विमुक्ता- कीर्तनातून प्रबोधन संत जैतुनबी सय्यद

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

गेली शेकडो वर्षे आपला समाज जात-धर्म-वर्ण-लिंग यांच्या जोखडात अडकलेला आहे. अनेक समाजसुधारक व वारकरी संप्रदायातील अठरापगड जातींच्या संतांनी या सामाजिक प्रश्नांच्या विरोधात बंड केले, अनेक आव्हानांना तोंड दिले. संकटे झेलली. त्यातीलच एक जन्माने मुस्लिम असूनही भागवत धर्माचा व्यासंग असणाऱया, जातीपातीच्या भिंती नष्ट व्हाव्यात म्हणून प्रबोधन करणाऱया महिला कीर्तनकार जैतुनबी सय्यद ऊर्फ संत जयदास महाराज अलीकडेच होऊन गेल्या.

सर्वधर्म समभाव, समानता व बंधुता ही मूल्ये समाजात रुजावीत, अंधश्रद्धा नष्ट व्हावी, स्त्रियांनी शिक्षण घ्यावे यासाठी कीर्तनकार जैतुनबी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. पुणे जिह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव येथे 1930 मध्ये जैतुनबी सय्यद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे व्यवसायाने गवंडी होते. एकदा मकबूलभाई यांची भेट वारकरी-संप्रदायातील गोविंदभाऊ यांच्याशी झाली. गोविंदभाऊ हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे गवंडीकाम करत असत. व्यवसाय मिळते-जुळते असल्याने दोघे घनिष्ठ स्नेही झाले आणि एकत्रच गवंडीकाम करू लागले. दोघा मित्रांची कुटुंबे एकमेकांना सुख-दुःखांत साथ देत असत. गोविंदभाऊंना सर्वजण ‘गुण्याबुवा’ म्हणत. ते काम करताना सदैव ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा मंत्र म्हणत. त्यांच्याबरोबर काम करणाऱयांनाही त्यांनी ‘राम कृष्ण हरी’ चा छंद लावला होता. अशा वातावरणात लहानग्या जैतुनबीवर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांना कीर्तनाची गोडी लागली आणि दहा वर्षांच्या असल्यापासून त्या भजन-कीर्तनात रंगू लागल्या. दरम्यान, त्यांची भेट संत हनुमानदास यांच्याशी झाली. त्यांना गुरू मानून जैतुनबी यांनी वारकरी-विचारांची पताका खांद्यावर घेतली. बारामतीच्या घाणेकर बुवांकडून त्यांनी शास्त्राrय संगीताचे धडे घेतले.

जैतुनबी यांना मुल्ला-मौलवींकडून व नातेवाईकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली, पण त्यांनी वारकरी-पंथ सोडला नाही. ‘भक्तांना जात नसते, तर अंतःकरणातील भक्ती-प्रेमाचा सच्चेपणा हीच त्यांची खरी कसोटी असते,’ असा सल्ला हनुमानदास यांनी जैतुनबींना दिला. तो गुरुपदेश मानून त्यांनी काम सुरू ठेवले. त्यांची निस्सीम भक्ती व निष्ठा ओळखून हनुमानदास यांनी त्यांना ‘संत जयदास महाराज’ असे नाव दिले. जैतुनबी मुस्लिम धर्मातील नमाज, रोजे, जकात, खिदमत आदी इस्लामी धार्मिक विधीही नित्यनेमाने करायच्या.

खरे तर आजही समाजात स्वतचे निर्णय स्वत घेण्याचा महिलांचा अधिकार अपवादाने आढळतो. त्या काळी जैतुनबी यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर ठाम राहिल्या हे पचनी पडणारे नव्हतेच. त्यामुळे त्यांना तत्कालीन समाजाकडून रोषही पत्करावा लागला. पण त्यालाही न जुमानता त्यांची विठ्ठलभक्ती व साधना सुरूच राहिली. त्यांनी आयुष्यभर वारकरी-संप्रदायाचा प्रसार केला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. इतर वेळी जैतुनबी सायकलवरून गावोगावी जात व कीर्तने करीत. त्यांची रसाळ वाणी आणि सहजसोप्या भाषेतील सादरीकरण लोकांना भावायचे. त्यांमुळे त्यांना खूप प्रतिसाद मिळू लागला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात स्वतची दिंडी घेऊन त्या सहभागी होत असत. आतासुध्दा ही दिंडी ‘जैतुनबीची दिंडी’ म्हणून ओळखली जाते. या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होतात.

