>> शहाजी शिंदे
ऑनलाइन गेमिंगमुळे घरबसल्या पैसे कमावण्याची संधी असल्याचा दावा निर्मात्यांकडून केला जात असला तरी तो धोकादायक आहे. छत्तीसगडच्या महादेव बेटिंग अॅपनेदेखील हजारो युजरना गंडा घातला आहे. तब्बल सहा हजार कोटींचा गंडा घालणारा बेटिंग अॅपचा निर्माता सौरभ चंद्राकर दुबईत पोलिसांच्या ताब्यात आहे. केंद्र सरकार, आरबीआय तसेच स्वयंसेवी संस्थांकडून वारंवारपणे अशा जोखमीच्या
अॅपपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात असतानाही काही मंडळी लोभापायी बळी पडत आहेत. ‘फँटसी स्पोर्टस्’ या गेमचे नाव या यादीत सहभागी झाले आहे. काय आहे हा ‘नवा गेम’?
सोशल मीडियावर सध्या हिमांशू मिश्रा नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिमांशूने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ऑनलाइन गेमिंगमध्ये 96 लाख रुपये गमावल्याचा दावा केला. 96 लाख रुपये गमावल्याने कुटुंबीयांनी नाते तोडल्याची आपबीती हिमांशू या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना सांगत आहे. या जोडीला उन्नाव पोलीस खात्यातील कर्मचारी सूर्यप्रकाशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सूर्यप्रकाशने ऑनलाइन गेमिंगमध्ये 15 लाख रुपये गमावल्याचा दावा केला आहे. याच वर्षी जुलै महिन्यात ऑनलाइन गेमिंगमध्ये एका व्यक्तीने कोट्यवधी रुपये गमावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी रमण चौहान यांनी दोन वर्षांत ऑनलाइन गेमिंगपायी 1.4 कोटी रुपये गमावले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन 50 लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ऑनलाइन गेमिंगमध्ये रमण यांनी पैसे गमावल्याचे समोर आले.
ही केवळ तीन उदाहरणे आहेत. आणखी असंख्य जण अशा गेमिंगला बळी पडलेले असतील. कमी श्रमात अधिक पैसे कमावण्याच्या नादात बरेच जण आपली कष्टाची कमाई या आभासी दुनियेत गमावून बसताहेत. अलीकडच्या काळात हिंदुस्थानात ऑनलाइन गेमिंगचे प्रस्थ वाढले आहे. त्याला ‘फँटसी स्पोर्टस्’ असेही म्हटले जाते. ‘फँटसी स्पोर्टस्’ने हिंदुस्थानात दोन दशकांपूर्वी प्रवेश केला, परंतु त्याला वेग आला तो 2016 नंतर. ‘फँटसी स्पोर्टस्’मध्ये युजर हा अॅप किंवा संकेतस्थळाच्या मदतीने संघ तयार करतो आणि पॉईंट्स गोळा करतो. गुणांच्या हिशेबाने कमाई होते. ‘फँटसी स्पोर्टस्’चे दोन प्रकारचे मॉडेल असतात. पहिले म्हणजे ‘फ्री टू प्ले’ म्हणजे खेळण्यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही आणि दुसरे म्हणजे ‘पे टू प्ले’ त्यात स्पर्धा खेळण्यासाठी पैसे भरावे लागतात.
अमेरिकेत ‘फँटसी स्पोर्टस्’ची सुरुवात 1952 मध्ये झाली. हिंदुस्थानात 2001 मध्ये ईएसपीएन-स्टार स्पोर्टस्ने एकत्र येऊन या खेळाची सुरुवात केली. अर्थात ती 2003 मध्ये बंद करण्यात आली. 2016 मध्ये जेव्हा इंटरनेट स्वस्त झाले, तेव्हा ‘फँटसी स्पोर्टस्’चा बाजार नव्याने वाढला. फेडरेशन ऑफ इंडियन ‘फँटसी स्पोर्टस्’च्या (एफआयएफएस) माहितीनुसार जून 2016 पर्यंत ‘फँटसी स्पोर्टस्’ खेळणाऱयांची संख्या वीस लाखांपर्यंत होती. 2027 पर्यंत ही संख्या 50 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात एवढी संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आपल्याकडे इंटरनेट स्वस्त आहे. स्मार्टफोन युजरदेखील 70 कोटींपेक्षा अधिक आहेत. 2025 पर्यंत देशात 90 कोटी स्मार्टफोन असतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय ‘फँटसी स्पोर्टस्’ ऑफर करणारे अनेक अॅप्स हिंदुस्थानी भाषांत उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर यूपीआयमुळे ऑनलाइन पेमेंट करणेदेखील सोयीचे झाले आहे, परंतु या
ऑनलाइन गेमिंगवर पैसे कमावण्यासाठी डोकं खाजवताना डोक्याला हात लावण्याची वेळ कधी व कशी येईल हे सांगता येत नाही.
