
>> चंद्रसेन टिळेकर
आपण, आपला समाज, आपला देश या सर्वच स्तरावर सध्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक असे एक प्रकारचे बुद्धिमांद्य आलेले दिसते. अशा अविवेकी वादळात विज्ञानाचे बी रुजावे तरी कसे आणि राष्ट्राचा विकास व्हावा तरी कसा? हा प्रश्न विवेकी विचारांना पडतोच. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्या राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल तर अशास्त्रीय शिकवण देणारे सारे काही आपण अव्हेरले पाहिजे.
गेली काही दशके जगातले सर्व देश चक्रावलेल्या अवस्थेत गेल्यासारखे दिसतात. देशातले विचारवंतही दिङमूढ झालेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. आपण, आपला समाज, आपला देश नेमका कोठे चाललाय हेच कळेनासे झाले आहे. सर्व स्तरांवर, मग तो आर्थिक असो, सामाजिक असो, वैचारिक असो अथवा अन्य कोणताही असो, एक प्रकारचे बुद्धिमांद्य आलेले दिसते. काही वर्षांपूर्वी जगभर पुनरुज्जीवनाची लाट आली असता तेथील विचारवंतांनी, समाजधुरिणांनी कष्टपूर्वक मोठय़ा निष्ठेने ती परतवून लावली आणि तिच्या ठिकाणी विवेकाची, वैज्ञानिक संस्कृतीची लागण केली. दुर्दैवाने आपल्या देशात ते घडू शकले नाही, कारण तेव्हा आपल्यावर परक्याचे राज्य होते. आपण गुलाम होतो. गुलामांना अर्थातच स्वतच्या भाग्याची चवड रचण्याचे स्वातंत्र्य नसते. परंतु आपल्या असंख्य स्वातंत्र्ययोध्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला मुक्त केले. किंबहुना त्याला आता 75 वर्षे होऊन गेली तरीदेखील आपण अजून मध्ययुगात का वावरावे? सर्व जग विज्ञानाच्या प्रकाशात उजळून जात असताना आपण अजूनही अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या अंधारात का चाचपडत आहोत? विज्ञानाव्यतिरिक्त कुठलीही अलौकिक शक्ती, संत महंत, आपला व आपल्या राष्ट्राचा उद्धार करू शकणार नाही हे सत्य पचवायला आम्हाला कठीण का जात आहे? अगदी थेटपणे विचारायचे तर सर्वत्र गेली निदान तब्बल तीनशे वर्षे त्रिखंडात विज्ञान बहरले गेले असताना आपल्या मातीत ते का रुजत नाही? एखाद्या नापीक, पडीक जमिनीत शेतकऱयाने अतोनात श्रम करून बी पेरावे, परंतु ते उगवूच नये असे आपले का व्हावे? विज्ञानाचे पीक आपल्या समाजात रुजावे अशी आपल्या भारतीय मनाची मशागत झालेली नाही, हे एक कारण असू शकेल हे तर उघडच आहे. पण चांगल्या पिकासाठी पोषक वातावरण लागते. तसे समाजात विज्ञानाची लागवड करायची असेल आणि ते उत्तमरीत्या रुजावे असे वाटत असेल तर त्याच्या आड येणारे आपले सर्व आचारविचार निग्रहपूर्वक बदलावे लागतील हेही तितकेच खरे आहे.
अगदी स्पष्ट सांगायचे तर विज्ञानाच्या आड जगभरच्या लोकांना नक्कीच त्यांचा देवभोळेपणा, धर्म आणि त्यात उपदेशीलेल्या धर्माज्ञा ज्या विज्ञानाने केव्हाच हास्यास्पद आणि कालबाह्य ठरविल्या. त्यांनी अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत पाश्चात्यांनी देवधर्म यांना आवर घातला आणि विज्ञानाला रान मोकळे करून दिले. प्रश्न आहे तो आपला! आपण तसे करणार आहोत का? किंबहुना आपण तसा काही प्रयत्न केला की नाही? तर त्याचे उत्तर आहे की असा प्रयत्न आपण म्हणजे आपल्या देशभरच्या समाजसुधारकांनी निश्चितच केला आहे. काही ठळक नावे घ्यायची म्हटली तर बुद्ध, चार्वाक, बसवेश्वर, चक्रधर स्वामी, म. फुले, आगरकर, शाहू राजे, गाडगे बाबा… इतकेच नाही तर अलीकडचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेही नाव घ्यावे लागेल. अशा सर्वांनी परिवर्तनासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. यातील काही जणांचा अमानुष छळ केला गेला तर चार्वाक, बसवेश्वर, डॉ. दाभोलकर यांच्या तर निर्घृण हत्या झाल्या. अर्थात हा प्रकार पाश्चात्य जगातही घडला. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्यभोवती फिरते असा कोपर्सिनिकसचा सिद्धांत ब्रुनोने जगजाहीर केला म्हणून तिथल्या धर्मसंस्थेने (चर्चने) त्याला भररस्त्यात जाहीरपणे जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आपले मत बदलले नाही. या प्रखर विज्ञान निष्ठेमुळेच तिथे विज्ञानाचा सूर्य उगवला. आपल्याकडे मात्र हा सूर्योदय लवकर का होत नाही याचे कारण आपण हजारो वर्षे अध्यात्मातच दंग होतो आणि त्या धुंदीतून बाहेर पडणे आपल्याला जड जात आहे. आता हे निश्चयपूर्वक थांबलेच पाहिजे. या धुंदीतून आपल्याला बाहेर पडणे कठीण जात आहे कारण गावोगावी चाललेले सत्संग आणि अचानक नव्या पोरसवदा कीर्तनकारांची उफाळलेली लाट!
