
>> साधना गोरे
लहानपणी ‘अक्का मारे बोका, ताई मारे घूस, खरं की खोटं ते जिजीला पूस’ हे अवखळ गाणं आळवून आळवून अनेकांनी आपल्या मोठ्या बहिणींना चिडवलं असेल. आता असं चिडवायला घरात तेवढी भावंडंच नसतात. एक किंवा फार तर दोन मुलं असण्याचा सध्याचा काळ. कुटुंबांचा आकार मर्यादित झाला हे चांगलं झालं, पण त्यामुळे भावंडांसाठी वापरली जाणारी संबोधनं मात्र आकुंचित पावत गेली. पूर्वी एकेका घरात सख्खी भावंडं किमान तीन-चार तरी असायची. शिवाय चुलत – मावस भावंडंही तितकीच असायची. मग मोठय़ा भावांना दादा, अण्णा, आबा, आप्पा, तात्या म्हटलं जाई, तर मोठय़ा बहिणींना अक्का, जिजी, ताई, माई ही संबोधनं वापरली जायची. अर्थात, प्रांतांनुसार कुटुंबातील भावंडांचा क्रम लक्षात घेऊन ही संबोधनं मागेपुढे वापरली जायची. मात्र महाराष्ट्राच्या बऱयाच भागांत आजही भावंडांतील सगळ्यात मोठय़ा बहिणीला अक्का म्हणण्याची पद्धत आहे. यातलं अक्का हे संबोधन मराठीत कोणत्या भाषेतून आलं माहितीये?
मराठीत ‘अक्का’ किंवा ‘आक्का’ हा शब्द आपल्या शेजारच्या कानडी भाषेतून आला. आपल्या मराठी भाषेत संस्कृत-प्राकृत शब्द मोठय़ा प्रमाणात असले तरी बरेच शब्द कानडीतूनही आले आहेत, पण मग कानडीत ‘अक्का’ शब्द कुठून आला? असा प्रश्न पडतो, तर तो तामीळमधून आला. तामीळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड या द्राविडी भाषांपैकी तामीळ ही सर्वात प्राचीन भाषा समजली जाते. काही भाषा अभ्यासकांच्या मते तामीळ भाषा संस्कृत इतकीच प्राचीन आहे.
‘अक्का’ शब्दाचा अर्थ आणि त्याचे मूळ विस्ताराने सांगताना कृ. पां. कुलकर्णी ‘व्युत्पत्ती कोशा’त म्हणतात, “हा शब्द प्रथम देशी नाममालेत आढळतो. कानडीत ‘अक्का’ शब्द ‘वडील बहीण’ याअर्थी आहे. हा मूळ द्रविड शब्द आहे व तो आर्य भाषेत वेदांच्या पूर्वी आला.’ विशेष म्हणजे इंडो-युरोपियन म्हणजे आर्य भारतीय भाषांमधील वैदिक, संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमध्ये ‘अक्का’ हा शब्द ‘आई’ या अर्थाने वापरला जात असल्याचं कुलकर्णी सांगतात. अनेक संस्कृतींमध्ये मोठी बहीण आईसमान मानली जाते, हा संदर्भ इथं लक्षात घेण्याजोगा आहे.
हे झालं मोठय़ा बहिणीसाठी वापरल्या जाणाऱया ‘आक्का’ शब्दाविषयी. मात्र मराठीत ‘आक्काबाईचा फेरा’, ‘आक्काबाई आठवणे’ असेही शब्दप्रयोग सर्रास केले जातात. दुर्दैव, दुर्भाग्य, दारिदय़, विपत्ती, अवलक्ष्मी या अर्थाने ‘अक्काबाई’ शब्द वापरला जातो. त्यामुळे भांडकुदळ स्त्राrलाही अक्काबाई म्हटलं जातं. शिवाय दुर्दैवी, अभागी मुलाला उद्देशून ‘अक्काबाईचं पोर’ असा शब्दप्रयोग केला जातो. या शब्दाविषयी दाते शब्दकोशात एक छोटी कथा सांगितली आहे. ती कथा अशी – “लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी असून दोघीही समुद्रमंथनातून निघाल्या, अशी सार्वत्रिक समजूत आहे. पहिलीने विष्णूशी लग्न लाविले व दुसरी नवरा पाहत दारोदार भटकते.’’
मात्र कृ. पां. कुलकर्णींना दात्यांचे वरील स्पष्टीकरण मान्य नाही. ते म्हणतात, “अक्काबाई म्हणजे लक्ष्मीची वडील बहीण व म्हणून दारिदय़ या अर्थाने समाधान होत नाही. लक्ष्मीच्या वडील बहिणीचा पुराणात कोठे उल्लेख नाही. दारिदय़ या अर्थाचाही कोठे उल्लेख नाही.’’ त्यामुळे ‘अक्का’प्रमाणे अक्काबाईचा अर्थ शोधण्यासाठीसुद्धा आपल्याला पुन्हा तामीळ भाषेकडे वळावं लागतं. कारण तामीळमध्ये ‘अक्कादेवी’ असा एक शब्द आहे. हा शब्द तामीळमध्ये दुर्दशा, अवदशा या अर्थाने वापरला जातो. मराठीत हा शब्द येताना ‘देवी’ शब्दाचं ‘बाई’ झालं असावं. मराठीत ‘देवी’ शब्द स्त्राr देवतेला उद्देशून वापरला जात असल्यामुळे लक्ष्मीशी विसंगत गुण असलेली देवी म्हणून तिच्या बहिणीची कथा जन्माला आली असावी. इतर भाषांतून शब्द घेताना अशा प्रकारचे बदल होणं हे अगदी सहज आहे.
एकूण काय तर आपली मराठी भाषा नातेवाचक संबोधनांच्या बाबतीत केवढी तरी श्रीमंत आहे! अलीकडे इंग्रजीतील ‘कझिन’ शब्द वापरण्याकडे अनेकांचा कल वाढतो आहे, पण त्याला जोडून ‘ब्रदर’ किंवा ‘सिस्टर’ शब्द वापरावाच लागतो. कारण त्याशिवाय नेमका अर्थबोध होत नाही. त्यापेक्षा मराठीत चुलत बहीण, मावस बहीण, मामेभाऊ हे शब्द केवढे अर्थवाही आहेत. तीच गोष्ट काका, काकी, मामा, मामी, मावशी या शब्दांची आहे. मराठीतील या शब्दांतून पितृ-मातुल कुटुंबातील नातीही सहज कळतात. ही सोय इंग्रजी भाषेत नाही. त्यामुळे मराठीचं हे वैभव आपण जपलं पाहिजे.