प्लेलिस्ट – गाणी असली-नकली

>> हर्षवर्धन दातार

भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात सुरुवातीच्या काळात ज्या संगीतकारांनी काम केलं त्यांची प्रत्येकाची एक विशिष्ट ‘असली’ स्टाईल होती. यात प्रयोग करीत संगीतकारांनी चित्रपटातील प्रसंगानुरूप त्यांच्या काही गाण्यांना ‘हटके’ किंवा ‘नकली’ चाल दिली. अशा काही संगीतकारांच्या ‘असली’ आणि ‘नकली’ चालीवरील गाण्यांचा हा आढावा.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासून आपल्या चित्रपटात संगीत, त्यातसुद्धा प्रामुख्याने स्वर संगीत अर्थात ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक आहे. पूर्वी तर नाटकसुद्धा संगीत-नाटक या प्रारूपातून प्रस्तुत होई. तुलनेने पाश्चात्य चित्रपटात प्रामुख्याने वाद्य संगीत हे जास्त ऐकायला मिळतं. स्वर-संगीत अर्थात गाणे हा प्रकार खूपच विरळ.

भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात सुरुवातीच्या काळात ज्या संगीतकारांनी काम केलं त्यांची प्रत्येकाची एक विशिष्ट ‘असली’ स्टाइल होती. गाणं किंवा त्यातलं संगीत ऐकून संगीतकार कोण हे आपल्याला बऱ्याच प्रमाणात सहज ओळखता येत असे. मात्र तरीही या संगीतकारांनी चित्रपटातील प्रसंगानुरूप त्यांच्या काही गाण्यांना ‘हटके’ किंवा ‘नकली’ चाल दिली. आज आढावा घेऊया अशा काही संगीतकारांच्या ‘असली’ आणि ‘नकली’ चालीवरील गाण्यांचा.

सूर आणि ताल या युगुलाला महत्त्व देणारे संगीतकार रामचंद्र चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा! सी. रामचंद्र (1918-1982) म्हणजे गायन, संगीत, दिग्दर्शन आणि वाद्यमेळाचा त्रिवेणी संगम. अण्णा म्हणजे मृदू मुलायम मेलडी आणि गोडवा याबरोबर उत्स्फूर्तता आणि जिंदादिली. मती गुंगवून  टाकणारी चाल त्याचबरोबर गरजेप्रमाणे अण्णांनी मेलडीत ‘रॉक अँड रोल’ पण अलगद मिसळला. त्या काळात भारतीय संगीताबरोबर प्रथमच पाश्चात्य संगीताचा अंतर्भाव करून लोकांना नाचायला लावलं ते अण्णांनी. ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे ‘शहनाई’ (1947) चित्रपटातलं गाणं पाश्चात्य वाटलं तरी अण्णांना ‘माझ्या एकट्याची एकट्याची मजा झाली’ या मूळ गोव्याच्या पोर्तुगीज बाज असलेल्या मराठी लोकगीतांतून ही चाल सुचली. आजाद (1955)- ‘कितना हसीन है मौसम’ आणि ‘राधा ना बोले’, नौशेरवाने-आदिल (1957)- ‘भूल जाये सारे गम’ आणि ‘तारो की जुबां पर’ आणि नवरंग (1958), अनारकली (1953) चित्रपटातली सर्व गाणी म्हणजे अवीट गोडी आणि माधुर्य. त्यात अर्थात त्यांच्या आवडत्या गायिकेचा, लताचा मुख्य सहभाग होता. मराठी चित्रपट घरकुल (1970) यात ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘नंबर 54 हाऊस विथ बांबू डोर’ या गाण्यातून आधुनिक अण्णा दिसले. अलबेला (1951) यात ‘शोला जो भडके’ आणि समाधी (1950) मध्ये ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’मधून त्यांनी उडत्या चालीची, नृत्यप्रधान गाणी दिली. थोडक्यात सांगायचं तर अण्णांचं संगीत हे असली आणि नकली समप्रमाणात विभागलं होत

