आत्मकथा- नात्याची निर्मळ कहाणी

>> मेघना साने

मेश्राम सर आणि नंदा यांचा विवाह म्हणजे दोन ज्ञानपिपासू माणसांचे मिलन. साहित्यसागरात उडी घेतलेले दोन जीव अनेक अडचणींचा भवसागर पार करीत विचारांची मौक्तिके वेचत गेले. एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार केल्यावर वयातील अंतर विसरत गेले. आस होती ती एकमेकांना घडविण्याची. परिस्थितीमुळे शाळेची नोकरी स्वीकारलेली नंदा खरे तर प्राध्यापिका होऊ शकते हे सरांनी ओळखले होते. मात्र नंदाच्या घरचे वातावरण पाहिले तर पोटभरू नोकरी करून ती कसाबसा संसाराचा गाडा ओढेल हे चित्र सरांना स्पष्ट दिसत होते. सर नंदाला मार्गदर्शन करीत राहिले. दोघांनाही एकमेकांची ओढ वाटत होती. भेटीगाठी होत राहिल्या आणि मग दोघांनी एकत्र राहण्यासाठी लग्नच करण्याचा निर्णय घेतला. सर मध्यमवयीन होते आणि त्यांचा मुलाबाळांसह परिवार आधीच होता. 96 कुळी मराठा जातीच्या नंदाच्या घराला मुलीने असे दलित जातीत लग्न करणे अजिबात पटणारे नव्हते. शिवाय दोघांमध्ये सत्तावीस वर्षांचे अंतर. कशी परवानगी मिळणार? नंदाने मग सरांबरोबर पळून जाऊनच लग्न केले. सरांनी तिच्यासाठी योजलेल्या घरात ती सरळ येऊन राहिली. नंदाच्या घरच्या मंडळींनी सरांच्या घरी येऊन खूप भांडण केले. तरी दोघे आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. यशस्वी संसाराची ती पहिली पायरी होती. ती डगमगू दिली नाही. अन् मग या जगावेगळ्या संसारात विघ्ने ही असणारच हे मान्य करून पुढील आयुष्य सोपे करून घेतले.

कॉलेजमध्ये असताना नंदा मेश्राम सरांची विद्यार्थिनी होती. सरांचे चॅलेंज स्वीकारून ती एम. ए.ला प्रथम वर्गात पास झाली होती. त्यानंतर तिने बी.एड.ला प्रवेश घेतला. तेथे कॉलेजात दुसरी आली. नंदाचे शिक्षणात करिअर बनावे म्हणून सर मनाने पूर्णत तिचे झाले होते. तिला समुपदेशन करीत तिची हिंमत वाढवीत होते. तरी दोघांत व्यक्ती म्हणून दोन मते होतीच.

एकदा मेश्राम सरांनी नंदाला एका विख्यात गाईड कंपनीकडे नेले. त्या मालकांशी भेट करून देऊन तिला अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ या पुस्तकाचे गाईड लिहायला द्यावे असे मालकांना सुचवले. मालकांनी ते लगेच स्वीकारले. मात्र नंदा स्वतच मुलांनी गाईड वापरण्याच्या विरोधात होत्या. त्यामुळे गाईड लिहिण्याचे कामही त्यांना आत्मवंचना वाटत होती. सरांनी तिला समजावून दिले की ‘पुढय़ात आलेलं अन्न जसं नाकारू नये तसंच पुढय़ात आलेलं कामही नाकारू नये.’ हा दाखला शांताबाईनीच (शांता शेळके) दिला असे ते म्हणाले. नंदाने मग अभ्यास करून गाईड लिहून दिले. असे काही अनुभव नंदाच्या पदरी पडावे आणि ती प्रगल्भ होत जावी हा सरांचा नेहमीच प्रयत्न असायचा.

