
>> महेश उपदेव
बहुजन चळवळ आणि इतिहास संशोधन क्षेत्रातील तज्ञ आणि पुरोगामी तत्त्वज्ञ प्रा. मारोती महादेव अर्थात मा. म. देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या ग्रंथामुळे त्यांना राजकीय, सामाजिक आणि संशोधन साहित्य क्षेत्रात प्रचंड नावलौकिक मिळाला.
राष्ट्र जागृती लेखमालेत प्रा. मा. म. देशमुख यांनी 1968 मध्ये लिहिलेल्या ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या ग्रंथावर त्यावेळच्या महाराष्ट्र शासनाने बंदी घातली. पुढे हायकोर्टाने बंदी उठवली. त्या वेळी प्रतिगामी संघटना तसेच अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्यांनी त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून नागपूर विद्यापीठासमोर या ग्रंथाची होळी केली होती. त्याला देशमुख यांच्या लेखणीमुळे जागृत झालेले बहुजन समाजातील विद्यार्थी तसेच परिवर्तनाच्या चळवळीतील तरुणांनी 27 जानेवारी 1969 रोजी मामंची गौरव मिरवणूक काढून उत्तर दिले होते.
‘मामं’ यांचे पूर्ण नाव मारोती महादेव देशमुख. महादेवराव आणि सखूबाई या शेतकरी दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म 11 जुलै 1936 रोजी सावनेरच्या इसापूर येथे झाला. हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा चिकाटी, जिद्द, शिक्षणाची जबरदस्त आवड यामुळे अध्ययन काळात आर्थिक प्रतिकूलतेवर त्यांनी मात केली. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले. इतिहास हा त्यांच्या खास आवडीचा प्रांत. साधनसामग्री, संदर्भ, पुरावे यांच्या आधारे इतिहासाची चिकित्सा, इतिहासाची सत्यता सिद्ध करण्याची वृत्ती आणि दृष्टी त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच जोपासली होती. 1963 मध्ये इतिहास या विषयात एम. ए. परीक्षेत त्यांनी गौरवास्पद यश मिळवले. 1954ते 1963 पर्यंत ते नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून एक वर्ष कार्य केले. 1964 साली ते धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि येथेच 1 ऑगस्ट 1996 ला सेवानिवृत्त झाले. मामंनी इतिहासाची नवी मांडणी केली. बहुजन जागृतीसाठी त्यांनी इतिहासाचे नवीन दालन उघडले. लेख, भाषणे देऊन जनजागरण केले. सुधारकाप्रमाणे सरांनासुद्धा विरोध, शिव्याशाप, ग्रंथाच्या होळ्या, प्रेतयात्रा, ग्रंथबंदी इत्यादी प्रसंगांना तोंड द्यावे लागले, पण मा.म. देशमुख हिमालयाप्रमाणे अढळ राहिले. बहुजनांच्या जागृतीसाठी देशमुख यांनी लेखणी झिजवली. बहुजनांसाठी साहित्याचे नवीन दालन तयार केले. लेख, भाषणांच्या माध्यमातून बहुजनांमध्ये जनजागरण केले.
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्याशी बहुजन समाज पक्षाची स्थापन करण्याच्या आधीपासून देशमुख यांची ओळख होती. बीएसपीची स्थापना झाल्यानंतर गंगाधर फडणवीस यांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. बसपाचे ते पहिले उमेदवार होते. त्यानंतर 1989 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हत्ती चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यांनी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यानंतर 1999 मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने ‘शिवराज्य’ पक्षाची घोषणा झाली. या नवीन पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून मा.म. देशमुख यांची निवड झाली होती.
देशमुख यांची ग्रंथनिर्मिती पुढीलप्रमाणे –
n प्राचीन भारताचा इतिहास n मध्ययुगीन भारताचा इतिहास n दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास n मोगल कालीन भारताचा इतिहास n युगप्रवर्तक शिवराय आणि मराठय़ांची शौर्यगाथा n अभिनव अभिरूप लोकसभा नाटय़ n शिवशाही n सन्मार्ग n राष्ट्रनिर्माते n मनुवाद्यांशी लढा n रामदास आणि पेशवाई n मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा n महात्मा फुले यांचे सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न n साहित्यिकांची जबाबदारी n शिवराज्य n समाज प्रबोधन n बहुजन समाज आणि परिवर्तन.