पहिले-वहिले मानवनिर्मित यान ‘पार्कर’ परवा 24 डिसेंबरला थेट सूर्याच्या वातावरणाला भिडले! सूर्यस्पर्श झालेली ती पहिली मानवनिर्मित वस्तू. सूर्य ‘पाहिलेले’ यान असाही आपण ‘पार्कर प्रोब’चा गौरव करू शकतो.
तसा तर सूर्यस्पर्शी आपल्याला रोजच होत असतो. जरा वेळ उन्हात गेलं तर सौर किरणांचा उष्ण स्पर्श लगेच जाणवू लागतो, परंतु तो स्पर्श सूर्याने त्याच्या जागी स्थिर राहून किरणहस्तांनी स्वतः केलेला असतो. सौर वातावरणाला स्पर्श करायला काही आपण 15 कोटी किलोमीटरवर जात नाही आणि ते शक्यही नाही, पण आपणच म्हणजे माणसाने निर्माण केलेलं पार्कर यान तिथपर्यंत गेलं आणि त्याने सूर्याला ‘स्पर्श’ केला! म्हणूनच ती अंतराळ संशोधनाच्या इतिहासातली महत्त्वाची घटना ठरली.
हे ‘चटका’ लावणारं साहस कसं काय साध्य झालं? त्याची सुरुवात थेट – 12 ऑगस्ट 2018 या दिवशी झाली. युजिन पार्कर या तंत्रज्ञ शास्त्रज्ञाच्या नावाने हे यान थेट सूर्याकडे झेप घ्यायला निघालं… आणि 24 डिसेंबरला आपल्याकडे 6 वाजून 40 मिनिटं झालेली असताना त्याने सूर्याच्या ‘करोना’ किंवा प्रभामंडलाच्या बाहेरच्या भागाला स्पर्श केला! यावेळी त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग ताशी 6 लाख 90 हजार किलोमीटर एवढा होता. (म्हणजे सेकंदाला 191 कि.मी.) 2018 मध्ये पुढच्या सात वर्षांत सूर्य पाहून आणि त्याचे पह्टो घेऊन सूर्याच्या अंतरंगातही डोकावण्यास साहस पार्कर-प्रोब करणार आहे.
सूर्य आपला जनकतारा. तो आपल्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि सौरमालेत आपली पृथ्वी अशा ठिकाणी आहे की, जिथलं तापमान सजीवसृष्टीला पोषक ठरू शकतं. उन्हाचा पारा पन्नाशीकडे गेला तर आपण सूर्यावर संतापतो, पण बुध, शुक्रावरचं तापमान पाहता आपला टिकाव तिथे लागणार नाही. तिथे पार करपायला होईल आणि सूर्यस्पर्श करण्याचा विचार केला तर प्रचंड तापमानाने राखच होऊन जाईल. याउलट गुरू, शनी अशा दूरस्थ ग्रहांवरची अक्षरशः मरणाची थंडी आपल्याला गोठवून टाकेल. त्यामुळे ‘हॅबिटेबल झोन’ असलेली आपली पृथ्वीच आपल्यासाठी उत्तम. पृथ्वीबाहेरच जायचं तर चंद्र किंवा मंगळ. परंतु अजूनपर्यंत तरी तिथल्या सोयिस्कर वस्तीचं सत्यात उतरायला बराच अवधी लागेल.
असा हा सर्व ग्रहांचा ऊर्जास्रोत असलेला सूर्य आदिम काळापासून माणसाच्या कुतूहलाचं स्थान आहे. तोच जीवनदाता आहे याची कल्पना असल्याने प्रत्येक संस्कृतीने त्याला देवत्वही दिलं. त्या काळात ते साहजिकही होतं. आता मात्र विज्ञानातला सूर्य त्याची अनेक रूपं आपल्याला दाखवतो तेव्हा अचंबित करतो. त्याची ही विविधतेने नटलेली पिवळी-लाल ‘तबकडी’ सनराइज आणि सनसेट पॉइंटला 15 कोटी किलोमीटरवरून विलोभनीय वाटत असली तरी त्याचं जवळून दर्शन किती दाहक आहे याचा अनुभव पार्कर प्रोब घेत असेल.
उड्डाणानंतर सहा वर्षे अथक आणि सुनियोजित प्रवास करून सूर्यस्पर्श करणारं हे यान कसं तयार झालं? त्याची कहाणी 2009 पर्यंत मागे जाते. त्या वर्षी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने त्यासाठीच आराखडा बनवायला सुरुवात केली आणि तब्बल नऊ वर्षांनी हा ‘सोलर प्रोब’ तयार झाला. मग त्याला शिकागो विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ ‘युजिन न्यूमज पार्कर’ याचं नाव त्यांच्या हयातीतच देण्यात आलं.
सौरवारे, सौरकिरीट किंवा प्रभामंडळ, सौरज्वाला आणि त्याचा सभोवतालच्या ग्रहमालेवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्याचं ‘कार्य’ ‘पार्कर प्रोब’कडे सोपवण्यात आलं. सौरवादळं, त्यांचे कंपन (ऑप्टिलेशन) आणि सूर्याचं व्हॉबलिंग म्हणजे थरथर या सर्व गोष्टींमागची कारणे अधिक स्पष्टतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 4 डिसेंबर 2019 रोजी ‘पार्कर’च्या सोलर मॅग्नेटिक फिल्डच्या ‘शक्ती’विषयीची माहिती समोर आली. ‘प्रोब’च्या असं लक्षात आलं, हजारो ‘आक्रमक’ सौरचुंबकीय लाटा ताशी 4,80,000 किलोमीटर वेगाचे सौरवारे निर्माण करतात, तर काही वेळा याच्या अगदी उलट घडतं.
‘पार्कर सोलर प्रोब’ला सूर्यापासूनच्या 56 लाख किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात सौरप्रारणांमुळे निर्माण झालेली ‘कॉस्मिकडस्ट’सुद्धा आढळली. 25 सप्टेंबर 2022 रोजी ‘नासा’ने जी निकटसूर्य धूमकेतूंची यादी बनवली आहे त्यापैकी एक धूमकेतू ‘सापडला’. हा ‘सनग्रेझर’ धूमकेतू नासाच्या या मोहिमेतील पीटर बॅरेट यांनी शोधलेला होता. (हे सनग्रेझिंग धूमकेतूनंतर सूर्यबिंबात विलीन होतात.)
सूर्यापासून 90 लाख किलोमीटर अंतरावरून 21 वेळा सूर्य परिक्रमा केल्यानंतर ‘पीएसपी’ सूर्यस्पर्श करू शकलं! आपल्याकडे जन्मतःच सूर्याकडे झेप घेणाऱ्या हनुमंताची कथा आहे. ‘पीएसपी’ मात्र सूर्याकडे जाण्याच्या हेतूनेच वैज्ञानिकांनी जन्माला घातलं आणि त्याने गेलं वर्ष संपता संपता आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार आज्ञाधारकपणे आपलं सौरस्पर्शाचं उद्दिष्ट गाठलं. त्याचं आणखीही बरंच काम बाकी आहे. ते झालं की आणखी काही महिन्यांनी योग्य ती माहिती किंवा डेटा (विदा) पाठवून ते स्वतःला सूर्य समर्पित करेल. वैज्ञानिकांच्या या तेजस्वी यशाचं कौतुक नि अभिनंदन!
वैश्विक