ठसा – राजा गोसावी

>> सुरेंद्र तेलंग

मराठी रंगभूमी व मराठी/ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गुणी कलावंत कै. राजा गोसावी यांची जन्मशताब्दी 28 मार्च 2025 रोजी झाली. राजा गोसावी यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. त्यांचे शिक्षण चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. नाटकवेडामुळे ते घरातून बाहेर पडले व गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत दाखल झाले. तेथे ते पडद्यामागची कामे करीत. नाटकात काम मिळण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा ते मा. विनायक यांच्याकडे काम मागण्यासाठी गेले विनायकरावांनी आपल्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांना ऑफिसबॉयची नोकरी दिली. तेथे समूहदृश्यांमध्ये त्यांना कामे मिळायची. ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात त्यांना प्रथम छोटेसे काम मिळाले. नंतर दामुअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाटय़मंदिर या नाटय़ कंपनीत गोसावी यांनी प्रवेश केला. तिथे त्यांना प्रथम प्रॉम्टर म्हणून काम करावे लागले. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यावेळी त्यांना नाटकात स्टेशनवरच्या पहारेकऱयाची भूमिका मिळाली. पुढे धुंडिराजची प्रमुख भूमिका करण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली. माधवराव जोशी लिखित उधार उसनवार नाटकातील छोटाशा भूमिकेत ते छाप पाडून जात. कंपनीच्या अनेक नाटकांतून त्यांच्या वाटय़ाला लहानसहान भूमिका आल्या. बाबुराव गोखले लिखित करायला गेलो एक नाटकातील राजाभाऊ हर्षे ही त्यांची पहिली गाजलेली भूमिका होती. त्यानंतर त्यांनी रंगश्री नावाची स्वतःची संस्था काढली. या संस्थेच्या भावबंधन, एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव नाटकांतून भूमिका केल्या. त्या फार लोकप्रिय झाल्या. मधुसूदन कालेलकर लिखित ‘हा स्वर्ग सात पावलांचा’ व ‘या घर आपलंच आहे’, आचार्य अत्रे लिखित ‘लग्नाची बेडी’, पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात भूमिका केल्या.

मधुसूदन कालेलकरांचे ‘डार्लिंग डार्लिंग’ व वसंत सबनीस यांचे ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकातील भूमिका फार गाजल्या. या नाटकाचे 500 हून अधिक प्रयोग झाले. सुयोग या संस्थेने आचार्य अत्रे यांचे ‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक तीनदा रंगभूमीवर आणले. तिन्ही वेळच्या प्रयोगात त्यातील कपेश्वरपंताची भूमिका राजा गोसावी यांनीच केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ नाटकात गणपतराव बेलवलकर ही भूमिका केली. त्यांनी संपूर्ण कारकीर्दीत 60 नाटकांतून भूमिका केल्या.

1995 साली बारामती येथे झालेल्या 75 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखिल भारतीय नाटय़ परिषदेने बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला.

दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात भूमिका केली. राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात भूमिका केली. त्यानंतर चिमणी पाखरं, बोलविता धनी, सौभाग्य, अबोली, गंगेत घोडं न्हालं, आंधळा मागतो एक डोळा, आलिया भोगाशी, पसंत आहे मुलगी, इन मिन साडेतीन, देवघर, उतावळा नवरा, नवरा म्हणू नये आपला, झालं गेलं विसरून जा, पैशाचा पाऊस, राजा गोसावीची गोष्ट, वाट चुकलेले नवरे, कन्यादान, असा नवरा नको रे बाई, हा खेळ सावल्यांचा आदी 250 चित्रपटांतून भूमिका केल्या. भाभी, स्कूल मास्टर या हिंदी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका केल्या. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, अचुक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून पाच तपे रसिकांवर अधिराज्य केले.