
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
अत्यंत जवळच्या व्यक्तीचा नैसर्गिक वा आजाराने होणारा मृत्यू भावनिक पातळीवर स्वीकारला न जाणे हे मानसिक अस्वास्थ्याकडे नेणारे आहे. यामुळे सतत विचार करून अपूर्ण (Unfinished business) विचारांची गर्दी जाणवते. ‘असं का?’ या विचारांच्या गर्तेत अडकून पुढे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस’ सतावू लागतो. यातून बाहेर पडायचे तर समुपदेशनाची सत्रे आणि योग्य उपचार यांची नितांत गरज भासते.
संपदा गेल्या काही दिवसांपासून जास्तच अबोल झाली होती. वैशालीताई (दोघींची नावे बदलली आहेत) त्यामुळे फारच अस्वस्थ झालेल्या होत्या. त्या आणि संपदा असा दोघींचाच संसार होता. वैशालीताईंचे पती तीन वर्षांपूर्वी एका गंभीर आजाराने निवर्तले होते. त्यानंतर संपदामध्ये बरेच फरक व्हायला लागले. तिने आपल्या वडिलांचे जाणे बुद्धीने स्वीकारले होते. मात्र मनाने हे कटू वास्तव स्वीकारायला नकारच दिला होता.
याच कारणासाठी वैशालीताई संपदाला सत्रासाठी घेऊन आल्या होत्या. संपदाही जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा तिनेही तिच्यासाठी समुपदेशन गरजेचे असल्याचे सांगितले. “मॅम, हल्ली काही दिवस माझं अभ्यासातलं लक्ष उडालेलं आहे. सारखे बाबांचे विचार येत असतात. त्यांचे शेवटचे दिवस सारखे सारखे आठवून डिस्टर्ब व्हायला होतं. आईच्या काही मैत्रिणी सारख्या फोन करत राहतात. जरा इकडचं तिकडचं बोलून झालं की, पुन्हा बाबांचे विषय काढत राहतात. आई माझी फोनवर स्ट्राँगली बोलते खरी; पण नंतर खूप अपसेट असते. मग मलाही निगेटिव्ह वाटायला लागतं आणि खरं सांगू? आईच्या त्या मैत्रिणींचा अस्सा मला राग येतो की, कधी कधी एकेकीला जाब विचारावासा वाटतो. तुमचे आहेत नवरे. मग असू देत ना. माझ्या आईला कायम ‘ती बिचारी आहे’ अशी जाणीव का करून देताय? एक आहे मैत्रीण तिची. सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड. ती आमच्या दोन्ही फॅमिलीची बरीचशी गेटटुगेदर्स झाली आहेत. आता ती कायम सांत्वनाच्या नावाखाली आईला फोन करणार आणि जुन्या मेमरी तारखेसकट उकरून काढणार. कालसुद्धा तेच झालं.’’ असे संपदा सांगत असताना वैशालीताईंनी तिला मध्येच थांबवले.
“पुढचं मला सांगू दे संपदा…’’ असं बोलून वैशालीताईंनी पुढचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या त्या सख्ख्या मैत्रिणीने फोन करून पुन्हा जुन्या आठवणींना तिच्या दृष्टीने ‘उजाळा’ द्यायला सुरुवात केली. पण त्यामुळे वैशालीताई दुखावल्या जात होत्या. त्यांनी बोलून झाल्यावर फोन ठेवला आणि त्या रडायला लागल्या. हे पाहून संपदाचाही पारा चढला आणि तिने रागारागात त्या मैत्रिणीला फोन लावला. राग तिला अनावर झाला होताच. त्याच संतापाच्या भरात तिने त्या मैत्रिणीचा भरपूर अपमान केला आणि घरचा फोन जोरात आपटला. बाजूला टीव्हीचा रिमोटही होता. तोही तिने आपटून फोडला. मग ती आपल्या रूममध्ये गेली. वैशालीताई या प्रकाराने घाबरल्या नि संपदाच्या मागे गेल्या. त्या रात्री दोघीही एकमेकींना बराच वेळ बिलगून रडत होत्या.
“मॅम, मला आता माझ्या रागावर कंट्रोल राहिला नाही. कायम माझी चिडचिड होत असते. आता माझं बारावीचं वर्ष आहे. मला पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे अभ्यासावर, पण या अशा गोष्टींमुळे माझं लक्ष उडतंय आणि…’’ बोलता बोलता संपदा थांबली. वैशालीताईंनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिने नजरेनेच त्यांना बाहेर जायला सांगितलं.
टेबलावर पाण्याचा ग्लास होता. तो तिने तोंडाला लावला. “आईला नक्की काही ऐकायला येणार नाही ना आपलं बोलणं,’’ संपदाने पुन्हा विचारून खात्री करून घेतली. “नाही येणार. बोल तू. नक्की का अपसेट आहेस ते.’’ आवंढा गिळत संपदा तिच्या चिडचिडेपणाचे तसेच तिच्या वडिलांच्या दुःखातून बाहेर न येण्याचे कारण सांगायला लागली.
