लेख : आजचा आणि उद्याचा जाहीरनामा – नेक्सस

>> प्रणव सखदेव

अश्मयुगामध्ये मानवी नेटवर्क्स म्हणजे जाळी कशी होती. मग शेतीच्या शोधानंतर म्हणजे शेतीक्रांतीच्या काळात ती कशी बदलली. औद्योगिक क्रांतीनंतर त्यात कोणते आमूलाग्र बदल झाले आणि आता एआय बाल्यावस्थेत असताना काय होत आहे व भविष्यात मानवाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि पर्यायाने जागतिक स्थितीत कोणते मोठे बदल घडू शकतात याचा ऊहापोह जगप्रसिद्ध लेखक युवाल नोहा हरारी यांनी त्यांच्या ‘नेक्सस’ या नव्या पुस्तकात केला आहे.

जगप्रसिद्ध लेखक आणि बुद्धिवंत युवाल नोआ हरारी यांच्या नव्या पुस्तकाचं ‘नेक्सस’चं भाषांतर करण्याची विचारणा झाल्यावर तत्काळ होकार दिला आणि संहिता झपाट्याने पुस्तक वाचून काढले. तेव्हा लक्षात आलं की, हे पुस्तक फार मोठा आवाका कवेत घेतं आणि म्हणूनच ते अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्सस आजच्या आणि उद्याच्या कळीच्या प्रश्नांना भिडतं. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि त्याच्या सर्वक्षेत्रीय वापरातून निर्माण होणारे प्रश्न यांचा सखोल ऊहापोह हरारी यांनी यात केला आहे. अश्मयुगामध्ये मानवी नेटवर्क्स म्हणजे जाळी कशी होती. मग शेतीच्या शोधानंतर म्हणजे शेतीक्रांतीच्या काळात ती कशी बदलली. औद्योगिक क्रांतीनंतर त्यात कोणते आमूलाग्र बदल झाले आणि आता एआय बाल्यावस्थेत असताना काय होत आहे व भविष्यात मानवाच्या सामाजिक, सांस्पृतिक, राजकीय आणि पर्यायाने जागतिक स्थितीत कोणते मोठे बदल घडू शकतात याचा ऊहापोह या पुस्तकात आहे.

माहिती म्हणजे काय?

आज जगभरात माहिती म्हणजे सत्य असा विचार केला जातो यावर सखोल भाष्य पुस्तकात आहे. माहितीबद्दलचा भाबडा दृष्टिकोन असं मानतो की, कोणतंही असत्य व चुकीची गोष्ट खोडून काढण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी अधिकाधिक माहिती मुक्तप्रकारे, खुल्या पद्धतीने समाजव्यवस्थांत वाहू देणं गरजेचं असतं. पण माहिती ही नेहमी सत्य म्हणजेच वास्तवाचं प्रतिनिधित्व करतेच असं नाही. त्यामुळे माहिती तथ्य जरी नसली तरी कथा निर्माण करून अनेक माणसांना जोडू शकते, व्यवस्था बांधू शकते असं ते सांगतात. पण सत्य किंवा वास्तव यांचं दर्शन घडवू शकत नाही. जसं की, चलन अर्थात पैसा, देश या कथा आहेत. प्रत्यक्षात त्या कोणत्याही ठोस वास्तवाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, पण हजारो-लाखो लोक या कथांवर विश्वास ठेवतात. परिणामी ते एकमेकांशी बांधले जाऊन गुंतागुंतीच्या मानवी व्यवस्था निर्माण करतात.

लोकशाही आणि एकाधिकारशाही

माणसाने आधुनिक काळात लोकशाही आणि एकाधिकारशाही या दोन व्यवस्था शोधल्या. या दोन्ही व्यवस्था कशा काम करतात हे हरारी सोदाहरण स्पष्ट करतात. थोडक्यात सांगायचं तर लोकशाही व्यवस्थेत माहिती वेगवेगळ्या मार्गांमधून मुक्तपणे फिरत असते. कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवस्थेला ती मिळवता येते. सरकार, न्यायपालिका, तपास यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमं असतात. इथे माहितीचं विकेंद्रीकरण झालेलं असतं. इथे राज्यघटना केंद्रस्थानी असली तरी तो दोषातीत आहे असं मानलं जात नाही, तर त्यातल्या चुका कालानुरूप बदलता येऊ शकण्याची मुभा दिलेली असते. त्यामुळेच तर राज्यघटनेत दुरुस्ती करता येऊ शकते, पण बायबलमध्ये मात्र अशी दुरुस्ती करता येत नाही. एकाधिकारशाही व्यवस्थेत एकाच केंद्रातून इतरत्र माहिती वाहते. त्या केंद्राचं माहितीवर नियंत्रण असतं. त्यामुळे कोणती माहिती वाहू द्यायची, कोणती अडवून ठेवायची हे केंद्र ठरवतं. हे स्पष्ट करताना स्टॅलिन काळातील यूएसएसआरमध्ये झालेली वाताहतीचं उदाहरणं हरारी देतात.