ऑनलाइन गेमिंगच्या जगात ‘फँटसी स्पोर्टस्’चा बाजार वेगाने वाढला आहे. आता बहुतांश लोक स्टेडियममध्ये खेळण्याऐवजी आपल्याच फोनवर काल्पनिक खेळण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. यात काहीजण यशस्वी होतात तर काहीजण हिमांशू, रमण, सूर्यप्रकाशप्रमाणे प्रचंड पैसा गमावून बसतात. पैसे गमावण्याची जोखीम असतानाही ‘फँटसी स्पोर्टस्’चा बाजार वाढतच आहे. ‘एफआयएफएस’च्या अहवालानुसार हिंदुस्थानात सध्या ‘फँटसी स्पोर्टस्’चा बाजार 75 हजार कोटी रुपये एवढा आहे. एवढेच नाही, तर ‘फँटसी स्पोर्टस्’ निर्मात्यांचा महसूलदेखील वेगाने वाढत आहे. 2018-19 या काळात 924 कोटी रुपये महसूल राहिला असावा असा अंदाज आहे. 2026-27 पर्यंत तो 25,300 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. याशिवाय 2018 ते 2022 यादरम्यान ‘फँट्सी स्पोर्टस्’ इंडस्ट्रीकडून 4500 कोटी रुपयांचा करदेखील सरकारला मिळाला आहे. त्यात 2800 कोटी रुपये तर जीएसटी होता. एका अंदाजानुसार 2023 पासून 2027 या कार्यकाळापर्यंत या उद्योगातून सरकारला 26 हजार कोटी रुपयांचा कर मिळेल. एका अहवालानुसार, स्पोर्टस् इकॉनॉमीमध्ये ‘फँटसी स्पोर्टस्’चे योगदान 3100 कोटी रुपयांचे आहे, म्हणजेच ‘फँटसी स्पोर्टस्’ वार्षिक 3100 कोटी रुपये
स्पॉनरशिपवर खर्च करत आहे. 2026-27 पर्यंत हा खर्च वाढत 6500 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.
2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली. एक वर्षानंतर हर्ष जैन आणि भवित सेठ यांनी एकत्र येत ‘ड्रीम 11’ लाँच केले. ड्रीम 11 मध्ये युजर आपला संघ तयार करतो आणि खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर गुण जमा करतो. गुण जेवढे अधिक, तेवढे पैसे जास्त. आज ‘ड्रीम 11’ ‘फँटसी स्पोर्टस्’मधील सर्वात मोठी कंपनी झाली आहे. हिंदुस्थानात या प्रकारातील 90 टक्के बाजारावर ‘ड्रीम 11’चा ताबा आहे. 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 6385 कोटी रुपये एवढा होता. क्रिकेट विश्वात ‘फँटसी स्पोर्टस्’ची कमालीची लोकप्रियता वाढली आहे. आता युजर वुमेन क्रिकेटमध्येदेखील फँटसी संघ तयार करत आहेत. ‘फँटसी स्पोर्टस्’ खेळणारे 40 टक्के युजर 25 ते 34 या वयोगटातील आहेत, तर 18 ते 24 वयोगटातील युजरची संख्या 35 टक्के आहे. दहा टक्के युजर आठवडय़ातून दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा हा गेम खेळतात.
ऑनलाइन गेमिंगमुळे घरबसल्या पैसे कमावण्याची संधी असल्याचा दावा निर्मात्यांकडून केला जात असला तरी तो धोकादायक आहे. छत्तीसगडच्या महादेव बेटिंग अॅपनेदेखील हजारो युजरना गंडा घातला आहे. तब्बल सहा हजार कोटींचा गंडा घालणारा बेटिंग अॅपचा निर्माता सौरभ चंद्राकर दुबईत पोलिसांच्या ताब्यात आहे. केंद्र सरकार, आरबीआय तसेच स्वयंसेवी संस्थांकडून वारंवारपणे अशा जोखमीच्या
अॅपपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात असतानाही काही मंडळी लोभापायी बळी पडत आहेत.
(शहाजी शिंदे संगणक प्रणाली तज्ञ आहेत)