1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात जैतुनबीने भाग घेतला होता. प्रभातफेऱयांमध्ये aदेशभक्तीपर गीते म्हणण्यात त्या पुढे असत. स्वातंत्र्यलढय़ातील एका प्रसंगी भाई माधवराव बागल यांच्या सभेत जैतुनबी यांनी पोवाडा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर बागल यांनी लहानग्या जैतुनबीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले. जैतुनबी यांचे धारिष्टय़ पाहून नाना पाटील यांनी कौतुक केले. त्यामुळे अधिकच उत्साही होऊन जैतुनबी गावोगावी फिरू लागल्या व राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवू लागल्या. या लढय़ादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले.

पुण्याजवळ उरुळीकांचन येथील निसर्गोपचार केंद्रात महात्मा गांधी यांचा मुक्काम असताना त्यांच्या समोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला. गुरु हनुमानदास यांच्याबरोबर वयाच्या दहाव्या वर्षांपासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी हयातभर कसोशीने सांभाळला. सामाजिक प्रश्नांवरच्या अभ्यासपूर्ण, रसाळ व श्रवणीय कीर्तनामुळे जैतुनबी यांच्या वयाच्या चोविशीतच हनुमानदास यांनी दिंडीचा कार्यभार त्यांच्याकडे दिला. विशेष म्हणजे पालखीत महात्मा गांधी यांची प्रतिमा ठेवून जैतुनबी वारीत सहभागी होत असत. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही वारी त्या करीत. त्यांची दिंडी सासवडपासून प्रस्थान करीत असे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमागे एक मैल अंतर ठेवून ही दिंडी चालत असे. जैतुनबी यांच्या कीर्तनाचे वैशिष्टय़ म्हणजे कर्मकांडाला संपूर्ण फाटा दिला जायचा. त्यांच्या खणखणीत आवाजातील, सादरीकरणाच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीमुळे श्रोत्यांना त्या तासन्तास खिळवून ठेवत. संपूर्ण कीर्तनात सामाजिक आशय असायचा. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्या भाष्य करायच्या. त्या स्त्राr शिक्षणाचा प्रसार करीत असत. अंधश्रध्दा निर्मूलन, कालबाह्य रूढी, परंपरा, स्त्राr स्वातंत्र्य व शिक्षणाचे महत्त्व यांवर त्यांनी जनजागृती केली.

विठ्ठल भक्ती आणि राष्ट्रशक्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या कीर्तनात असायचा. खेडय़ातील स्त्रियांच्या अशिक्षितपणाबद्दल त्यांना कळवळा असायचा. कीर्तनात संत मीराबाई ते संत कान्होपात्रा यांच्या अभंगाचे दाखले देत. देश, देव व संस्कृती या विषयावर प्रेम व्यक्त करत मानवता धर्माचा पुरस्कार करीत.

हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करू नका, अहंकार, अंधश्रध्दा, स्वार्थ यांना तिलांजली द्या, सुसंगत व सद्विचार यांने जीवन सुखी बनवा, असा संदेश त्या आपल्या कीर्तनातून देत असत. सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, परस्पर सौहार्द, सामाजिक एकता व सलोखा या विषयावर त्या संतोक्तीच्या आधारे सोप्या भाषेत उपदेश करीत. कीर्तन करून जे मानधन मिळे, त्याचा विनियोग सामाजिक कार्यासाठी करीत. त्यांनी आळंदी पंढरपूर येथे मठ बांधले. कल्याण येथील हाजीमलंग बाबांच्या पहाडावर जाण्यासाठी पायऱया बांधल्या. त्यासाठी दीड लाख रुपयांची मदत केली, तर पंढरपुरातील त्यांच्या मठात अन्नदानाचे कार्य सुरू केले, ते आजही सुरू आहे.

वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला आषाढी कार्तिकी वारीचा प्रवास सलग एकसष्ट वर्षे सुरू ठेवला. वारीचा नियम हयातभर कसोशीने पाळला. 7 जुलै 2010 रोजी वारीदरम्यान पालख्या पुण्यात असताना त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वारीमध्ये भजन-कीर्तन करत संत विचार सर्वसामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले. त्यामुळे आजही वारकऱयांमध्ये संत जैतुनबी सय्यद यांच्याविषयी मोठा आदरभाव आहे.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)