लेख – बलुचींचा संघर्ष निर्णायकतेकडे?

>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात विविध भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये जवळपास शंभर जणांचे प्राण गेले. एका बसमधून 50 पंजाबी मजूर प्रवाशांना उतरवून त्यांना बलुची लोकांनी गोळ्या घातल्या. 1948 सालापासून बलुची लोक पाकच्या हुकूमशाहीविरुद्ध झुंज देत आहेत. बलुची लोकांचा लढा हा लोकलढा आहे. पाकिस्तानच्या अन्यायकारक आणि विषमतावादी धोरणांचा बलुची आंदोलन हा परिपाक आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एक नवा बांगलादेश निर्माण होऊ शकतो.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान हा भूप्रदेशाच्या दृष्टीने मोठा प्रांत, परंतु लोकसंख्या आणि भूप्रदेशाच्या तुलनेत तेथील बलुची लोकांच्या विकास प्राधान्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेथील प्रादेशिक सरकारवर पंजाबी लोकांचे वर्चस्व आहे. एकूणच तेथील सार्वजनिक व राजकीय जीवनात बलुची लोकांना उपेक्षेचे म्हणजे दुय्यम दर्जाचे जीवन जगावे लागते. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा संताप व्यक्त होत आहे व त्याचेच प्रत्यंतर म्हणजे पाकमध्ये अलीकडे झालेल्या घटना होय. बलुचिस्तानच्या विविध भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये जवळपास शंभर जणांचे प्राण गेले. एका बसमधून 50 पंजाबी मजूर प्रवाशांना उतरवून त्यांना बलुची लोकांनी गोळ्या घातल्या. 1948 सालापासून बलुची लोक पाकच्या हुकूमशाहीविरुद्ध झुंज देत आहेत. गेल्या वर्षभरात तर अशा दहा-बारा घटना ठळकपणे घडल्या. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये दहशतवाद वाढत आहे. ‘करावे तसे भरावे’ या न्यायाने पाकिस्तानने पंजाबात खलिस्तानला पाठीशी घातले. तसेच कश्मीरात दहशतवादाचे भूत वाढविले. आता खुद्द पाकिस्तानला बलुचिस्तानसारख्या, पश्तुनिस्तानसारख्या प्रांतामध्ये डोके वर काढत असलेल्या दहशतवादाशी सामना करावा लागत आहे ही कर्म शोकांतिका म्हणावी लागेल.

आर्थिक दृष्टीने शोषण आणि साधन सामग्रीचे व विकास फळांचे अन्याय्य व विषम वितरण हे बलुचिस्तानचे खरे दुखणे आहे. तेथे पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. तसेच सार्वजनिक संस्थांमधूनसुद्धा लोकांच्या विकासाला संधी नाही. त्यामुळे बलुची तरुण असंतुष्ट झाला आणि तो हिंसक मार्गाचा उपयोग करून आपला असंतोष व्यक्त करीत आहे. त्याचेच प्रत्यंतर अलीकडील काही घटनांवरून येते. ‘ऑब्झर्व्हर’ संशोधन प्रतिष्ठानने केलेल्या पाहणीवरून आर्थिक शोषण व विषमता हे बलुची आंदोलनाचे मुख्य कारण आहे, हे सूत्र समोर आले आहे. पाकिस्तान सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे बलुची तरुण हे दहशतवादाकडे वळणे साहजिक आहे. बलुचिस्तानमध्ये कमालीचे दारिदय़ आहे, गरिबी आहे व उपासमार आहे. त्याचे कारण म्हणजे पाकचे स्वार्थी धोरण. तेथे सोने, चांदी आणि तांब्याच्या विपुल खाणी आहेत. भरपूर खनिज संपत्ती आहे, परंतु ही सर्व संपत्ती केंद्र सरकार लाटते आणि त्याच्या तुलनेत प्रदेशाला व स्थानिक जनतेला मात्र भरघोस माप मिळत नाही. हा असंतोष हेच तेथील दहशतवादाचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते.

पाकिस्तान सरकार आणि तेथील अन्यायकारक लष्कराच्या विरोधात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे बीएलए या दहशतवादी संघटनेने जबरदस्त मोहीम आखली आहे. ही मोहीम इतकी प्रभावी आहे की, त्यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारने त्यापासून धसका घेतला आहे. गेल्या काही दिवसांत पाक लष्कराच्या ‘ऑपरेशन हेरॉफ’ या मोहिमेला बीएलएने चोख उत्तर दिले आहे आणि आपली स्वातंत्र्याविषयीची ऊर्मी व जाणीव जगापुढे ठेवली आहे. बलुचिस्तानात असलेल्या पाकिस्तानी लष्करी चौक्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावर प्रतिहल्ले करण्यात बीएलएने यश मिळवले आहे.

बलुचिस्तानात खरे मालक बलुची लोक आहेत, पण त्यांच्यावर वरवंटा फिरवतात. पंजाबी लोक! पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एकूण सभासद संख्या 336 आहे. त्यापैकी पंजाबमधील सभासदांची संख्या 173 आहे, पण बलुची लोकांचे मात्र संसदेमध्ये फक्त 20 प्रतिनिधी आहेत. तिथेही त्यांचा आवाज दाबून टाकला जातो. ही विषमता मोठी चिंताजनक आहे. तसेच पंजाबमधील लोकांच्या साक्षरतेचे प्रमाण 66 टक्के आहे, तर बलुची लोकांची साक्षरता जेमतेम 40 टक्क्यांच्या जवळपासही नाही. ‘इन्साफ का तराजू’ पाकिस्तानातील अन्यायी राजसत्तेच्या हातात आहे. आज जरी बलुची लोकांची थोडी पीछेहाट झाली आहे असे वाटत असले तरी भविष्यकाळात विजय बलुची लोकांचाच होईल. स्वातंत्र्यप्रिय असे बलुची लोक अन्यायी राजसत्तेविरुद्ध झुंज देऊन नवा इतिहास घडवतील यात शंका नाही. त्यामुळे बलुचिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही.

