किस्से आणि बरंच काही- जुनं ते सोनं, कारण…

>> धनंजय साठे

अवीट चाल असलेली, विचारपूर्वक लिहिलेली, कथेला अनुसरून असलेली जुनी गाणी आपल्या भावभावनांशी जुळली गेलीआहेत. त्यामुळेच ती अखंड गुणगुणली जातात. या जुन्या गाण्यांची शेल्फ लाईफ इतकी वर्षे राहण्यामागे हेच कारण असावं की, पूर्वीच्या गाण्यांमध्ये मेलडी होती. ताजेपणा होता

आपण लहानपणापासून गाण्याच्या भेंडय़ा खेळत आलो आहोत. ज्याला हायफाय समाजात अंताक्षरी या गोंडस नावानेही संबोधलं जातं. या भेंडय़ा खेळायला कोणतीही महागडी सामग्री लागत नाही. जर महागडं काही असेल तर तो आपला वेळ असू शकतो. पण तेवढा वेळ आपण सगळेच मनोरंजनासाठी काढतो. घराच्या अंगणात असो वा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या टाइमपास म्हणून लहान-मोठे सगळेच गाण्यांच्या भेंडय़ा कुठेही चालू करू शकतात. ही प्रस्तावना एवढय़ाच करता की, आपण थोडं लक्ष दिलं तर भेंडय़ांमध्ये बहुतांश वेळा 50 च्या दशकापासून ते 90 किंवा अगदी 2010 पर्यंतची सर्व गाणी असतात. म्हणजे उदाहरणार्थ भेंडय़ा खेळताना ‘ज’ आलं तर पटकन ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे गाणंच पटकन सुचतं. पण क्वचितच कोणाच्या डोक्यात ‘जुम्मे कि रात है’ हे गाणं सुचेल. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं हे असू शकतं की, पूर्वीची गाणी, त्याचे शब्द अतिशय विचारपूर्वक लिहिलेले असायचे. सिनेमाच्या कथेला अनुसरून असायचे. त्यात कविता, शायरी असायची. गाण्यात अभिनय करणाऱया कलाकारांना चपखल बसणारी असायची.  त्याला अवीट अशी चाल लावलेली असायची. त्या गाण्याला कोणता गायक /गायिकेचा आवाज  योग्य न्याय देईल याचा बारकाईने अभ्यास करून त्यानंतरच ती गाणी श्रोत्यांसमोर पेश होत असत. प्रत्येक गाण्यामागे गाण्याच्या प्रत्येक गोष्टींवर प्रचंड मेहनत घेतली जायची. म्हणून ही गाणी आजही आपल्या स्मृतीत कोरली गेली आहेत. आपल्या भाव-भावनांशी जुळली गेली आहेत. आंघोळ करताना, दाढी करताना, गाडी चालवताना, कामं करताना त्याच्या ओळी लोक सहजपणे गुणगुणताना दिसतात.

हल्ली वादळासारखी निर्माण झालेल्या ‘कराओके’च्या कार्यक्रमांमध्ये देखील आजही किशोर, रफी, मुकेश, कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, अनुराधा पौडवाल, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याच गाण्यांना प्राधान्य मिळत आहे. फार कमी वेळा अन्य गायकांची गाणी गायली जातात. गाणाऱयांना ही जुनी गाणी गाताना एक वेगळाच आनंद मिळतो.

या जुन्या गाण्यांची शेल्फ लाईफ इतकी वर्षं राहण्यामागे हेच कारण असावं की, पूर्वीच्या गाण्यांमध्ये मेलडी होती. ताजेपणा होता. भारत स्वतंत्र झाला त्या वेळचे ‘आयेगा आयेगा आनेवाला’ हे गाणं आजही तितकंच फ्रेश वाटतं. जणू काही हल्लीच रिलीज झालंय. त्या काळात युगल गीत ध्वनिमुद्रित व्हायची तेव्हा गायक-गायिका माईकसमोर एकत्र उभी राहायचे आणि संगीतकाराने इशारा केला की गायक गायला व वादक वाजवायला लागायचे. ध्वनिमुद्रण करताना एक जरी चूक झाली की सगळं पुन्हा पहिल्यापासून करायला लागायचं. त्यामुळे गायक आणि वादक सगळे आपल्या कलेत निपुण असायचे आणि वारंवार चुकाही कमीच व्हायच्या. पण मेहनत खूप असायची. इतकी मेहनत घेतल्यावर ते गाणं गाजलं नाही तर नवल!

या सगळ्या महान गायकांची तपश्चर्या खूप मोठी होती. आजच्या तरुण व उभरत्या गायकांनी आधी मेहनत घेणं, ती शिकणं गरजेचं आहे. भाषेचा, उच्चारांचा अभ्यास करून, त्यातला भाव ओळखून आणि परिपक्व होऊन मग गाण्याकडे वळायचं. लता मंगेशकरसारख्या थोर गायिकेला दिलीप कुमार यांचे ‘मंगेशकर मतलब घाटी!’ हे उद्गार इतके जिव्हारी लागले की त्यांनी खास उर्दू भाषा शिकवणारे एक मास्टर नेमले आणि उर्दू भाषा आणि योग्य उच्चारणावर एवढी मेहनत घेतली की कोणाची काय बिशाद, की लतादीदींच्या खास करून उर्दू उच्चारांमधल्या कोणी काय त्रुटी काढतील…! हे ध्येय आणि परिश्रम घेण्याची जिद्द आणि पर्फेक्शन साधण्याची इच्छा असल्याशिवाय असंच कोणी लता मंगेशकर होत नाही.

पूर्वी तुम्ही किमान ‘गायक’ असणं अपेक्षित होतं. आजकाल अॅाटोटय़ुनरवर खेळणं उपलब्ध झाल्यामुळे एखादी श्रेया घोषाल किंवा सोनू निगम वगळता सगळेच स्वतला गायक /गायिका समजतात. ऑटोटय़ुनर बेसूर आवाजही सुरेल बनवतो. त्यामुळे हाडाचे गायक सापडणं आज जरा दुर्मिळच झालं आहे. या सगळ्या गदारोळात संगीताचा दर्जासुद्धा घसरत चाललाय, हे निश्चित. वाद्यवृंद इतका लाऊड असतो की गायकाचे शब्द विरून जातात. लक्षात राहात नाहीत. लोकांना हेच आवडतं म्हणून आम्ही हेच बनवतो, असं बोलून श्रोत्यांवर खापर फोडणं योग्य नाही. साफ चूक आहे. तुम्ही दर्जेदार कलाकृती देऊन तर बघा! श्रोते इतके चोखंदळ आहेत की ते उचलून धरतील… नक्कीच!

[email protected]

(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)