खगोल अभ्यासातली आपली यानं, दुर्बिणी हे ‘इन्व्हेन्शन,’ पण नव्याने सापडलेले दूरस्थ ग्रह, तारे, क्वेसार, पल्सार, दीर्घिका वगैरे डिस्कव्हरी. अशीच एक भन्नाट ‘डिस्कव्हरी’ खगोल अभ्यासकांसमोर आली आहे. तो आहे एक क्वासी स्टेलर ऑब्जेक्ट किंवा तारासदृश ‘क्वेसार.’ त्याचं खगोलीय नाव एपीएम 08279 + 5255. ते आता विसरलात तरी चालेल. त्याची वैशिष्टय़े मात्र जाणून घ्या. या ‘क्वेसार’मध्ये किती पाणी असेल? आणि किती उष्णता असेल?
एक मिनिट. त्याआधी ही ‘क्वेसार’ संकल्पना समजून घेऊ. क्वेसार म्हणजे क्वासी स्टेलर ऑब्जेक्ट. कोणी त्याचा उच्चार क्वेझार असाही करतात. क्वेसार विलक्षण तेजस्वी असतात. साध्या पद्धतीने सांगायचं तर या तारासदृश (क्वासी स्टेलर) क्वेसारचा जन्म, विश्वात दीर्घिका जन्माला येण्याच्याही आधीचा. विश्वाचे महाप्रसारण (बिग एक्स्पॅन्शन किंवा बिग बँग) 13-7 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाल्यानंतर (केवळ) तीन ते चार लाख वर्षांत वस्तुमान आणि प्रारणं विलग होऊ लागली. 20 ते 30 कोटी वर्षं ‘डार्क एज’ होतं. त्याविषयी आजही फारशी माहिती नाही. त्यानंतर काही वैश्विक विसंगतीमुळे (अॅनॉमली) वस्तुमान एकत्र येऊ लागलं आणि त्यातून आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिकाही निर्माण होण्याअगोदर ‘क्वेसार’ तयार झाले. त्याच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवरामुळे त्यांना ऊर्जा मिळून ते चमकू लागले.
क्वेसार खूपच दूर असल्याने त्यांना ताऱ्यासारखे मानले गेले. त्याचा अर्थ ‘किंतारा’ (म्हणजे क्वेसार). मला वाटतं या लेखापुरती इतकी ‘थिअरी’ पुष्कळ झाली. या क्वेसारचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे गवय (लिंक्स) तारकासमूहात सापडलेला महाकाय क्वेसार. तो केंद्रात विराट कृष्णविवर असलेल्या लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखा दिसतो. त्याचं कलाचित्र गुगलवर सापडतं. त्याचा शोध 1998 मध्येच लागलाय. मग आता त्याचं काय? तर तसं नव्हे, शोध लागल्यावरच त्याचा अभ्यास आणि अधिक वैज्ञानिक चिकित्सा होणार ना?
हा क्वेसार आपल्यापासून साडेतेवीस गिगा प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आता एक गिगामीटर म्हणजे 10 लाख किलोमीटर. या मोजमापाने आणि एका प्रकाशवर्षात प्रकाश 9460 अब्ज किलोमीटर प्रवास करतो, तर साडेतेवीस ‘गिगा प्रकाशवर्षांत’ तो किती दूर जाईल याचं गणित एखादा संगणकच पटकन समजावून देईल. तर हा क्वेसार आपल्यापासून खूप दूर आहे एवढंच लक्षात ठेवूया.
या ‘किंताऱ्या’ची प्रचंड ताम्रसृती (रेडशिफ्ट) आणि तेजस्विता यामुळे तो विश्वातला सर्वात ‘चमकदार’ किंतारा ठरला आहे. ‘हबल’ स्पेस टेलिस्कोपवरच्या निकमॉस या अतिशय विभेदनशक्ती (हाय रेझोल्युशन) असलेल्या कॅमेऱ्याने त्याचं निरीक्षण केलं गेलं. अशा प्रकारे प्रतिमा मिळवल्यावर त्याचं दृश्य फोटोत रूपांतर केलं जातं. संपूर्ण विश्वात सुमारे 30 ते 90 लाख क्वेसार खगोल अभ्यासकांना सापडले आहेत. प्रत्यक्षात त्यांची संख्या बरीच मोठी असू शकते. पृथ्वीला सर्वात जवळचा क्वेसार 600 प्रकाशवर्षे अंतरावर आणि दूरचा 12 ते 13 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
हा ‘एपीएम’ क्वेसार ही आतापर्यंतची विश्वातील सर्वात दूरची आणि महत्त्वाची अवकाशस्थ वस्तू मानवी प्रयत्नातून आढळली आहे. तो सर्पिलाकृती लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखा दिसतो. त्याचा गाभा गॅस, वायू, धूळ आणि ऑक्टिव्ह गॅलॅक्टिक न्युक्लिअरचा बनलेला असून केंद्रस्थानी 23 अब्ज सूर्यांचे वस्तुमान सामावेल एवढे विशाल कृष्णविवर असून हा पिंतारा म्हणजे अल्ट्रा ल्युमिनस इन्फ्रारेड दीर्घिकाच आहे.
या सर्पिल दीर्घिकेच्या वक्राकार हातांमध्ये (आर्म्स) पाण्याच्या वाफेच्याही रेषा आढळल्या. मार्केरिअन गॅलॅक्सीशी तुलना केल्यावर ‘एपीएम’मध्ये 50 पट अधिक पाणी असल्याचं समजलं! पृथ्वीवरच्या सर्व सागरसाठय़ाच्या 100 ट्रिलियन पट भरेल इतकं हे बाष्पयुक्त पाणी आहे. म्हणजेच एपीएम क्वेसार गॅलॅक्सी हा विश्वातील आगीन-पाण्याचा (तेजस्विता आणि बाष्प) याचा विलक्षण संगम आहे.
या विराट विश्वातली कित्येक गुढं उकलत जातात तेव्हा काही वेळा पूर्वीच्या संकल्पना सुधारून घ्याव्या लागतात. तसा ‘स्पेस-सायन्स’चा आधुनिक अभ्यास आजही अवघ्या शे-दीडशे वर्षातला म्हटला तर तो बाल्यावस्थेतच म्हणावा लागेल. विश्वातील आज ‘अगम्य’ वाटणाऱ्या गोष्टी उद्या ‘गम्य’ झाल्या म्हणजे त्यामागचे इंगित समजून येऊ लागलं की काही संकल्पनांना धक्का बसू शकतो. ते मुक्तमनाने स्वीकारत अधिक चिकित्सा करणं हेच तर विज्ञानाचं काम. जिज्ञासा नसेल तर वैज्ञानिक प्रगती कुठली? त्यामुळे पूर्वसंकल्पना त्रिकालाबाधित न मानता, बदलत्या काळातील संशोधनाचं स्वागत डोळसपणे केलं पाहिजे.
वैश्विक [email protected]