मुद्दा – संगणक युगामध्ये वाचनाची सवय

>> वैभव मोहन पाटील

ज्ञान हे दोन गोष्टींतून मिळते. एक अनुभव व दुसरे वाचन. अनुभव तर आपण पदोपदी घेत असतो. त्यातून शिकण्यासारखे काय व किती हे प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यावर अवलंबून असते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो, पण ही प्रगल्भता जपण्यासाठी व ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावून ज्ञानात वाढ होते व मुख्य म्हणजे शब्दसंचयात भर पडते. धावत्या जगाबरोबर चालण्यासाठी, प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. ‘वाचाल तर वाचाल’ ही नुसती उक्ती नसून यशस्वी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. वाचन करत नसलेला माणूस एकतर अज्ञानी म्हणून ओळखला जातो अथवा आयुष्याबद्दल निरुत्साही. त्यामुळे वाचन हे यशस्वी व्यक्तीचे खरे उपासना यंत्र आहे.

आजच्या पिढीने तर वाचनात सातत्य राखणे काळाची गरज आहे, परंतु नेमके याच्या उलट परिस्थिती आज पाहायला मिळते. संगणक, मोबाईल, लॅपटॉप या यंत्रांमध्ये अडकलेला आधुनिक युवक आज वाचन पूर्णपणे विसरलेला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंटरनेट याअभावी अपूर्णतेची जाणीव त्याला होते. एकतर वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा काढला जात नाही. त्यामुळे वर्तमानकाळाची माहिती होत नाहीच, पण आपल्या इतिहासाबद्दल तरी माहिती कशी होणार? ज्या वेळी ही आधुनिक साधने अस्तित्वात नव्हती त्या वेळी ज्ञान आकलनासाठी वाचनाशिवाय दुसरे माध्यम नव्हते. त्यामुळे लेखनासाठीदेखील अनेक विचारवंत पुढे येत. अनेक लेखक, विचारवंत, कवी यांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध होते, पण कालांतराने त्यांची संख्या रोडावण्याचे एक कारण म्हणजे वाचकांची खालावलेली संख्या. आज अनेक नामांकित लेखकांची नावेदेखील आजच्या पिढीला ज्ञात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी समाज प्रबोधनासाठी जीवन खर्ची घातले व उत्तमोत्तम लिखाण भावी पिढीच्या उन्नतीसाठी करून ठेवले आहे ते लिखाण पाहायला आजच्या पिढीला सवडच नाही. आज सर्व भाषांतील उत्कृष्ट लेखकांना आपली पुस्तके विकण्यासाठी एकतर रस्त्यावरील विक्रेत्यांचा आधार घ्यावा लागतो किंवा मोठय़ा सवलतींनी पुस्तक विक्रीची प्रदर्शने भरवावी लागतात याची खंत वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आज वर्तमानपत्रांनादेखील अस्तित्वासाठी झगडावे लागले तर अप्रूप वाटू नये. एकेकाळी जलद संदेशवाहनासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट खात्याच्या तार या संकल्पनेने केव्हाच एक्झिट घेतली आहे. हळूहळू प्रिंट मीडियाचीदेखील वाचकांअभावी फरफट झाल्यास नवल वाटणार नाही, परंतु वाचन संस्कृतीचे काय? ती जर लोप पावली तर अधोगतीकडे जाण्यासाठी धोक्याची घंटा दुसरी कोणती नसेल. पुस्तकांच्या ऐवजी मुलांच्या हातात टॅब, लॅपटॉप, मोबाईल आले. लेखी परीक्षेवजी ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या. बिले भरणे, शॉपिंगपासून घरगुती वापरातील नित्याच्या गोष्टींपर्यंत सर्व काही ऑनलाइन मिळते. पुणाला कुठेही जायची गरज पडत नाही. सर्व काही घरबसल्या, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला वाचावेच लागेल. वाचण्यास वेळ मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. शहरी भागामधील नोकरदार व व्यावसायिक मंडळींची तर घडय़ाळाच्या काटय़ावरील कसरत. त्यात वाचनासाठी वेळ काढणे म्हणजे अनावश्यक व ओढवून घेतलेला व्याप अशी अनेकांची धारणा. अर्थात त्यात गैर आहे असे नाही, पण दिवसातला थोडा वेळ आपण वाचनासाठी काढलाच पाहिजे. लेखन संस्कृती जगवायची असेल, ज्ञान मिळवायचे असेल तर वाचन विसरता कामा नये. वाचन- मग ते पुठल्याही माध्यमातून करा. वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक, कथाकादंबरी, लेख, कविता, ग्रंथ, नोव्हेल… काहीही. वाचनाची आवड एकदा लागली की, त्यासारखा उत्तम, योग्य मार्गदर्शक दुसरा नाही. वाचनामुळे संवाद वाढविण्याची क्षमता येते, लिखाणासाठीदेखील प्रवृत्त होता येते. त्यामुळे विचारांचे आदानप्रदान वाढण्यास मदत होते.

वाचनासाठी आज अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. एकाच विषयाचे अनेक साहित्यातून वाचन केले तर या प्रकारातील विसंगती आपल्या लक्षात येईल. एखाद्या विषयाबाबतीत आपण एका पुस्तकात वाचलेले लिखाण दुसऱया पुस्तकात वाचल्यास बरीच विसंगती आपणास दिसेल. कारण त्या दोन्ही पुस्तकांच्या लेखकांची आकलन व उद्बोधन शक्ती निराळी असते. त्यामुळे खरं तर वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकाच आशयाचे लिखाण वाचणे हितकारक, परंतु त्याच आधारे आपले मत बनवणेदेखील घातक ठरू शकते. यासाठी वाचनामध्ये प्रगल्भता येणे आवश्यक असते. एखाद्याचा वाचनाचा ओघ प्रचंड असला तरी त्यातून सकारात्मक संदेश पोहोचणे व वाचकांनी तो आत्मसात करणे गरजेचे आहे.

एकंदरीत, वाचन संस्कृती जपलीच पाहिजे. लेखकांनादेखील प्रोत्साहित केले पाहिजे. यासाठी मुलांना आवश्यक व उचित लिखाण उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक जनजागृती करणे ही प्रसारमाध्यमांची व प्रशासनिक जबाबदारी आहे. आजच्या संगणक युगामध्ये वाचनाची सवय टिकवून ठेवणे ही काळाची व आपल्या समाजाचीदेखील गरज आहे हे विसरता कामा नये. यासाठी सर्व स्तरांवरून व व्यापक तसेच परिणामकारक प्रयत्न करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.