लेख – धूर्त अमेरिकेची दगाबाजी

>> डॉ. ब्रह्मदीप आलुने

रशियायुक्रेन संघर्षाला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. रशियाशी संघर्ष केल्याने युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा  केवळ संकटात सापडले नसून या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि सामान्य जनतेवर दूरगामी परिणाम झाला आहे. युक्रेनची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहेपण आता हा संघर्ष एका नव्या वळणावर आला आहेअमेरिकापुरस्कृत युद्धात अमेरिकेने युक्रेनला एका प्याद्याप्रमाणे वापर केला आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्यावर अधिक विश्वास व्यक्त करत युक्रेनला नैराश्याच्या गर्तेत लोटले आहे. अमेरिकेच्या धूर्त राजकारणाने युरोप आणि युक्रेनचे भवितव्य संकटात सापडले असून त्याचे दीर्घकालीन परिणाम जगातील राजकारणाची दिशा बदलू शकते.

अमेरिकेची जागतिक राजकारणातील भूमिका ही नेहमीच बचावात्मक आणि प्रसंगी धूर्तपणाची राहिली आहे. याची प्रचीती वारंवार येऊनही जगाला अमेरिकेचा लळा अधिक दिसतो.  अमेरिका पुरस्कृत युद्धात अमेरिकेने युक्रेनचा एका प्याद्याप्रमाणे वापर केला आणि आता नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीनवरच अधिक विश्वास व्यक्त करत युक्रेनला नैराश्याच्या गर्तेत लोटले. अमेरिकेच्या विश्वासावर भू-राजकीय संघर्ष ओढवून घेणारा युक्रेन बिकट स्थितीत असून तो उद्ध्वस्त झाला आहे. याचे गंभीर आणि विनाशकारी परिणाम युक्रेन आणि लगतच्या प्रदेशावर  होत आहेत.

रशियाशी संघर्ष केल्याने युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा  केवळ संकटात सापडली नसून या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि सामान्य जनतेवर दूरगामी परिणाम झाला आहे. युक्रेनची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. एकेकाळी देशातील औद्योगिक क्षेत्र, खाद्य उत्पादन आणि निर्यात हे अर्थव्यवस्थेचे बलस्थान होते, पण आता या संघर्षामुळे संपूर्णपणे मोडीत निघाले आहे. उत्पादन आणि निर्यातीची शक्तीच संपली आहे. परकीय गुंतवणुकीत घसरण झाली आणि अनेक देशांनी युक्रेनशी व्यवहार करणे बंद केले आहे. परिणामी देशात आर्थिक मंदीचे वारे वाहत आहेत. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी कोलमडून पडल्याने युक्रेनमध्ये खाद्य अणि जीवनावश्यक घटकांची चणचण जाणवत आहे. अशा वेळी अमेरिकेने युक्रेनला बाहेर काढण्याची मदत करण्याऐवजी रशियावर विश्वास व्यक्त करून युक्रेनला एक प्रकारे वाऱ्यावर सोडले आहे. अशा वेळी युक्रेनला संरक्षण, मदत आणि पश्चिमी देशांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे, पण ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्रीय हिताचा विचार न करता पुतीन यांच्या समवेत व्यवहार करण्याच्या दृष्टीने कूटनीतीवर वाटचाल सुरू केली आहे. या फसवणुकीच्या रणनीतीमुळे युरोपातील सर्वात शांत अणि प्रबळ म्हणून ओळखला जाणारा युक्रेन आता नैराश्याच्या अंधारात आहे.

जागतिक राजकारणाचे आकलन केल्यास क्युबा, व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या देशांच्या भू-राजकीय स्थितीचा फायदा घेत अमेरिकेने या देशांना संघर्षात ढकलले आणि संधी मिळताच जागतिक सुरक्षेला संकटात टाकत कातडीबचाव भूमिका घेतली. म्हणून युक्रेन हा अमेरिकेच्या धोक्याचा राजकारणाचा नवा बळी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेला क्युबा हा अमेरिकेच्या स्वार्थी राजकारणाच्या सावटातून अनेक दशकांपासून बाहेर पडू शकलेला नाही. व्हिएतनामनेदेखील अमेरिकेच्या फसवणुकीच्या आणि स्वार्थी राजकारणाची झळ सहन केली आहे. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा या हल्ल्यामागचे कारण इराकमधील संहारक शस्त्रे असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात इराककडे कोणतीही शस्त्रे नव्हती आणि आता हा देश गेल्या तीन दशकांपासून यादवी युद्धात पूर्णपणे गाळात गेला आहे. त्याच वेळी अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानच्या हाती सोपविल्यानंतर अमेरिकी सैनिकांची वापसी ही कोणीही विसरू शकत नाही. तालिबानच्या हवाली केल्यानंतर अफगाणिस्तानच्या जनतेचे होणारे हाल जग उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे.

