अभिप्राय- समृद्ध जाणिवांचा आरसा

>>मानसी नीतिन वैद्य

मिटलेल्या डोळ्यांत दरवेळी स्वप्नंच असतात
असं कुणी सांगितलं तुला?
बऱयाच वेळा त्यात साठवलेले असतात
चाफ्याचे गंध,
आकाशाचे अनंत रंग
अगदी अलीकडेच कवयित्री दीपाली दातार लिखित ‘तळ्यातले आकाश’ हा कवितासंग्रह वाचला आणि वाटलं, हे असं साठवलेलं कितीतरी व्यक्त करायची गरज असताना, कवितेने हाक देणं किती सुंदर आहे. या कवितांमध्ये विचार आहे, अगदी समर्पक रूपकं आहेत; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपेपणा आहे. साध्याच शब्दात आपल्याला नेमकं काही सांगणाऱया अशा या कविता आहेत.

मला वाटतं, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक, जी प्रॅक्टिकल असतात. स्वप्नाळू गोष्टींच्या हाका कानाआड करून व्यावहारिक निर्णय घेणं त्यांना जमतं. एक असतात स्वप्नं पाहणारी! भावनेत अडकणारी; पण काहींना मात्र जगरहाटी कळते आणि मनाची वेडी हाकही पोहोचते. त्यांना सुखाच्या झोक्यांचा आनंद असतोच, पण सगळं काही शाश्वत नाही ही जाणीव विसरता येत नाही. या दोन्ही टोकांमधे समतोल साधत त्यांना आपल्या वाटेवर चालायचं असतं! या कसरतीत कधीतरी कुठेतरी मनाची होऊ शकणारी घालमेल या कवितेतून नेमकी आली आहे!

फार आधीपासून जे वाटायचं ते प्रकर्षाने या ओळींमधून जाणवलं! एखादी गोष्ट मिळाली की तिच्यापर्यंतचा प्रवास, ती ओढ संपते. पण कवितेच्या बाबतीत? तो प्रवास मात्र कविता लिहून संपू नये. मग कवीच्या हातात काय उरावं? ना त्याने लिहिलेली कविता, ना ध्येय गवसल्याचं समाधान.संग्रहाच्या उत्तरार्धातील क्षणिकासुध्दा वाचनीय आहेत. अल्पाक्षर रमणीयत्व हे त्यांचं वैशिष्टय़ आहे.

एका पाखराची हालचाल
त्यानंही भरून गेलंय… आभाळ

आभाळ फार विस्तीर्ण असतं. तसं पाहिलं तर कशाकशानेही ते भरून जाणार नाही. पण त्याच्या भल्यामोठय़ा, तरीही एकटय़ा पटलावर एखादं छोटं पाखरू भिरभिरलं की एकटेपण कमी होतं नि त्या भिरभिरण्याचीही सोबत वाटते… आणि मग ते भलं मोठं विस्तीर्ण आभाळसुद्धा त्या पाखरामुळे भरून येतं. वाटलं, कवीचंही असंच असतं का? दिसणारं, न दिसणारं, असलेलं, नसलेलं कितीतरी पाहू शकणारं, कळणारं मन जेव्हा कविता लिहून होत नसते तेव्हा एकटंच असतं आणि अशात या कवितेची निव्वळ चाहूल देणाऱया छोटय़ाशा विचारानेही असंच इतकंच भरून येत असेल का?
संग्रहाची अर्पणपत्रिका असेल, प्रतिभा रानडे यांचे आशीर्वादाचे दोन शब्द असतील, गीतेश शिंदे यांनी केलेलं समर्पक मुखपृष्ठ असेल किंवा मुकुंद दातार यांची मोजकीच, पण कवितेला पूरक रेखाटनं असतील, या सगळ्यांनीच पुस्तकाला वेगळेपण दिलंय.

तळ्यातले आकाश

कवयित्री ः दीपाली दातार

प्रकाशन ः सृजनसंवाद प्रकाशन

पृष्ठे ः 128, किंमत – रुपये 250/-