परीक्षण- अनुभवाचं प्रत्ययकारी चित्रण

>>साबीर सोलापुरी

मराठी साहित्यात आत्मकथनांची दीर्घ परंपरा आहे. आत्मचरित्र हा एक संपूर्णत स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे. ऐंशीच्या दशकानंतर मराठी साहित्याला अनोळखी असलेली अनेक संघर्षात्मक आत्मचरित्रे आली. मुस्लिम मराठी लेखिकांनी तर त्यांच्या वेगळी वाट चोखाळणाऱया आत्मकथनांनी खळबळ उडवून दिली. मल्लिका अमर शेख ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’, महेरुन्निसा दलवाई ‘मी भरून पावले आहे’, खातूनबी मत्तीकोप ‘खातून’, नसीम हुरजूक ‘चाकाची खुर्ची’, आशा आपराद ‘दुःख जे भोगले त्याला’ ही मुस्लिम मराठी लेखिकांची आत्मकथने बहुचर्चित ठरली. या आत्मकथनांनी  वाचकांच्या मनावर वेगळी मुद्रा उमटविली.

 या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या स्तंभ लेखिका, शिक्षिका, हाडाच्या सामाजिक कार्यकर्ती रजिया सुलताना यांचे अस्तित्व आणि अस्मितेचा लढा देणारे ‘रजनी ते रजिया’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. रजिया सुलताना यांचे हे आत्मकथन सर्वांगाने आगळेवेगळे आहे. भेदक आणि वेधक आहे. याशिवाय हे आत्मकथन आजवर आलेल्या मुस्लिम मराठी लेखिकांच्या आत्मकथा प्रवासातील पुढचा टप्पा आहे. रजिया सुलताना या जगण्यातील मूल्यभान जपणाऱया लेखिका आहेत. त्यांच्या कळकळींच्या मांडणीतून त्यांचा मनस्वी आत्मस्वर उमटलेला आहे.

 रजनी यांचे बालपण आडगावात गेलेले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, परंतु आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या डीएडचे शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून नोकरी करू लागतात. याच दरम्यान रजनी यांची ओळख मोबीनशी होते. वयाच्या विशीत रजनी यांच्या मनात मोबीनबद्दल प्रेमाची भावना दृढ होत होती. मोबीनही त्यांच्या प्रेमात पडतो आणि परस्परांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. रजनी खवले आता रजिया सुलताना होतात. हिंदू सांस्कृतिक संस्कार घेऊनच त्या कट्टर परंपरावादी मुस्लिम कुटुंबात प्रवेश करतात.

 तेव्हा कर्मठपणाचे काही आघात त्यांच्या मनावर होतात, परंतु सासरे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, सुधारणावादी होते. त्यांनी रजिया यांच्या कधीच अव्हेर केला नाही. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू होती. मात्र नवऱयाची वृत्ती संशयी होती. रजिया यांना मानसिक गुलामगिरी आणि वैचारिक शोषण मान्य नव्हते. चोरीछुपे त्यांचे लिखाण सुरू होते. त्या काळजावरच्या खोल जखमा कागदावर नोंदवत राहायच्या. ऊठसूट अरेरावी आणि बेदम मारझोड करणाऱया नवऱयाला वठणीवर आणण्यासाठी त्यांना अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा किती निकराने द्यावा लागला याचा बारीक-सारीक तपशील ‘अस्सं संसार’ आणि ‘छळाचा खेळ’ या दोन प्रकरणांतून नमूद करण्यात आला आहे. धर्माला केंद्रस्थानी न आणता माणसाला खऱया प्रेमाची आणि निखळ माणुसकीची नितांत गरज असल्याचा संदेश रजिया यांच्या लेखनातून ध्वनित होतो.

रजनीची रजिया झाल्यानंतर पूर्वाश्रमीच्या रजनीचा शोध घेताना लेखिकेचा जीवन संघर्ष अधिक तीव्र होत जातो. मात्र वाचन, लेखन यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होत जाते. पुस्तकेच त्यांना जगण्याचे बळ पुरवतात. व्यक्त होण्यासाठी निर्भय बनवतात. रजिया सुलताना या संसारिक दुःखाचे अनेक डंख सोसतात. जगण्याचे जहर पचवितात, पण परिस्थितीला शरण जात नाहीत. आपल्याला जे भोगावे लागले ते दुसऱयांच्या वाटय़ाला येऊ नये यासाठी त्या स्वतला सामाजिक कार्यात झोकून देतात. शिक्षणाच्या अभावातून परिस्थितीच्या वरवंटाखाली भरडल्या जाणाऱया स्त्रियांचा कैवार घेतात. ‘मानव संवाद’ केंद्राच्या माध्यमातून विधवा, परितक्ता, कैदी, निराधार मुली, किन्नर, वेश्या, तृतीयपंथी यांच्या समस्या मुळातून जाणून घेतात. त्यावर ठोस उपाययोजना करतात. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून त्या 20 वर्षे हिरिरीने कार्य करतात. अनेक जटिल प्रकरणे धसास लावतात. त्या अनुभवांवर, समस्यांवर अनेक पुस्तके लिहितात. त्यांना प्रतिष्ठित मान-सन्मान प्राप्त होतात. लेखिकेचे हे फार मोठे सामाजिक योगदान आहे.

हज यात्रेच्या अनुषंगाने लेखिकेने कुर्बानीवर एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले. त्यातील सत्यता पडताळून न पाहताच काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला. संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांना धमकीचे कैक फोन आले. त्यामुळे काही काळ त्यांना पोलीस बंदोबस्तात राहावे लागले. उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगातून रजिया सुलताना मोठय़ा धैर्याने वाट काढतात. ‘शब्दांची ताकद’ या प्रकरणातून याची हादरवणारी माहिती वाचकास मिळते. ‘रजनी ते रजिया’ या आत्मकथनातील अनुभूती सर्वस्पर्शी आहे. लेखिकेने त्यांचा गुंतागुंतीचा जीवनपट मोठय़ा धाडसाने मांडला आहे. समाजाने निर्माण केलेली कोंडी फोडण्याचे काम त्यांनी बिनधास्तपणे केले आहे म्हणून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले पाहिजे.

[email protected]

रजनी ते रजिया 

लेखिका ः रजिया सुलताना

प्रकाशन ः मनोविकास प्रकाशन, पुणे

पाने ः 196  मूल्य ः 250 रु.