प्रासंगिक – मधुघटची रिकामे पडती घरी…

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक दिवंगत शिरीष कणेकर यांच्या ‘थँक-यू’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी यशवंत नाटय़मंदिर माहीम येथे होत आहे. त्यानिमित्त या पुस्तकातील एक भाग…

नऊ-दहा वर्षांपूर्वी माझं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. मीही नऊ-दहा वर्षांनी वयानं वाढलो. (याला शास्त्रशुद्ध निष्कर्ष काढणं म्हणतात.) माझे सासरे (ते सासूकडे राहायचे) नेहमी म्हणायचे, ‘ओल्ड एज इज अ कर्स’ – म्हातारपण हा शाप आहे. मी हे रोज अनुभवतोय. वयानं व त्या अनुषंगानं येणाऱ्या दुखण्यांनी जेरीला आणलंय. बरोबरीच्या कोणाशी पह्नवर जरी बोललं, तरी केवळ एकमेकांच्या दुखण्याची देवाणघेवाण होते. समोरच्याला दुखण्यात भारी पडणं, यातच विजय वाटायला लागतो. चार चार वेळा बोलावूनही एखादा आला नाही, तर त्याचं खापर मी माझ्याच म्हातारपणावर पह्डतो. कोणाला माझ्यात इंटरेस्टच राहिलेला दिसत नाही. मी आता बोलतोही पंटाळवाणं का? नाही हो, निदान तेवढा एक देवानं दिलेला गुण शेवटपर्यंत राहू द्या. माझा आतेभाऊ प्रत्येक वाक्यावर म्हणत असतो, ‘‘आयला, तुझ्याशी बोलणं म्हणजे कसला आनंद असतो.’’ ‘‘तथास्तु – तथास्तु – तथास्तु’’ मी पुटपुटलो.
समाज जीवनातून आपण हद्दपार होतोय ही भावना पोखरतेय. आता कार्यक्रमासाठी बोलावणी येईनाशी झालीत. राहत्या बिल्डिंगमधल्या जिन्यात कोणी रहिवासी भेटला की विचारतो, ‘‘कहाँ थे इतने दिन? अमेरिका में बच्चों के पास गये थे क्या?’’ मी घरातून हललेलो नाही, हे त्याला सांगण्याइतका उत्साह माझ्याकडे शिल्लक नसतो. जिना चढणं, उतरणं जिवावर येतं हेही मी त्याला सांगत नाही. त्याचं कोरडं चुकचुकणं ऐकणं मला नको असतं. ‘न किसी की ऑँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ…’
वाचकांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ येतात. मध्येच कधीतरी माझी सटकते व मी वाचकाला काहीतरी वेडंबिंद्रं लिहितो. तो चिडून व नातं विसरून मला खरमरीत उत्तर लिहितो. ते समोर धरून मी सुन्न होऊन बसून राहतो. काय चाललंय? ‘न किसी की ऑँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ…’
नवीन नवीन ‘गॅजेटस्’, ‘मोबाइलवरचे अॅप्स’ व त्यांचा बिनचूक वापर या सगळ्यांबाबत मी अनभिज्ञ आहे. परवा माझा टी.व्ही. अडकून बसला होता. माझी सर्व धडपड व्यर्थ ठरत होती. आता रात्री कोण मेपॅनिक येणार? मी सहज अमेरिकेतून माझ्याकडे पाहुणी आलेल्या माझ्या सात वर्षांच्या नातीला टी.व्ही.बद्दल सांगितलं. पंटाळलेल्या चेहऱयानं तिनं रिमोट हातात घेतला व क्षणार्धात टी.व्ही. पूर्ववत झाला. ‘‘काय केलंस?’’ मी काwतुकाश्चर्यानं विचारलं. तिला उत्तर देण्याची गरज भासली नाही. नाही तरी तिचं इंग्लिश मला कुठं कळत होतं? वर्तमानपत्रातील माझे पह्टो पाहून नातीच्या भावानं, म्हणजे नातवानं, मला कुतूहलाने विचारलं होतं, ‘‘आर यू अ सेलिब्रिटी ऑर अ क्रिमिनल?’’ त्या दोघांचेच पह्टो छापून येतात हे हिंदुस्थानात राहत नसताना त्याला कसं कळलं असेल? त्यानं मला अमेरिकेला पाचारण केलंय. माझा पाहुणचार करण्यासाठी नव्हे, तर मला शाळेत घालण्यासाठी. माझ्या चेहऱयावरील प्रश्नचिन्ह पाहून तो म्हणाला, ‘‘बिकॉज देअर आर नो स्कूल्स इन इंडिया.’’ ही अप्रतिम माहिती त्याला कोणी दिली असेल? वर्गातील मुलांनी?
‘‘अरे पण तू त्याला सांगत का नाहीस?’’ मी काहीशा चिडखोरपणे माझ्या प्राध्यापक डॉक्टर मुलाला विचारलं.
‘‘मी शाळेत गेलो होतो हेही त्याला मान्य नाही,’’ माझा मुलगा विरक्तपणे म्हणाला.
थोडक्यात, निरक्षर अडाणी कुटुंबात नातूराव जन्मले होते. सध्या मी सकाळी उठून अ आ इ ई घोकतो.
गेल्या नऊ-दहा वर्षांत काय घडलं? तसं म्हणण्यासारखं काहीच नाही. शरीरापेक्षा जास्त मी मनानं थकलो. येता-जाता अकारण कोणी मन दुखवेल या विचारानं धास्तावलो. बोलण्याचा अतिउत्साह आपोआप आटला. फिजूल बोलण्यातला पह्लपणा जाणवला. आपलं बोलणं ऐकण्यासाठी माणसं सुपाएवढे कान करून असुसून थांबतील हा भ्रम दूर झाला. लहानसहान सुखांनाही आपण पारखे झालोत या विचारांनी मन कष्टी झालं. ज्यांच्या गळ्यात गळा घालून सुख-दुःखाची देवाणघेवाण करावी, अशी जिवाभावाची मित्रमंडळी काळाच्या ओघात दुरावली. काही देवाघरी गेली. शिवाजी पार्क कट्टय़ावरचा ग्रुप विलीन झाला. चालणं झेपेना आणि माणसं तरी कुठं राहिली? आता विनोद करायचे कोणासाठी व कोणासमोर? संडासच्या टाकीमागे दारूची बाटली लपविणारा नंदू जुकर गेला. सुभाष गांगुली गेला. शिंग मोडून आमच्यात रमणारा अविनाश खर्शीकर गेला. रफीची गाणी ऑर्पेस्ट्रात गाणाऱ्या एका गायकाला ‘तुमच्यापुढे रफी काहीच नाही,’ असं गळ्याची शपथ घेऊन सांगणारा राजू गोडबोले गेला. आज कोणाला चेचता येईल हे भिरभिरत्या नजरेनं शोधणारा अभिजीत देसाई गेला. हवेतच इन् जनरल शिव्यांची फैर झाडणारा अशोक पानवाला गेला. गाडी पार्क करून रस्ता क्रॉस करताना शिव्यांची उजळणी करणारा पंपनीचा सी.ई.ओ. इंजिनीयर अजित गोगटे गेला.
मी अजून गेलेलो नाही हे मी सोडून आणखी कोणाला वाटत असेल का?