ठसा – सव्यसाचि पत्रकार

>> दिलीप जोशी

दोन्ही हातांनी सारख्याच क्षमतेने शरसंधान करू शकणाऱया धनुर्धराला सव्यसाचि म्हणतात. थोडक्यात, अनेक कलागुणांवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीसाठी हे विशेषण वापरलं जातं. नुकतेच निवर्तलेले ज्येष्ठ-श्रेष्ठ पत्रकार आणि ‘मार्मिक’चे भूतपूर्व कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत असंच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व.

त्यांच्याशी परिचय झाला तो पन्नास वर्षांपूर्वी आणि मैत्री झाली तीही त्याच भेटीपासून. त्यापूर्वी मी त्यांचा वाचक होतो. त्याचे विविध विषयांवरचे लेख वाचताना त्यातील सखोलता जाणवायची. पुढे अर्धशतकाच्या मैत्रीपर्वात या साऱया गोष्टी आणि त्यामागचा सावंतांचा अभ्यास चकित करत गेला. वरकरणी विनोदी, उपरोधात्मक वाटणाऱया त्यांच्या लिखाणात एखाद्या विषयाचं प्रदीर्घ चिंतन असायचं.

नवं काही आढळलं की ते समजून घेतलं पाहिजे या वृत्तीतून सावंत स्वतःला घडवत गेले. नाहीतर एक शाळा शिक्षक, मग मुंबईत बस कंडक्टर आणि नंतर पत्रकार, संपादक, चित्रकार, छायाचित्रकार, वक्ता, लेखक तसेच एखाद्या गंभीर विषयाला भिडणारा निडर बातमीदार… अशा अनेक ‘भूमिका’ सावंतांनी लीलया साकारल्या. बरं, इतकं अफाट कर्तृत्व कधी ‘मिरवावं’ असं त्यांच्या मनात कधीच आलं नाही. ज्येष्ठांचा आदर करतानाच, नव्या पिढीतल्या होतकरू गुणवंतांना, सहकाऱयांना समजून घेत प्रोत्साहन देत त्यांच्यातला संपादक कार्यरत असायचा.

‘श्री’ साप्ताहिकात आम्ही सुमारे पाच वर्षं एकत्र काम केले. पहाटे लवकर उठून पंढरीनाथ त्यांच्या ‘वाटय़ाचे’ दोन-चार लेख लिहूनच ऑफिसात यायचे, मग नव्या विषयांवर चर्चा, गप्पा. त्यातून पुन्हा नव्या वृत्तांचा शोध आणि पाठपुरावा. सावंतांच्या लेखणीला कोणताच विषय वर्ज्य नव्हता. लेखनाची प्रत्येक शैली त्यांनी आत्मसात केली होती. अमूक एका विषयावर लेख ‘हवाय’ असं आमच्या सर्वांच्या बोलण्यातून ठरलं, की कार्यविभागणी ठरायची. सर्वांत तातडीचा आणि प्रगल्भता असलेला लेख, फोटो, चित्र काहीही उत्साहाने, वेळेत सादर करण्यात सावंतांची बरोबरी कोणी करू शकत नव्हतं.

एकदा ‘श्री’ साप्ताहिकासाठी एका विषयावर सावंतांनी ‘कव्हर स्टोरी’ लिहिली. शेवटी प्रश्न उरला तो ‘कव्हर’चा. आमचे संपादक सोपारकर म्हणत, कव्हर बोलपं असलं पाहिजे. वाचकाला ताबडतोब आशय समजला पाहिजे. पण त्या विषयासाठी कोणा व्यक्तीचा आवश्यक फोटोच मिळेना. एकच धूसर फोटो सापडला. काही क्षण विचार करून सोपारकर म्हणाले,

‘पंढरी, याचं रंगीत पोर्ट्रेट जमेल?’

क्षणाचाही विलंब न करता सावंतांनी त्यांचं रंगसाहित्य काढलं. एक पॅन्व्हास समोर पसरला आणि चहूबाजूला साप्ताहिकातील गडबडीचं वातावरण असताना अवघ्या दोन तासांत एकाग्रतेने त्यांनी एक सुंदर पोर्ट्रेट चित्तारलं आणि बालसुलभ उत्सुकतेने सर्वांना दाखवलं. आम्ही सर्वच स्तिमित झालो होतो. कुशल चित्रकलेबरोबरच सावंतांना सुरेल गळाही लाभला होता.

आम्हा सगळ्यांना कठीण वाटणाऱ्या कामांचा दोन-तीन तासांत फडशा पाडला की सावंत त्यांचा अभिजात खटय़ाळपणा करायला मोकळे. एकदा एकजण ऑफिसात आला. काय त्याचं ‘भाग्य’ म्हणून थेट सावंतांसमोर उभा ठाकला! लेखनात गुंतलेल्या सावंतांनी प्रश्नार्थक मान वर केली. ‘साप्ताहिकाचं वार्षिक मूल्य किती?’ त्या अनामिकाचा प्रश्न.

‘हा संपादकीय विभाग आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्क्युलेशन विभागात जाऊन विचारा. पण माझ्याकडून हवंच असेल तर ऐका, आम्ही सर्व जे काही लिहितो ते केवळ अमूल्य असतं आणि शाश्वत मूल्य हवं असेल रद्दीच्या दुकानात विचारा.’ तो माणूस जागच्या जागी थिजला आणि पुष्पा त्रिलोकेकर चेहरा फुटेपर्यंत (हे पंढरीचेच विशेषण) हसत राहिल्या.

असे अनेक किस्से. परंतु याच धुरंधर माणसाने प्रबोधनकारांचा शिष्य म्हणून केलेलं काम, मराठवाडय़ातल्या जळजळीत दुष्काळात प्रसंगी अनवाणी फिरून केलेलं रिपोर्टिंग, स्काऊटचे संस्थापक बेडन पॉवेल यांच्या नातेवाईकला करून दिलेलं पॉवेलचं पोर्ट्रेट, अनेक विषयांवरचं उपहासात्मक विनोदी लेखन, अणुशक्तीपासून दुसऱया महायुद्धावर लिहिलेली पुस्तकं, ऐंशी वर्षांनंतर ठिकठिकाणी भ्रमंती करून घेतलेले कलात्मक फोटो आणि अनेक जलरंग चित्र, त्यात मी केलेल्या त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या ‘ग्रीटिंग’साठी एका रात्रीत केलेलं सेल्फ पोर्ट्रेट अशा कितीतरी गोष्टी मनात येतायत. महिनाभरापूर्वीच विख्यात चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी त्यांचं ‘स्केच’ केलं आणि त्याचंच भेटपत्र देऊन आम्ही पंढरीनाथ सावंतांचा नव्वदावा वाढदिवस साजरा केला. नऊ दशकाचं स्वानंदी आणि सभोवतालच्यांना ज्ञानसंपन्न करणारं समृद्ध जीवन पंढरीनाथ सावंत यांच्या जाण्याने संपलं. असं आशीर्वाद देणारं आता फारसं कुणी राहिलेलं नाही. या ज्येष्ठ मित्राला आदरांजली!