संपदा आणि तिचे वडील यांच्यात खूप जिव्हाळ्याचे नाते होते. तिच्यासाठी तिचे वडील म्हणजे जीव की प्राण होते. तिला जर काही सांगायचे झाले तर ती न बोलता तिच्या वडिलांना कळत असे. एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे तिचे लाड होत होतेच आणि तेही तिच्या वडिलांकडून जास्त. अशा नात्याला अचानक खीळ बसली आणि संपदा आतून उद्ध्वस्त झाली. तिला ‘माझा सुपरहिरो आजारातून बरा होणार नाही’ हे वास्तव स्वीकारायला स्वतला तयार करायचे नव्हते. त्यात ती शाळेत होती आणि वैशालीताई कामावर जायच्या. घरी आजारी वडील आणि संपदा हेच दोघे उरायचे.
वैशालीताईंना नोकरी करणे भाग होते आणि त्यातच त्यांच्या नात्यातले कोणीही जवळ नव्हते. मग लहानग्या संपदावर बाबांची जबाबदारी आली. ती व्यवस्थित काळजीही घेत होती. मात्र वडिलांनी तिच्याशी त्यांच्या शेवटच्या दिवसांत नाळ तोडायला सुरुवात केली. हा धक्का तिला जबरदस्त बसला.
“संपदावर त्यांचा खूप जीव होता, पण तिच्याशी तुसडेपणाने बोलण्यालाही त्यांचं कारण होतं. तिला त्यांची सवय होती. त्यांना ती तोडायची होती. त्यांचा तिला राग यावा म्हणून ते तसं वागले.’’ वैशालीताई आवंढा गिळत म्हणाल्या.
“मला माहीत होतं ते. ते मला ओरडल्यावर तुझ्यासमोर मी नसताना ते रडायचे हेही मी पाहिलं आहे, पण त्यांनी का केलं असं? मी गोष्टी आक्सेप्ट केलेल्या ना. मग त्यांना गुड मेमरी क्रिएट करता आल्या नसत्या का?’’ असे म्हणत असतानाच संपदाचा बांध फुटला. “मला त्यांना शेवटच्या दिवसांत लाइफटाइम हॅपिनेस द्यायचा होता,’’ हे म्हणताना जशी संपदा रडली तशी ती मोकळी होत गेली. तिच्या भावनांचा निचरा होताना दिसत होता.
वास्तव हे होते की, संपदाच्या वडिलांना आधीच मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे त्यांनी संसारिक पाश कठोर होऊनच तोडायला सुरुवात केली होती. जेणेकरून त्यांच्या जाण्याने वैशालीताई आणि संपदा कमी दुःखी होतील. पण याचा परिणाम उलटा झाला आणि संपदा दुखावली गेली. तिच्या मनात त्यांची असलेली प्रतिमा पुसली जाऊ नये म्हणून तिचे केविलवाणे प्रयत्न चालू झाले. त्यात पूर्ण वेळ ती वडिलांचे आजारपण, त्यांना होणारे त्रास, त्यांचे विव्हळणे बघून जास्त कष्टी झाली. त्याच त्याच वातावरणात राहिल्याने संपदाला त्रास झाला.
संपदाबरोबर आता काम करणे सोपे होत गेले. तिच्यामध्ये अपूर्णत्वाची (Unfinished business) विचारांची गर्दी होती, ज्यामुळे ती अजूनही ‘असं का?’मध्येच होती. संपदाला ज्यामुळे ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस’ झाला होता. सत्रांमध्ये संपदाला वडिलांविषयी बोलते केले गेले, ज्यात तिच्या त्यांच्याविषयीच्या तक्रारी, तिला जे काही राहून गेलेले सांगायचे होते ते आणि मुख्य म्हणजे “मी तुमच्याशिवाय राहीन बाबा. डोन्ट वरी! मी तुमची मुलगी आहे. फायटर आहे मी. पण मला तुमची उणीव कायम भासेल.’’ हे सगळे तिच्याकडून व्यक्त झाले.
आज संपदा याच विचारांवर काम करत आहे आणि हळूहळू मोकळीही होत आहे. ती आता वडिलांविषयी बोलताना रडत नाही. उलट त्यांच्या आणि तिच्या ‘गुड मेमरीज’ जास्तीत जास्त शेअर करून खळाळून हसते. प्रत्येक सत्राशेवटी मात्र ती एक गोष्ट आवर्जून मान्य करते की, तिच्या बाबांची जागा कोणीही घेऊ नाही शकत. आता वैशालीताईही रिलॅक्स्ड आहेत.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)