
>> अनिल हर्डीकर
‘राम’ या एकमेव शब्द आणि ‘रामायण’ हे महाकाव्य म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे पूजनीय स्थान. म्हणूनच ‘रामायण’चे रचनाकार आद्यकवी वाल्मीकी देखील तितकेच वंदनीय आहेत. ‘वाल्या कोळी’चा वाल्मीकी होण्याआधी त्यांची नारदमुनींशी घडलेली भेट आणि पुढे झालेली ‘रामायण’ची निर्मिती हे सारंच अतुलनीय आहे. युगे घडवणारी अशी ही भेट आहे.
आज 6 एप्रिल, 2025. चैत्र मासातील शुद्ध नवमी, श्रीरामनवमी. भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात मोठय़ा श्रद्धेने साजरा केला जातो. महाभारत आणि रामायण ही दोन महाकाव्ये ही हिंदुस्थानचे अभिमानास्पद साहित्यिक वैभव! गीत रामायण ही ग. दि. माडगूळकर यांची अजोड आणि लोकप्रिय अशी काव्यरचना. तिची अनेक भाषांतरे (गुजराती, हिंदी, तामीळ, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगू, संस्कृत, कोंकणी, इंग्रजी) झाली. एवढेच नव्हे तर ते ब्रेल लिपीतदेखील उपलब्ध आहे. याच काव्यरचनेमुळे गदिमांना महाराष्ट्र-वाल्मीकी ही मानाची पदवी प्राप्त झाली.
ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या 56 गाण्यांना सुप्रसिध्द संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी स्वरसाज चढवला आणि ही गाणी दर आठवडय़ाला एक याप्रमाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ही चित्रमालिका निर्माण केली ती 25 जानेवारी 1987 ते जुलै 1988 या कालावधीत दर रविवारी प्रदर्शित होत असे. ज्या वेळात तिचे प्रसारण होई त्या वेळात रस्ते ओस पडत. भाविक प्रेक्षक टीव्ही सेटला उदबत्ती, हार वगैरे घालून भक्तीभावाने पाहण्यास बसत.
रामचरितमानस आणि वाल्मीकी रामायण या दोन ग्रंथांचा अभ्यास करून ही मालिका जरी बनवली गेली तरी वेगवेगळय़ा राज्यातील, भाषेतील रामायणातील संदर्भ घेऊन रामानंद सागर यांनी ही मालिका बनवली होती. ज्यात मराठी भाषेतील भावार्थ रामायण, तामीळमधील कंबन रामायण, बंगाली भाषेतील कृतीवास रामायण, कन्नडमधील रामचंद्रचरित पुराण, मल्ल्याळममधील अध्यात्म रामायण, तसेच उर्दूमधील ब्रिज नारायण चकबस्त यांचे रामायण यातील संदर्भ घेतले होते.
एकंदरीत, ‘रामायण’ हे गारुड भारतीय मनावर आहे. त्याची महती काय वर्णावी! रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले वाल्मीकी हे जन्मत आदिवासी समाजातील हिंदू महादेव कोळी होते. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. रामायण हे एक असे महाकाव्य आहे जे भगवान श्रीराम यांच्या जीवनातून सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करून देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.
वाल्मीकी रामायणात 24000 श्लोक असून बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, सुन्दरकाण्ड, किष्किन्धाकाण्ड, लंकाकाण्ड आणि उत्तरकाण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. रामायणाची रचना होण्यासाठी जो प्रसंग, जी भेट कारणीभूत ठरली त्याची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहात होता. कुऱहाडीचा धाक दाखवून वाटसरूंकडील धन, दागदागिने तो लुबाडत असे. एकदा त्याच वाटेने नारद मुनी जात असताना वाल्या कोळय़ाने त्याना अडवले आणि हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्याच्यापाशी असेल नसेल ते सर्व देण्यास धमकावले. नारद मुनी म्हणाले, “नारायण, नारायण… अरे, नादान माणसा, वाटसरूंना लुबाडण्याचे पाप तू का करतो आहेस?’’
त्यावर वाल्या कोळी म्हणाला, “गोसावडय़ा, जास्त शहाणपणा शिकवू नकोस. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे आणि चालू लाग.’’
नारदमुनी म्हणाले, “माझ्याकडे या वीणेशिवाय दुसरे काही नाही. मात्र तू पापाचे घडे भरताना मी तुझ्याकडे पाहतो आहे.’’
वाल्या म्हणाला, “माझ्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी मी हे सर्व करतो आहे तर हे पाप कसे?’’
त्यावर नारदमुनी म्हणाले, “वाल्या, तू ज्यांच्यासाठी हे दुष्कर्म करतो आहेस त्या तुझ्या कुटुंबातील सदस्यांना ते तुझ्या या पापाचे वाटेकरी होण्यास तयार आहेत का ते विचार. तू त्यांना विचारून ये. तू परत येईपर्यंत मी इथून जात नाही, काळजी करू नकोस.’’
वाल्या घरी गेला त्याने बायको-पोरांना विचारले की, मी लोकांना, वाटसरूंना तुमच्यासाठी लूटून घर-संसार चालवतो तर तुम्ही माझ्या या पापाचा अर्धा वाटा घेणार का?’’ ज्यावेळी वाल्याचे कुटुंबीय नकार देऊ लागले, पापाचे वाटेकरी होण्यास तयार होईनात. त्यावेळी वाल्या नारदमुनींना शरण गेला आणि “मला यातून मुक्त होण्याचा मार्ग सुचवा,’’ असं म्हणाला. त्यावेळी नारद मुनींनी रामनाम घेण्याचा सल्ला दिला. वाल्याला ‘राम’ म्हणता येईना. त्याने ‘मरा मरा’ असा जप करायला सुरवात केली. एकचित्ताने तो जप करता करता वर्षामागून वर्षे गेली. वाल्याभोवती मुंग्यांनी वारूळ केले. काही वर्षांनंतर नारद मुनी त्या वाटेने जात असताना मुंग्यांच्या वारूळातून त्यांना रामनामाचा जप ऐकू आला, वाल्याला त्यांनी बाहेर काढले आणि म्हणाले, “वाल्या, तू आता ऋषी झाला आहेस. तू घेतलेल्या रामनामामुळे तुझी सर्व पापे नष्ट झाली आहेत.’’ अशा प्रकारे वाल्याचा वाल्मीकी झाला. एक साधी भेट वाल्या आणि नारदमुनी यांची. पुढे वाल्मीकी ऋषींने रामायण लिहिले. आज इतक्या वर्षांनंतरदेखील रामायण भारतीय मना-मनात घर करून आहे.