प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध, व्यापार आणि सामरिक प्रकरणात अमेरिकेचे फसवणुकीचे राजकारण नवीन नाही. अमेरिकेने अनेकदा स्वतःचे आंतरराष्ट्रीय हित जोपासण्यासाठी अन्य देशांना अंधारात ठेवून फसवले आहे. अशा प्रकारच्या कूटनीतीने जागतिक पातळीवर अनेक देशांत एकमेकांबद्धल अविश्वास आणि विरोधाचे वातावरण तयार होण्यास हातभार लागला. अमेरिकेच्या स्वार्थी धोरणाने आणि हस्तक्षेपामुळे अनेक देशांत अस्थिरता आणि वाद निर्माण झाले. ही भावनाच मुळातच अमेरिकेच्या कूटनीती आणि बचावात्मक दृष्टिकोनातून तयार होते आणि यात स्वार्थीपणा आणि वेळोवेळी केलेल्या आघाडय़ांचा समावेश आहे. एक प्रकारे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात स्वार्थीपणा नेहमीच दिसून आला. अमेरिका हा स्वतःचे हितसंबंध असेपर्यंत कोणत्याही देशांशी आघाडय़ा करतो आणि चांगले संबंध ठेवतो. मात्र त्याच्या राष्ट्रीय हितात बदल झाला की, लगेच कोलांट उडी मारतो.

युक्रेन आणि रशिया संघर्ष वाढण्यामागे अमेरिकेचा स्वार्थीपणा आहे आणि यात रशियाची जागतिक शक्ती कमी करणे हाच प्रमुख हेतू आहे. रशियाचा युक्रेनवरचा हल्ला ही अमेरिका अणि सहकारी देशांसाठी संधी होती आणि या माध्यमातून त्यांचा रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा आणि सैनिकी दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. एकीकडे युक्रेनला मदत करत अमेरिकेने रशियाचे सैन्य आणि आर्थिक ताकद कमी करत असताना त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता युक्रेनला आर्थिक मदत करणे ही अमेरिकेसाठी नसती आफत होऊन बसली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’च्या धोरणाच्या माध्यमातून आपला प्राधान्यक्रम बदलला आहे. ट्रम्प यांचे नवे राजकारण जागतिक रणनीतीवर सखोल परिणाम करत आहे. ट्रम्प यांचा उद्देश अमेरिकी हितांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आहे. या धोरणानुसार अनेक देशांतर्गत आणि बाह्य धोरणात बदल केले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या अमेरिकेशी असणाऱ्या संबंधात बदल होत आहेत.

ट्रम्प प्रशासन आता नव्या धोरणांसह सुरक्षा प्रकरणात रशियाशी सहकार्य करार करण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधातील सुधारणांमुळे चीनच्या  प्रभावावर काही प्रमाणात अंकुश बसविता येणे शक्य राहू शकते. तसेच रशियाच्या सहकार्याने अमेरिकेला चीनशी मुकाबला करण्यासाठी एक सक्षम सहकारी मिळू शकतो आणि त्यामुळे स्वतःच्या जागतिक शक्तीत भर घालता येऊ शकेल. ट्रम्प यांच्या रशियाशी जवळीक ठेवण्याच्या भूमिकेकडे चीनचा वाढत्या प्रभावाला रोखण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जात आहे. एक प्रकारे चीनला नियंत्रणात आणण्याच्या धोरणावर ट्रम्प वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. डॉलरला मजबूत करण्याचे ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेसाठी सकारात्मक राहू शकते आणि त्याच वेळी चीनला कोंडीत पकडण्याची योजनाही फळाला येऊ शकते, पण  त्यामुळे युक्रेनची संस्कृती, वारसा आणि सभ्यता ही पुन्हा वैभव मिळवू शकणार नाही आणि ऐतिहासिक ठिकाणे, संग्रहालये, सांस्कृतिक वारसा ठिकाणेदेखील उभारली जाणार नाहीत. साहजिकच अमेरिकेसारख्या बेभरवशाच्या सहकार्यावर विश्वास ठेवण्याची चूक युक्रेनला बरीच महागात पडली आहे. अमेरिकेच्या धूर्त राजकारणाने युरोप आणि युक्रेनचे भवितव्य संकटात सापडले असून त्याचे दीर्घकालीन परिणाम जगातील राजकारणाची दिशा बदलू शकते.