>> गीतेश शिंदे
नववर्षाचा पहिला रविवार आलादेखील आणि गतवर्ष केव्हा सरले हे कळलेही नाही, इतक्या जलद गतीने काळ पुढे सरकत असतो. आयुष्यातील सुखाच्या क्षणी सशाच्या पावलांनी धावणारा हाच काळ दुःखाच्या राज्यातून प्रवास करताना मात्र कासवाच्या पावलांनी मार्गक्रमण करतो अशी भावना प्रत्येकाच्याच मनात दाटून येते; पण त्या-त्या काळाला अनुसरून प्रेरक ठरणारा व एकूणच आपली मानसिक, शारीरिक परीक्षा पाहात कणखर करणारा कोणता न कोणता संकल्प सरत्या वर्षात प्रत्येकजण नववर्षासाठी मनी योजत असतो.
मूळात कोणताही संकल्प करण्यापूर्वी ‘संकल्प’ या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. योगिक तत्त्वज्ञानानुसार संकल्प म्हणजे मनापासून योजलेली इच्छा, एक गंभीर व्रत, अंतःकरणातील शुद्ध हेतू किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने केलेला मनोनिग्रह होय. हे `Resolution’ या इंग्रजी संकल्पनेसारखेच आहे. ‘संकल्प’ हा शब्द संस्कृतमधून आलेला असून त्याचा संधी विग्रह ‘सम् कल्प’ असा होतो. एखाद्या सर्वोच्च सत्याशी जोडलेले कल्प, म्हणजेच व्रत असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी संकल्पाची संकल्पना अंतकरणाच्या सर्वोच्च हेतूशी जोडली तर परिस्थितीच्या विपरीतही ती मिळवता येऊ शकते. अर्थात त्यासाठी दृढनिश्चय असणे फार गरजेचे असते. म्हणूनच कदाचित आपल्या परंपरेत वा धर्मात कोणत्याही विधीच्या आधी वा नवे कार्य प्रारंभताना प्रथम संकल्प केला जातो.
या संकल्पास पुरातन काळापासून महत्त्व दिले गेले आहे. कित्येक राजे-महाराजांनी, पराक्रमी वीरांनी संकल्पांच्या आधारावर अनेक राज्ये जिंकली. गमावलेली राज्ये परत मिळवली. काहींनी तपश्चर्या केली व ते उच्च स्थानावर पोहोचले, एवढी प्रचंड ताकद या संकल्पात असते. मनाला दिलेला आदेश बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर सिद्धीस नेताना माणसाच्या आत्मबळाची कठोर परीक्षा घेतली जाते. हा निग्रह जितका कठोर, न डगमगणारा तितकाच त्याचा परिणाम यशस्वी असतो. उदा. प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यावर राजा भरताने त्यांच्या पादुका मस्तकी लावून असा संकल्प केला की, ‘यापुढे ह्या सिंहासनाचे खरे वारसदार श्रीराम परत येईपर्यंत मी अत्यंत त्यागी वृत्तीने, निरपेक्ष भावनेने त्यांच्या नावाने राज्यकारभार चालवेन.’ राजा भरताचा हा मनोनिग्रह पुढील चौदा वर्षांत कणभरही ढळला नाही. या दरम्यान अनेक मोहमायांचे चकवेही त्यांच्या अवतीभवती होते; परंतु भरताचे आत्मबळ कैकयीच्या आमिषांना कदापि बळी पडले नाही. पण त्याउलट दुर्योधनाचा संकल्प होता की, ‘सुईच्या अग्रावर मावेल इतकीही भूमी मी पांडवांना देणार नाही.’ इतिहास साक्षीदार आहे की, भरताच्या संकल्पामुळे रामराज्य टिकले, तर दुर्योधनाच्या संकल्पामुळे महाभारत घडले. याचाच अर्थ, उत्कर्ष व विध्वंस या दोन्हींस संकल्प कारणीभूत ठरतो, इतकी ताकद त्यात असते. त्यामुळे आपण केलेला संकल्प कोणाला मारक तर ठरणार नाही ना हेही तपासून घ्यायला हवे.
पण येता-जाता फक्त संकल्प सोडून काही हाती लागते का? संकल्प हा मनाला दिलेला आदेश असतो. पुढे बुद्धीच्या बळावर तो पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी, चिकाटीने त्याच्या मागावर राहावे लागते. नाहीतर काही जण ऊठसूट संकल्प करताना दिसतात; पण संकल्पाच्या काटेरी रस्त्यावरून चालणे सर्वांनाच जमते असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात अगदी मोजक्या सवंगडय़ांसह महादेवाच्या पिंडीवर रक्ताचे अर्घ्यदान देत स्वराज्याचा संकल्प सोडला आणि पुढे संपूर्ण शक्तीने युक्तीच्या बळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते वास्तवात आणताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागला; परंतु महाराज डगमगले नाहीत, की मावळेही हटले नाहीत.
याचा अर्थ, संकल्प हे व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नसून त्यात समाज घडविण्याची वा इतिहास बदलण्याची प्रचंड शक्तीही असते. याच इच्छाशक्तीच्या बळावर लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ म्हणजे एकप्रकारे टिळकांनी केलेला हा संकल्पच होता. इतकेच काय, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये मातृभूमीच्या विरहात लिहिलेले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे महाकाव्य व त्यातली प्रत्येक ओळ म्हणजे संकल्पच होता. तर दुसरीकडे वीर भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनीदेखील स्वातंत्र्यपूर्तीसाठी संकल्प करत आपल्या प्राणांच्या समिधा त्या धगधगत्या अग्निकुंडात अर्पण केल्या. अर्थात त्या काळी स्वातंत्र्य मिळवणे हे जरी एकमेव ध्येय असले तरी प्रत्येकाच्या संकल्पपूर्ततेची पद्धत निराळी होती. त्याच काळात महात्मा गांधींनी केलेल्या एकेका आवाहनात त्यांचे संकल्प दिसून येतात. त्यांना अहिंसेची, करुणेची झालर असल्याचे लक्षात येते.
आपल्या धर्मात वैदिक कार्य व कर्म करताना संकल्प सोडणे या प्रकारास खूप महत्त्व आहे. एखादे कार्य सिद्धीस नेण्यास परमेश्वराचा आशीर्वाद पाठीशी असावा व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे संकल्प असाही एक अर्थ घेता येऊ शकेल. म्हणूनच शिवरायांनी महादेवाच्या पिंडीला साक्षी ठेवून संकल्प सोडला होता. शुद्ध अंतःकरणाने स्वराज्याची प्रार्थना केली होती. संकल्प म्हणजे निर्धार, मनाला दिलेला आदेश, त्याच्याशी केलेला अलिखित करार. पण असा करार अलिखित जरी असला तरी त्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी तारेवरची कसरत ही करावीच लागते. सकारात्मकता जागवणारे लोक आपल्या आयुष्यात असले तर संकल्पपूर्तीच्या दिशेने आपली दमदार पावले पडत राहतात एवढे मात्र खरे! एकवेळ न्यू इयर रिझोल्युशन दिवाळीतील अग्निबाणाप्रमाणे हवेत विरून जाईलही, पण संकल्पाच्या बळाने कमावलेला मनोनिग्रह मेरू पर्वताप्रमाणे अचल राहतो. त्यामुळे कार्य सिद्धीस नेण्यास मीही असा संकल्प करतो की…