अभिजात आणि इथल्या मातीचा सुगंध असणारं संगीत म्हणजे रोशनलाल नागरथ अर्थात रोशन! उर्दू साहित्य आणि काव्याची उत्कृष्ट जाण असलेल्या रोशन (1917-1967) यांची कारकीर्द केवळ 50 वर्षांची. शास्त्रीय संगीताकडे ओढा असणारे रोशन ‘मला चित्रपट संगीतात रस नाही,’ असं म्हणत 50 च्या वर चित्रपटांना संगीत दिलं. स्नेहल भाटकर यांच्या शब्दामुळे रोशन यांना केदार शर्मांनी बावरे नैन (1950) हा चित्रपट दिला आणि त्याचं रोशननी चीज केलं. नंतर मल्हार (1951), अनहोनी (1952) बरसात की रात (1960), चित्रलेखा (1964), ताजमहल (1963), अशा चित्रपटांतून अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिली. समृद्ध आणि उत्कट भाव असलेली ‘अब क्या मिसाल दूं’ आरती (1962) आणि ‘छुपा लो युंही’ – ममता (1966) हे अतिशय शांत समयी तेवत असल्याचा भाव व्यक्त करणारी गाणी ही रोशन यांची खासियत. तसेच ‘काहे तरसाये’ व ‘ए री जाने न दूंगी’ दोन्ही (चित्रलेखा-1964) आणि लागा चुनरी में दाग (दिल ही तो है -1963) ही शास्त्राrय रागांवर आधारित पण रोशन ‘आविष्कार’ असलेली गाणी. मात्र चांदणी चौक (1954) मध्ये ‘तेरा दिल कहां है’ हे एक वेगळ्या धाटणीच गाणं रोशननी केलं जे नौजवान (1951) मधील सचिन देव बर्मन यांच्या ‘ठंडी हवायें’च्या चालीवर बेतलेलं आहे. पुढे ममता (1966) मध्ये ‘रहे न रहे हम’ आणि अशीच जवळपास 10 गाणी या चालीतील छंद घेऊन झालेली आहेत. ‘न तो कारवाँ की तलाश है’ (बरसात की रात-1969) ही सर्वात गाजलेली अप्रतिम कव्वाली रोशन यांच्या अष्टपैलुत्वाची ओळख आहे. याच रोशननी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलला तोड देणारे कॉफी हाऊस (1953) मध्ये गीता दत्तच्या आवाजात ‘ये हवा ये फिजा’ हे स्पॅनिश फ्लॅमेन्को पाश्चात्य नृत्य-संगीतावर आधारित गाणं केलं. हे त्यांच्या तुरळक ‘नकली’ गाण्यांपैकी एक.

चित्रगुप्त श्रीवास्तव (1917-1991) हे त्या काळातील अर्थशास्त्र आणि पत्रकारिता विषयात पदवीधर उच्च विद्याविभूषित ‘शिकलेले’ संगीतकार. पुढे मुंबईला येऊन त्यांनी संगीत दिग्दर्शनात कारकीर्द करायचे ठरवले. सुरुवातीच्या काळात पौराणिक, स्टंट चित्रपट आणि भक्ती-भजन ही त्यांची जमेची बाजू होती. या क्षेत्रातील एस. एन. त्रिपाठींनी त्यांचे गुण ओळखले आणि त्यांना पुढे आणलं. लेडी रॉबिनहूड (1946) हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांनी प्रख्यात गायिका राजकुमारीबरोबर एक गाणं गायलं. भक्त पुंडलिक (1949) आणि वीर बब्रूवाहन(1949) चित्रपटातली गाणी गाजली. त्यांच्या चालीत हार्मोनियम, तबला आणि घुंगरू ही प्रामुख्यानं वाजणारी वाद्यं असत. तुलसीदास (1954) हा त्यातील रफींच्या गाण्यामुळे तुफान लोकप्रिय झाला. शिव भक्त (1955) हा चित्रपट त्यांना बर्मनदांच्यामुळे मिळाला आणि पुढे AVM बरोबर भाभी (1957) ‘छुपा कर मेरी आँखो मे’ आणि ‘चली चली रे पतंग मेरी चली,’ बरखा (1959) -‘चल उड जा रे पंछी’ आणि मै चूप रहुंगी (1962) हे चित्रपट त्यांच्या संगीताकरिता गाजले. चित्रगुप्त हे सरळ आणि सोप्या चालींकरिता जाणले जातात. गंगा कि लहरे (1964) – ‘मचलती हुई हवाये’ आणि ‘छेडो ना मेरी जुल्फे’, ऊंचे लोग (1965)- ‘जाग दिले दिवाना’, वासना (1968)- ‘ये पर्बतो के दायरे’ ही त्यांची नेहमीच्या सरळ सोप्या शैलीतली गाजलेली गाणी. पुढे चित्रपट संगीतात भरगोस वाद्यमेळ प्रचलित झाला आणि चित्रगुप्त यांनीसुद्धा या बदलाशी जमवून घेतलं आणि पाश्चात्त्य शैलीतल्या चाली केल्या. दो शिकारी (1974) या काऊबॉय चित्रपटात अभिनेता विश्वजीतनी गायलेले ‘ऐ दिल मेरी जान’ हे  हॉलीवूडच्या ‘द गुड बॅड अग्ली’च्या शीर्षक संगीतावर बेतलेलं गाणं केलं. तसंच ‘कभी धूप कभी छांव’ (1971) मध्ये उषा अय्यरकडून ‘मै भी जलू तू भी जले’ हे क्लब साँग गाऊन घेतलं. पुढील भागात 1950-60च्या दशकातील आणखी काही नामवंत संगीतकारांच्या ‘असली’ आणि ‘नकली’ शैलीबद्दल परामर्श घेऊया.

[email protected]

(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)