एआय वेगळं का आहे?

काॅम्प्युटरची अर्थात एआयची जाळी त्याआधीच्या सगळ्या तंत्रज्ञानांपेक्षा म्हणजे छापखाने, रेडिओ, तारयंत्रणा यांच्यापेक्षा वेगळी कशी आहेत हे स्पष्ट करतात. छापखाने त्यांनी काय छापायचं हे ठरवू शकत नाहीत, पण एआयची बुद्धिमत्ता जसजशी वाढते आहे तसे तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे छापखान्यांवर जसं मानवाचं नियंत्रण आहे, तसं नियंत्रण एआयवर राहू शकेल का? असा कळीचा प्रश्न ते विचारतात. यासाठी ते अनेक उदाहरणं देतात, एका बडय़ा टेक कंपनीने एक एआय तयार केला. तो ट्विटवर मुक्तपणे सोडून दिला. काही तासांत तो शिवीगाळ करणं, महिलांना कमी लेखणं यांसारखी वक्तव्यं करू लागला. प्रत्यक्षात त्याला तसं काहीही शिकवलेलं नव्हतं अथवा त्याचा अल्गोरिदमही तसा नव्हता. पण अभ्यासांती असं लक्षात आलं की, त्याने ट्विटर अवकाशातील डेटा घेतला आणि त्यातून तो शिकला की, इथे असंच बोललं जातं आणि हीच विचारप्रणाली इथे चालते.

एआयचे परिणाम आणि आपण

पुस्तकाच्या अखेरीस हरारी एआयमुळे लोकशाही आणि एकाधिकारशाही या दोन्ही व्यवस्थांवर काय परिणाम होतील याचा विचार करतात. तो करताना ते सध्या उफाळून आलेल्या राजकारणातील लोकप्रियतावादाचं विश्लेषण करतात. समाजमाध्यमांच्या अल्गोरिदम्समुळे पसरवला जाणारा द्वेष, हिंसा यांची उदाहरणं देतात. एआयमुळे नोकऱ्यांच्या बाजारात मोठी उलथापालथ घडत आहे आणि पुढेही ती घडत राहील. नव्या नोकऱया निर्माण होतील हे खरंच, पण नोकऱयांमध्ये सतत होणारे बदल आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणं यांचा कालावधी कमालीचा कमी होईल. त्यामुळे या सामाजिक अस्थैर्याचा लोकशाहीवर दूरगामी व मोठा परिणाम होऊ शकेल. ते म्हणतात की, एआयवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज जग एकत्र आलं पाहिजे, पण ते कधी नव्हे इतका प्रत्येक देश आणि त्या देशाचा नेता आपापल्यापुरता विचार करतो आहे. एआयचा वापर करून निर्माण केलेली शस्त्रं मोठा विध्वंस करू शकतात. अशा वेळी जर प्रत्येकाने आपापली एआय क्षेत्रं अर्थात त्या-त्या देशाची जाळी निर्माण केली आणि या जाळ्यांना एकमेकांशी व्यापक पातळीवर संवाद साधता आला नाही, तर भूराजकीयरीत्या तसंच मानवी अस्तित्वाच्या दृष्टीनेही मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आज एआय म्हणजे अमानवी कृत्रिम बुद्धिमत्ता बाल्यावस्थेत असताना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कोणते निर्णय घेतले पाहिजेत याचं दिशादर्शन हरारी करतात.

हरारी आपलं म्हणणं मांडताना अनेक उदाहरणं देतात, विश्लेषण करतात. जागेच्या मर्यादेमुळे ती इथे देणं शक्य नाही. त्यामुळे ती मुळातून वाचायला हवीत. ते त्यांच्या मांडणी गोष्टीरूपाने सांगतात. त्यामुळे हा गंभीर, पण आपल्या जगण्याशी थेट संबंधित असलेला विषय समजायला सोपा जातो. अश्मयुगापासून ते एआयच्या युगापर्यंत माहितीच्या जाळ्यांत काय बदल होत गेले, पुढे काय होणार आहेत याची गोष्ट असणारं हे पुस्तक मला मराठी भाषेत आणता आलं याचा विशेष आनंद आणि समाधान आहे.