वेब न्यूज – तुरुंगातील दणकेबाज कमाई

तुरुंगवास हा गुन्हेगारांसाठी काही फारसा आनंदी नसतो. बंदिवास, बरेचदा येणारा एकटेपणा यामुळे तो असह्य होत असतो. जगभरातील तुरुंगात कैद्यांना कामदेखील करावे लागते. हिंदुस्थानसारख्या देशात कामाच्या बदल्यात कैद्यांना मिळणारा मोबदला हा फार अल्प असतो असे मानले जाते. त्याचबरोबर या कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा, वैद्यकीय मदत, रजा याबद्दल देखील अनेकदा तज्ञ चिंता व्यक्त करत असतात. मात्र हिंदुस्थान नाही, तर जगभरातील अनेक देशांतील तुरुंगाबद्दल आणि तिथल्या गैरसोयीबद्दल वारंवार बातम्या प्रकाशित होत असतात. सध्या मात्र ब्रिटनच्या तुरुंगातील कैद्यांच्या कमाईचा समोर आलेला अहवाल भल्याभल्यांना थक्क करून गेला आहे.

आपली शिक्षा भोगत असताना त्या काळात कामाच्या मोबदल्यात ब्रिटनच्या तुरुंगातील काही कैदी महिना 3 लाख रुपयापर्यंत कमाई करत असतात आणि वर्षाला 39 लाख रुपये कमावतात. काही कैदी तर यापेक्षा जास्त कमाई करतात आणि त्यांचा आकडा वर्षाला 48,66,907 रुपये अशी मजल मारत असतो. ही कमाई तुरुंगातील रक्षकांच्या मानधनापेक्षा देखील जास्त आहे. तुरुंगात बंद असलेल्या या कैद्यांची कमाई शिक्षक, बायो केमिस्ट आणि आयाचे काम करणाऱ्यांपेक्षा देखील जास्त आहे. गेल्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या कैद्याची कमाई 36,715 पाऊंड म्हणजे 38,84,491 इतकी होती. आणि इतर भत्ते त्यात मिळवता ही कमाई 46,000 पाऊंड, अर्थात 48,66,987 या आकड्यावर पोहोचली.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार गतवर्षी सर्व कैद्यांची मिळून कमाई ही 22.05 मिलियन पाऊंड म्हणजे 238 करोड रुपये इतकी होती. ब्रिटनमध्ये प्रत्येक तुरुंगात काम करण्यास इच्छुक असलेल्या साधारण 1183 कैद्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कैदेत असतानादेखील आपल्या क्षमतेनुसार आणि कसबानुसार चांगली कमाई करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र हे कमाईचे आकडे मानसोपचार तज्ञ, बायोकेमिस्ट अशा मान्यवर व्यावसायिकांच्या कमाईपेक्षा देखील जास्त असल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

स्पायडरमॅन