मुद्दा – संविधान विटंबनेचा गुन्हा क्षम्य आहे?

>> दिवाकर शेजवळ

संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱया व्यक्तीवर राष्ट्रीय मानचिन्ह सन्मान कायद्याखाली कारवाई करण्यात येते. अशा प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे. तसेच अशा प्रकरणात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास उपद्रव देण्यास कारणीभूत ठरलेल्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 191 अंतर्गत दंगलीची कारवाई होते. त्यातदेखील दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांच्या दंडाची तरतूद आहे. तसेच आरोपीच्या कोणत्याही कृतीमुळे जर सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले असेल किंवा कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असेल, तर अशा व्यक्तीवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत कारवाई होते. त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा आर्थिक दंड होऊ शकतो. त्याचा अर्थ परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा आरोपी हा त्या कायद्यानुसार शिक्षेला पात्र आहे. त्याने केलेले कृत्य हे राष्ट्रीय सन्मान चिन्हाचा अनादर करण्याचा गुन्हा आहे. अर्थातच, तो क्षम्य ठरू शकत नाही.

विशेष म्हणजे, तो प्रक्षोभक गुन्हा करण्यासाठी त्याने निवडलेला दिवस (11 डिसेंबर) हा नेमका परभणी शहरात बांगलादेशविरोधी मोर्चाचा म्हणजे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करू शकणारा होता. त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस तपास हा त्या दिशेने पुढे सरकण्याची गरज आहे. पण त्याऐवजी परभणीचा आरोपी जिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाल्याची छायाचित्रे आणि त्याने माफी मागितल्याच्या बातम्या शनिवारी ठळकपणे प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या आरोपीने रुग्णालयातून वा पोलीस कोठडीतून बाहेर पडल्यावर घटनास्थळी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंदन केले असते तर समजू शकले असते. त्याला उपरती, आपल्या गुन्हेगारी कृत्याचा पश्चात्ताप झालाय, असे मानता आले असते. पण तसे न घडता वेगळेच घडल्याचे दिसत आहे. बाहेरून काही जणांनी रुग्णालयात सोबत नेलेल्या संविधानाच्या जनकाच्या प्रतिमेसमोर आरोपी नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. त्याआधी रुग्णालयात गेलेल्या चारचौघांनी त्याला जाब विचारत धारेवर धरले, असे दृष्यही व्हायरल झालेल्या त्या क्षणाच्या एका व्हिडीओतून दिसले आहे. एका पश्चात्तापाच्या खऱया भावनेतून न आलेल्या, उत्स्फूर्त नसलेल्या अशा प्रकारच्या प्रतिमा वंदनात आणि माफी मागण्यात काय हशील आहे? परभणीच्या आरोपीची रुग्णालयातील ती माफी शिक्षेला पात्र असलेल्या त्याच्या प्रक्षोभक गुन्हेगारी कृत्याचे गांभीर्य आणि तीव्रता विरघळवून टाकण्यास कारणीभूत ठरणार तर नाही ना? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच महाराष्ट्र पोलिसांच्या पुढील तपासाची सखोलता, त्याची सत्यशोधक दिशा आणि बळकट पुराव्यांचे संकलन यातूनच मिळणार आहे. गृहखात्याच्या सचोटीची प्रचीती परभणी प्रकरणातून सर्वांना येणार आहे.

  • छत्रपती शिवरायांसहित महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा उदात्त वैचारिक वारसा लाभलेल्या आपल्या राज्यात संविधान प्रतिकृतीची विटंबना घडली आहे. ‘पुरोगामी’ ही ओळख आणि विशेषण लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राची त्यातून चुकीची व लांच्छनयुक्त प्रतिमा उभी राहते आहे. ते कोण रोखणार आहे?