एम. डी. कॉलेज हे शांता शेळक्यांचे कॉलेज किंवा मेश्राम सरांचे कॉलेज म्हणून प्रसिद्ध होते. वाङ्मय मंडळातर्फे त्यावेळी तिथे भरपूर कार्यक्रम व्हायचे. एकदा मंडळाच्या कार्यक्रमाला कवी वसंत बापट पाहुणे आलेले असताना सरांनी नंदावर निवेदनाची जबाबदारी सोपवली. नंदाची तयारी नव्हती. तिला भीती वाटत होती. पण मेश्राम सरांच्या मदतीने नंदा उभी राहिली. पंधरा मिनिटांच्या सूत्रसंचालनासाठी त्यांनी नंदाकडून समग्र बापट साहित्याची तयारी करून घेतली. बापट सरांच्या लेखक, कार्यकर्ता, स्वयंसेवक आणि प्राध्यापक अशा नाना भूमिकांचा अभ्यास झाल्यावर नंदाचा आत्मविश्वास वाढला. बापट सरांनीही तिचे निवेदन वाखाणले. मेश्राम सरांनी नंदाला क्लॉक अवर बेसिसवर लेक्चररची पोस्ट आग्रहाने स्वीकारायला लावली. ते काम करताना नंदा इतर प्राध्यापकांमध्ये ऊठबस करत असे. त्यांचे बोलणे, चालणे, विचार ऐकत प्रगल्भ होण्याची तिला संधी मिळत गेली. मेश्राम सर आणि नंदा यांच्या भेटीगाठी, त्यांनी तिला वाढदिवसाला आणून दिलेले फोल्डिंग टेबल, सुंदर फुलांचा बुके, त्यांचे दंगलीच्या दिवशीही अनेक अडचणी पार करीत तिला भेटायला येणे या सगळ्याचा शेवट अखेर प्रेमाची कबुली देण्यातच होणार होता. एकमेकांना कबुली दिली ती निशब्दपणे. नंदानेच त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. या लग्नानंतर दोघांनाही आपला स्वतचा परिवार अंतरणार होता हे माहीत असूनही त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. या लग्नामुळे नंदाला मिळाला तिची सतत काळजी घेणारा एक खंबीर पुरुष आणि मेश्राम सरांना मिळाली त्यांच्या रूपावर नव्हे तर गुणांवर नितांत प्रेम करणारी एक स्त्राr. त्यांनी एकमेकांचा स्वीकार केला तरी त्यांच्या लग्नाचा स्वीकार समाजाने केला नव्हता.

लग्नानंतर सरांच्या आग्रहामुळे नंदाने पीएच.डी.चा फॉर्म भरला. ‘दलित कादंबरी’ हा विषय घेऊन अभ्यास सुरू केला. पती आणि सल्लागार म्हणून सर तिच्याबरोबर काम करत होतेच. तिचे गाईड वेगळे होते. सरांनी नंदाकडून 182 दलित कादंबऱयांचा अभ्यास करून घेतला. संशोधनाचा पाया तयार करून घेतला. नंदाला पीएच.डी. मिळाली तेव्हा तिच्यापेक्षा जास्त आनंद सरांनाच झाला. दलित कादंबरीकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन त्यांनी विकसित केला. दलित कादंबरी ही कादंबरी असल्यामुळे त्यात ललित असावे अशी नंदाची अपेक्षा होती. पण दलितांचे जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे सरांनी तिला समजावून सांगितले. ‘ललित असलं नसलं तरी चालेल. लादल्या गेलेल्या दलितत्वाबद्दलचे कडे-रोकडे प्रश्न साहित्यकृतीने समाजाला विचारायला हवेत. आभासाचे लालित्यमय स्वप्न तिने (कादंबरीने) पाहिलं नसलं तरी चालेल. दलितत्व हे समाजातून समूळ नष्ट व्हावं याचं सत्यदर्शी स्वप्न तिने पाहायला हवं.’ असं मेश्राम सरांचे मत होते.

नंदासारख्या एका प्रेमळ पत्नीच्या सहवासात मेश्राम सरांचीही साहित्यिक वाटचाल सुरू होती. अनेक ठिकाणी व्याख्याने, दौरे, संमेलनातील सहभाग करता करता एक दिवस ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. या संमेलनात नंदाला अध्यक्षांची पत्नी म्हणून त्यांच्या शेजारी बसून मानसन्मान घ्यायला मिळाला. त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला. इतके मानसन्मान मिळाल्यावर नंदाच्या माहेरच्या माणसांना जावयाचे (सरांचे) कौतुक वाटले. मात्र त्यांच्या मनातून सरांची जात काही गेली नाही. त्यांनी या दांपत्याला मोकळेपणी आपल्या घरी जेवायला बोलावले नाही.

केशव मेश्रामांचे अखेरचे दिवस व्याधीग्रस्ततेत गेले. हॉस्पिटलायझेशन, मग डिस्चार्ज, पुन्हा हॉस्पिटलमधे भरती, तब्येतीचे नाना त्रास, डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार या सगळ्यात नंदाने त्यांची प्राणपणाने सेवा केली. त्यांचा आहार, औषधे याकडे नियमितपणे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली. पण शेवटी तो दिवस आलाच. मेश्राम सर नंदाला एकटीला या जगात सोडून निघून गेले आणि नंदाचे जग सुनेसुने झाले. अखेर तिला वाटले ‘एक तरी पोर पोटी हवं होतं.’ पण डॉ. नंदा मेश्राम शिक्षणाच्या सहाय्याने आपल्या पायावर उभ्या होत्या.

या अतिशय हृदयस्पर्शी आणि जिद्दीच्या कहाणीचे शब्दांकन सुमेध वडावाला यांनी उत्कृष्टपणे केले आहे. हे आत्मकथन करताना डॉ. नंदा मेश्राम यांनी हातचे काही राखून ठेवलेले नाही. दोन जिवांच्या नातेसंबंधांमधील अनेक खासगी गोष्टीही त्यांनी उघड केल्या आहेत. पण त्याचा हेतू नात्यातील निर्मळपणा दाखवणे हाच आहे.
[email protected]