
>> अस्मिता प्रदीप येंडे
माणूस जेव्हा सामाजिक स्तरावर एक नागरिक म्हणून वावरू लागतो, तेव्हा हळूहळू समाजरचना, धर्म-जातींचा तिढा, धर्मांधता, जातीचे अवडंबर याची कल्पना यायला लागते. माणसाच्या मनात जातीचे बीज इतक्या खोलवर रुजले गेले आहे की, ही जात माणसातील माणुसकी नष्ट करून टाकते. कवी अर्जुन बांबेरे यांनी आपल्या मनातील आक्रोश तसेच ग्रासलेल्या सामान्यजनांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत कवितेच्या माध्यमातून सत्यता समोर आणली आहे. कवी अर्जुन बांबेरे यांचा ‘आंधळा धर्म’ हा कवितासंग्रह म्हणजे सामान्यांच्या शांततेला लाभलेला परखड आवाज आहे.
कवितासंग्रहात 90 कविता समाविष्ट आहेत. या कवितासंग्रहाच्या माध्यमातून जाती-धर्माचा पगडा, माणुसकीच्या पडक्या भिंती, सामाजिक, धार्मिक स्तोम, अंधश्रद्धा- रूढींचा प्रहार, राजकीय दलदल, स्त्रित्वाची विटंबना, आदिवासींवर होणारे अन्याय अशा विविध विषयांवर कवीने बेधडकपणे भाष्य केले आहे. जाती-धर्मातील उच्च-नीचता माणसाला एकमेकांचा जीव घेण्यास प्रवृत्त करते. जमीनधारक आदिवासी स्वतच्या अस्तित्वाला पोरके होतात. धर्माच्या नावाखाली माणसाला एकमेकांपासून विभक्त केले जाते व यावरच सुरू असतो समाजरचनेचा गाडा. यावर निर्भीडपणे व्यक्त होण्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून कवीने हा कवितासंग्रह शब्दबद्ध केला आहे. सामाजिक स्थित्यंतराची परिस्थिती, लोकभावना असा वास्तववादी आशय काव्यरूपाने मांडून एकप्रकारे कवीने एक समाज म्हणून असणाऱया आपल्या भावना, उद्विग्नता, हरवलेला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी, यावर चिंतन करायला प्रवृत्त करणारा आणि समाजाकडे डोळसपणे पाहण्याची भूमिका मांडणारा हा कवितासंग्रह आहे.
आंधळा धर्म – कवितासंग्रह कवी ः अर्जुन बांबेरे
प्रकाशक ः ज्योती प्रकाशन मूल्य ः 200रुपये.