’, अशोक गायकवाड दिग्दर्शित ‘दूध का कर्ज’ ( हा चित्रपट एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण केला. मराठीत नाव ‘उपकार दुधाचे’) वगैरे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, त्या काळात नवीन चित्रपटांचे भव्य दिमाखदार प्रीमियर हे प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील एकपडदा चित्रपटगृहात आयोजित केले जात असतानाच सलीम अख्तर यांनी मात्र आपण निर्माण केलेल्या जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बटवारा’ या चित्रपटाचा प्रीमियर वांद्रय़ातील गेईटी चित्रपटगृहात केला. या चित्रपटासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यातील अतिशय दूरवर चित्रीकरणाची गरज सलीम अख्तरने पूर्ण केली. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक म्हणून उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सलीम अख्तरने ‘बाजी’ चित्रपट त्यांना दिला. या चित्रपटात आमीर खान स्त्राr वेषात दिसला. सलीम अख्तरने जवळपास 20 हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आणि आपल्या चित्रपटांचे वितरण अगदी प्रभावी व्हावे म्हणून आपल्या अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळेस सलीम अख्तरने नाझ चित्रपटगृह इमारतीतील वितरण कार्यालयात येणे पसंत केले. चित्रपट निर्माण करायचा आणि नशिबावर हवाला ठेवायचा यावर सलीम अख्तरची भिस्त नव्हती. अनेक कलाकार सलीम अख्तरच्या चित्रपटातून सातत्याने भूमिका साकारत. किशोरी शहाणेने ‘इज्जत’, ‘चांदसा रोशन चेहरा’, ‘सुन जरा’ अशा तीन चित्रपटांतून भूमिका साकारलीय.

नवीन कलाकारांना संधी हेदेखील सलीम अख्तरचे विशेष. रानी मुखर्जीला ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे सलीम अख्तरने रुपेरी पदार्पणाची संधी दिली. अशोक गायकवाड या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते सलीम अख्तरचे हुकमी दिग्दर्शक. रानी मुखर्जी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मुखर्जी खानदानातील तिसऱया पिढीतील. याच कुटुंबाच्या अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये ‘राजा की आयेगी बारात’ची पहिली ट्रायल आयोजित करून सलीम अख्तरने रानी मुखर्जीला जणू काwटुंबिक वातावरणात आणले. याच चित्रपटातून अमजद खान याचा मुलगा शादाब खान यालाही नायक म्हणून रुपेरी पदार्पणाची संधी सलीम अख्तरने दिली. जुगल हंसराज वयात येताच सलीम अख्तरने त्याला ‘आ गले लग जा’ (1994) या चित्रपटात नायक केले. पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहसीन खान सलीम अख्तर निर्मिती ‘बटवारा’तून लक्षवेधक ठरला. संगीता बिजलानी मॉडेल म्हणून चर्चेत असतानाच सलीम अख्तर निर्मिती ‘इज्जत’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आली. तमन्ना भाटिया सलीम अख्तरच्याच ‘चांद सा रोशन चेहरा’तून चित्रपट क्षेत्रात आली.

सलीम अख्तरची वैशिष्टय़े अशी अनेक. आपल्या चित्रपटाचा मुहूर्त, अतिशय भव्य सेटस, जोरदार पूर्वप्रसिद्धी, जंगी फिल्मी पाटर्य़ा अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रचलित संस्कृतीत रमलेला असा हा निर्माता हळूहळू मागे पडत गेला हे दुर्दैव. आता तो त्याच्या चित्रपटाच्या आठवणीने नक्कीच लक्षात राहील.