अर्थात या लाटेमागे धर्माचे भांडवल करून आपली राजकीय दुकानदारी चालवणारे काही राजकीय पक्ष आहेत हे सर्वश्रुतच आहे. सत्संगामध्ये धर्मग्रंथ वाचायचे असतील, त्यांचे पारायण करायचे असेल तर त्यातील कालबाह्य झालेला भाग, समाजात विषमता पसरवणारा उपदेश, स्त्रियांच्या संदर्भात असलेली अविवेकी शिकवण हे सर्व वगळूनच धार्मिक ग्रंथ वाचले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ गुरुचरित्रात स्त्रियांवर अन्यायकारक बंधने सुचवली आहेत. एके ठिकाणी तर पतीनंतर त्याच्या विधवेने सती जावे असे सुचवले आहे. इतर धर्मग्रंथांतही असंख्य अशास्त्राrय, समाजाची दिशाभूल करणारी वचने, स्तोत्र, श्र्लोक असतात त्यांचा मुळीच उल्लेख होत कामा नये. उदा. अगस्ती ऋषिने समुद्र गिळला, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला, अभिमन्यू आईच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसे शिरायचे ते शिकला, मारुतीने जन्मताच सूर्यावर झेप घेतली, रामाचे नाव घेऊन दगड पाण्यात फेकला तर अलगद पाण्यावर तरंगू लागला, गौतम ऋषींच्या शापाने अहिल्येची शिळा झाली आणि श्रीरामाचा पदस्पर्श होताच ती परत मनुष्ययोनीत आली. हे आणि असे अनेक दृष्टांत सत्संगात, कीर्तन, प्रवचनात सांगितले जातात. तुकोबाचे वैकुंठगमन तर अगदी जणू सांगणाऱयाच्या डोळ्यादेखत घडले अशा आविर्भावात सांगितले जाते.
वरवर पाहता ही विधाने मनोरंजन करणारी अशी वाटतील, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही; ती खरी असली पाहिजेत असा समज समाज करून घेतो आणि इथेच नेमकी विज्ञानाची माघार होते. कारण अभिमन्यूचा किस्सा हा गर्भसंस्कार ही अंधश्रद्धा पसरविण्यास कारणीभूत होतो. जटील प्रश्न सुटण्यासाठी तर यच्चयावत धार्मिक ग्रंथांत मंत्रोपचार सांगितले आहेत. प्रत्यक्षात कुठल्याही मंत्राने तो कसाही म्हटला तरी कसलाही परिणाम घडून येत नाही, म्हणजेच काहीही निर्माण होत नाही आणि काहीही नष्ट होत नाही. तरीदेखील विविध माध्यमातून अगदी सोशल मीडियातूनही मोठय़ा प्रमाणावर मंत्राचा प्रचार केला जातो. अशा अविवेकी वादळात विज्ञानाचे बी रुजावे तरी कसे आणि राष्ट्राचा विकास व्हावा तरी कसा? तेव्हा विज्ञानाच्या सहाय्याने आपल्या राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल तर स्वा. सावरकर म्हणतात तसे आपले अशास्त्राrय शिकवण देणारे सर्व धर्मग्रंथ माळ्यावर ठेवून दिले पाहिजेत. त्यांच्या ‘क्ष किरणे’ या पुस्तकात तर ते बजावतात की, ‘युरोपने बायबल मिटले अन् तो बघता बघता चार हजार वर्षे आपल्यापुढे निघून गेला!’ आपण नेमके काय करणार आहोत?
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)