काही माणसे पदांमुळे मोठी होतात आणि काही माणसांमुळे पदांची प्रतिष्ठा नि सन्मान वाढतो. प्राचार्य अशोक प्रधान सर हे दुसऱ्या वर्गवारीत मोडणारे होते. ज्या काळात महाराष्ट्रात विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज करावा लागत नव्हता, त्या काळात या पदावर विराजमान झालेल्यांपैकी एक प्रधान सर होते. मुंबईच्या नामांकित रूपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, पुढे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि मग नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू अशी त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द टप्प्याटप्प्याने बहरली.
प्रधान सरांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा परिस्थिती फार अनुकूल नव्हती. विद्यापीठात काहीसे गोंधळाचे, अस्थिर म्हणता येईल असे वातावरण होते. विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न होते. अनेक लोक, विशेषतः शिक्षक अस्थायीस्वरूपात काम करत होते. समाजात मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाविषयी, येथील पदवीच्या मान्यतेविषयी आणि समकक्षतेविषयी साशंकता होती. संस्थापक कुलगुरू राम ताकवले यांनी विद्यापीठाचा पाया रचताना विशिष्ट पद्धती घालून दिल्यामुळे काही गोष्टी सुस्पष्ट होत्या, पण ते गेल्यानंतर विद्यापीठाला काहीशी पठारावस्था आली होती. विद्यापीठाची काही शहरांमध्ये विभागीय पेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्याही काही समस्या होत्या. अशा चोहोबाजूंनी प्रश्न, अडचणी, समस्यांनी घेरलेल्या सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीत प्रधान सरांनी मुक्त विद्यापीठाची धुरा आपल्या हाती घेतली. आपल्या कारकीर्दीत सरांनी अत्यंत काळजीपूर्वक, काटेकोरपणे पाऊले उचललीत. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे मध्यवर्ती सूत्र ठेवले. काय करायचे आहे, कशासाठी करायचे आहे, त्यातून काय साध्य करायचे आहे याचे वास्तववादी भान ठेऊन त्यांनी निर्णय घेतले. विद्यापीठाची विस्कटलेली घडी हळूहळू, पण प्रयत्नपूर्वक बसवली. आपले प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार कार्यवाही केली.
प्रधान सरांचा अत्यंत मौलिक आणि सध्या अभावानेच दिसून येणारा गुणविशेष म्हणजे ते संयमी श्रोते होते. त्यांची ऐकून घेण्याची क्षमता अफाट होती. ते शब्द अत्यंत जपून, मोजूनमापून आणि गरजेपोटीच वापरायचे. कुलगुरूपदाचा टेंभा त्यांनी कधीही मिरवला नाही. तसेच विद्यापीठाच्या साधनसंपत्तीचा यत्किंचितही वैयक्तिक कारणासाठी विनियोग केला नाही. विद्यापीठ परिसर मुख्य रस्त्यापासून दोन-अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या लेकी कॉलेजला पायी जायच्या. सरांनी विद्यापीठ वाहन त्यांच्यासाठी वापरले नाही. ते स्वतः नाशिकमधून बसने कसारा आणि येथून लोकलने कल्याणला जा-ये करायचे. त्यांना यासाठी कुलगुरूंची गाडी वापरणे सहज शक्य होते. मात्र त्यांनी असे कधीही केले नाही. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना कोणत्याही वादग्रस्त पेच, प्रसंगांना सामोरे जायला लागले नाही.
एकदा मी आणि माझे एक ज्येष्ठ सहकारी अभ्यास पेंद्र पाहणी दौऱ्याच्या अहवालावर सरांशी चर्चा करीत होतो. सोलापूर जिल्ह्यातील ‘दहीवडी’ येथे अभ्यास पेंद्र मंजूर करण्याची आम्ही आमच्या अहवालात शिफारस केली होती. सरांनी कागद घेतला आणि सध्या जवळपास अभ्यास पेंद्रे कुठे सुरू आहेत याची विचारणा केली. सोलापूर आणि पंढरपूर येथे अभ्यास पेंद्रे असल्याचे आम्ही सांगितले. सरांनी सोलापूर, पंढरपूर, दहीवडी या तीन ठिकाणांचे अंतर कागदावर दर्शवले आणि दहीवडी येथे अभ्यास पेंद्र सुरू करणे कसे योग्य होणार नाही (पुरेसे विद्यार्थी उपलब्ध होणार नाहीत) असा निर्वाळा दिला. यावरून सर किती बारकाईने अभ्यास पेंद्र मान्यता प्रक्रियेवर लक्ष ठेवून असायचे याची कल्पना येते. दुसरा असाच एक त्यांच्या द्रष्टेपणाचा किस्सा. विद्यापीठ स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व माजी कुलगुरूंना आमंत्रित केले होते. प्रधान सरही या सोहळ्यास उपस्थित होते. तेव्हा माझ्याकडे विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार होता. मी हे सरांना सांगितले. त्यावर सर म्हणाले, ‘‘छान. मन लावून काम करा आणि महत्त्वाचे म्हणजे नवीन येणाऱ्या कुलगुरूंना (त्या वेळी विद्यापीठात नियमित कुलगुरूंचे पद रिकामे होते.) विद्यार्थी सेवा विभागाचे महत्त्व समजून सांगा. कारण पारंपरिक विद्यापीठातून येणाऱ्या व्यक्तीला हा विभाग अपरिचित असतो.’’ ‘‘नक्की सांगेन सर,’’ असे मी त्यांना म्हणालो. विद्यापीठात नवीन कुलगुरू रुजू झाल्यावर काही महिन्यांतच त्यांनी विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाचा ‘विद्यार्थी सेवा विभाग’ बरखास्त केला. सरांचा कयास खरा ठरला. यावरून लक्षात येते की, प्रधान सरांची शैक्षणिक पार्श्वभूमी शिक्षणशास्त्राची नसूनही त्यांना दूरस्थ आणि मुक्त शिक्षण प्रणाली खऱ्या अर्थाने त्यांना आकळलेली होती. राम ताकवले यांच्यानंतर ही प्रणाली समजलेले प्राचार्य अशोक प्रधान हे एकमेव माजी कुलगुरू म्हणता येतील. आता तर ते आपल्यातून कायमसाठी निघून गेले आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
(लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रोफेसर आहेत.)