>> रविप्रकाश कुलकर्णी
साहित्य संमेलन, ग्रंथोत्सव, पुस्तक जत्रा हे प्रकार मला काही नवीन नाहीत. सगळ्या कार्यक्रमांना मीही तेवढय़ाच उत्साहाने जात असतो. अगदी प्रकृतीची साथ नसली तरी. याचं कारण या पुस्तकांच्या हाका मला साद घालत असतात आणि मग ते आमंत्रण मी टाळूच शकत नाही.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने (नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव 14 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत असणार आहे ही बातमी आली आणि हे कसं जमवायचं याची काळजी सुरू झाली. याचं कारण दिवाळीनंतर एकाच वेळी ठिकठिकाणी इतके कार्यक्रम असतात की प्रश्न पडावा जायचं तरी कुठे? गालिबच्या शब्दांची मदत घेऊन सांगायचं तर, ‘हजारो ख्वाइशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले…’
त्यात दिलीप फलटणकर, भूषण पत्की, प्रसाद भडसावळे यांच्यासारख्या सुहृदयांनी आग्रह धरला की निदान एखादा दिवस तरी जमवा की. तुम्हालाही तेवढंच बरं वाटेल. मग मात्र न जाण्याचा निश्चय डळमळीत होऊ लागला. त्यात पुन्हा शेवटचे तीन दिवस म्हणजे 20 ते 23 डिसेंबर ‘पुणे लिट फेस्ट’ आहे म्हटल्यावर मी निघालोच. स्टेशनवर, बस स्थानकावर जागोजागी या कार्यक्रमाचे फलक दिसत होते. त्यामुळे वातावरण निर्मिती झालीच. शिवाय आतमध्ये, आजूबाजूला पु.ल. देशपांडे यांच्यापासून ते प्रकाश खांडगे यांच्यापर्यंत वेगवेगळ्या साहित्यिकांचे फोटो पाहून इथे खरंच साहित्यिक कार्यक्रम आहे हे लक्षात येत होतं.
प्रचंड मंडप आणि त्यामध्ये जवळजवळ सहाशे पुस्तकांचे स्टॉल्स असल्याचं कळल्यावर थक्कच व्हायला झालं. मराठीत असं ऐकायची सुद्धा सवय नाही ना… मराठी पाऊल इथे तरी पुढे पडायला लागलं. बरं वाटलं.
फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्याला ज्येष्ठ व्यक्तींच्या बरोबरच तरुण-तरुणींचे जत्थेच्या जत्थे होते. हे दृश्य आगळंवेगळं होतं. मंडपात खूप लोकांची लगबग असूनही धुळीचा खकाटा नाही. आश्चर्यच! नंतर या आश्चर्यांचा गुणाकार होऊन त्यांची संख्या वाढतच गेली. या फेरफटक्यात केलेली काही निरीक्षणे नोंदवतो…
पुस्तक महोत्सवात साहित्य महोत्सवाचे उद्घाटन ‘यू कॅन विन’ पुस्तकाने, सुप्रसिद्ध झालेले वत्ते व लेखक शिव खेरा यांच्या भाषणाने झाले. नंतर मीरां चढ्ढा-बोरवणकर (त्या ‘रा’वर अनुस्वार का देतात?) यांच्याशी संवाद होता. तरुण-तरुणीत (विशेषत स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱया) त्या खूपच लोकप्रिय आहेत. त्यांनी नेमकेपणाने म्हटलं, ‘नागरी सेवा हा करीअरसाठी चांगला पर्याय आहे. इंग्रजीचं दडपण घेण्याची गरज नाही. स्पर्धा परीक्षेत एक-दोन प्रयत्नांपलीकडे अडकून राहू नये.’ हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रकाशक विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विशाल सोनी यांच्या
स्टॉलला भेट दिली. तेव्हा त्यांच्या मागे तरुण-तरुणींनी गर्दी केली आणि त्याबरोबरच त्यांच्या पुस्तकावर स्वाक्षरी घेण्यासाठी झुंबड उडाली. तो आनंद या प्रकाशनाचे सीईओ विशाल सोनी यांच्या चेहऱयावर दिसत होता. पण माझा आनंद हा पुस्तकांचा स्टॉल्स होते. एका स्टॉलवर जणू लायब्ररी ओतली होती. कुठलंही पुस्तक शंभर रुपयाला. त्याच्या जोडीला काही जुनी पुस्तकेही तिथे होती. काही जाणकार मंडळी त्यातून नेमकं पुस्तक उचलत होते. उदाहरणच द्यायचं तर गणेश मतकरींना त्यांच्या आजोबांचं म्हणजे माधव मनोहर यांच्या स्वाक्षरी असलेलं पुस्तक मिळालं, तर अजिंक्य विश्वास यांना अशोक थोरे यांच्या दोन दुर्मिळ रहस्य कथा सापडल्या.
माधव जोशी यांचं ‘महाभारत ते भारत 2025’ आणि राजेंद्र खेर यांचा ‘राम’ ही दोन्ही पुस्तकं हेडविगतर्फे प्रकाशित झाली ती स्वतंत्र प्रकाशन मंडपात. तर अनेक प्रकाशकांनी आपल्या
स्टॉलवरच अनेक पुस्तकं प्रकाशित केली. त्यात मेहता, रोहन, पद्मगंधा आदी प्रकाशक आघाडीवर होते.
आसावरी बर्वे अनुवादित ‘कोल्लेरूच्या पाऊलखुणा’ या कादंबरीच्या प्रकाशनावेळचा एक अनुभव. अनुवादिका आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे प्रसाद घाणेकर वेळेत येऊन पोहोचलेले. पण प्रकाशनाचा रागरंग दिसेना. त्याचं कारण कळलं अनुवादिकेचे कुटुंबीय कार्यक्रम स्थळी पोहोचलेले नव्हते. ती मंडळी पोहोचली. पण ज्याच्या हस्ते प्रकाशन होते त्या भारती पांडे ट्रफिकमध्ये अडकलेल्या. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा अस्वस्थपणा वाढला. कारण अनुवादिकेचं पहिलंच पुस्तक होतं ना! तेव्हा मी म्हटलं अध्यक्षाविना पुस्तक प्रकाशित करूया आणि त्या आल्यावर पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणून त्यांच्या हस्ते प्रकाशन करूया. पण लगेचंच भारती पांडे आल्या आणि पेचप्रसंग टळला.
एकूणच हा पुस्तक महोत्सव एवढा मोठा होता की, त्याची तुलना भारतातल्या कुठल्याही पुस्तक सोहळ्याशी होऊ शकत नाही. म्हणूनच त्याला पुस्तकांचा महाकुंभ म्हणायला हवं. पुण्याचा हा नवा रेकॉर्ड सहजसोपा नाही. म्हणूनच अविस्मरणीय अनुभवासाठी आयोजकांना धन्यवाद.