पाकिस्तानच्या लष्कराशी लढणाऱया बीएलएच्या शूर, पराक्रमी स्वातंत्र्यवीरांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आत्मबलही मोठे आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सरकारी सैन्याच्या प्रगत शस्त्रास्त्रांची पर्वा न करता निकराचा लढा चालू ठेवला आहे. बीएलएचा म्होरक्या जिहाद बलुची याने असा दावा केला आहे की, पाकिस्तानच्या सैन्याला नामोहरम करून पाकचे बलुचिस्तानातील वर्चस्व कायमचे संपविण्याच्या व्यापक मोहिमेचा हा लढा एक भाग आहे. त्यांच्या मुक्ती लढय़ाचा हा प्रारंभ आहे असे त्यांना वाटते. हे बंडखोर पाकिस्तानच्या तावडीतून बलुचिस्तानला मुक्त करून त्याला स्वतंत्र करू इच्छितात, परंतु पाकिस्तान मात्र हे आंदोलन चिरडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर छापेमारी झाली, हल्ले झाले. त्यांचे मनोबल कमी व्हावे म्हणून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही झाले, परंतु त्यांनी जिद्द मात्र सोडली नाही.

या सर्व संघर्षामागे खरे कारण काय असेल तर ते आर्थिक विषमता आणि आपले शोषण होत आहे ही भावना हे होय. स्थानिक व प्रादेशिक पातळीवर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक तरुणांना डावलले जात आहे, त्यांची उपेक्षा केली जात आहे अशी भावना तरुणांमध्ये बळावल्यामुळे पाक सरकारविरोधी भावना अधिक प्रक्षुब्ध झाल्या आहेत. लष्कर असो, राजकारण असो किंवा सरकारी नोकऱया असोत, या सर्व बाबतीत पंजाबी लोकांचा वरचष्मा असून स्थानिक बलुची लोकांना मात्र उपेक्षित ठेवले आहे अशी तरुणांची भावना आहे व त्यात बरेचसे तथ्य आहे. पाकिस्तानमधील पीप्स शांतता संशोधन संस्थेने केलेल्या पाहणीतसुद्धा आर्थिक विषमतेबाबतच्या कारणास त्यांनीही दुजोरा दिला आहे. बलुचिस्तानातील लोकांमध्ये विकासाची मधुर फळे आपल्याला दिली जात नाहीत, अशी तीव्र भावना तयार झाली आहे. ही फळे पंजाबी लोकच लाटतात आणि आपल्याला मात्र दूरवर ठेवतात ही भावना हे असंतोषाचे मूळ कारण आहे, असे म्हटले जाते. ‘पंजाबी तुपाशी आणि बलुची उपाशी’ अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. अगदी शेजारील स्थानिक अफगाणिस्तानमधील अनेक प्रादेशिक गटांना जेवढी विकासाची संधी आहे, तेवढीसुद्धा बलुचिस्तानमधील लोकांना नाही. त्यामुळे त्यांचे दुःख अधिकच चिंताजनक आहे. पंजाबी लोक संपन्न असूनही बलुची लोक मात्र दरिदय़ात खितपत आहेत असे विषम चित्र कधी बदलणार? त्यामुळे बलुची तरुणांना उठाव करावासा वाटला व त्यांनी हातामध्ये बंदुका घेतल्या. त्यांचे नशीब कधी बदलणार? हा खरा प्रश्न आहे.

बलुची लोकांचा लढा हा लोकलढा आहे. स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांचा लढा आहे. पाकिस्तानच्या अन्यायकारक आणि विषमतावादी धोरणांचा बलुची आंदोलन हा परिपाक आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एक नवा बांगलादेश निर्माण होऊ शकतो. बलुचिस्तान विचित्र संकटात सापडला आहे. प्रदेश मोठा विशाल आहे, भूमी संपन्न आहे. खनिज संपत्ती उपलब्ध आहे. सोने, चांदी व तांब्याच्याही खाणी आहेत. कोळसाही उपलब्ध आहे, पण त्या सर्व साधन सामग्रीचा लाभ पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारने घेतला आहे आणि बलुची लोकांच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत ही भावना विषमता निर्माण करणारी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळकटी देणारी आहे. त्यासाठी नैतिक सामर्थ्य हवे आहे. उद्या स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ अधिक व्यापक बनली आणि तिने पाकिस्तानला चांगला धडा दिला तर त्यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात बांगलादेशप्रमाणे आणखी एक नवे राष्ट्र जन्माला येऊ शकते. तेव्हा बीएलए या संघटनेच्या पाठीशी आशियातील लोकशाहीप्रधान राष्ट्रांनी उभे राहून या संघटनेला अधिक बळकटी दिली पाहिजे. त्यामुळे कश्मीर व पंजाबमधील पाकच्या कारवायांना प्रतिशह देणे शक्य होईल. भारताच्या सक्रिय सहकार्याचा आणि अन्य आशियाई देशांच्या सहकार्याचा हात त्यांच्या पाठीशी राहिला तर बलुची लोक अधिक निकराची लढाई करू शकतील.