किस्से आणि बरंच काही – नेपोटिझमचे वास्तव

>> धनंजय साठे

सिनेमा उद्योग हा एक व्यवसाय आहे जिथे चढते सूरज को सब सलाम करते है… अशी अवस्था आहे. यात नेपोटिझमही तितक्याच ताकदीने काम करते. पण ते एखाद दुसऱया चित्रपटापुरते. म्हणूनच मेरिटवर काम मिळणं हे ध्येय असलं पाहिजे. सर्वच क्षेत्रात नेपोटिझमच्या दुर्दैवी वास्तवाला सामोरं जावे लागते. यातील दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा.

आपण अनेक वेळा रिक्षा, ट्रक, टेम्पोच्या मागे `आई वडिलांची पुण्याई’ हे वाक्य लिहिलेलं वाचतो. याच वाक्याला व्यावसायिक रूप दिलं की सध्याच्या काळात प्रचंड चर्चेत असलेला नेपोटिझम या शब्दाचा जन्म होतो. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर  आईवडिलांच्या वशिल्यावर आपापल्या क्षेत्रात सहजरीत्या प्रवेश करणं, संधीचं वा करिअरचं दार उघडणं. यालाच नेपोटिझम असं नाव दिलं गेलं आहे. या वशिल्याच्या बळावर पहिली किंवा जास्तीत जास्त दुसरी संधी मिळते. परंतु जिथे आर्थिक गुंतवणूक असते तिथे पैसे लावणाऱया निर्मात्याच्या मते `धंदा’ किती झालाय हेच निर्णायक ठरतं.

पुन्हा अपेक्षांचं ओझं पेलणं हे काही सोप्पं नव्हे. भले भले या ाtढर वस्तुस्थितीचे बळी ठरले आहेत. म्हणतात ना, एका मोठय़ा वृक्षाखाली वाढणाऱया रोपटय़ाची वाढ खुंटते. आता आपल्या सिनेसृष्टीचंच उदाहरण घ्या ना. अभिषेक बच्चन याने कितीही ढोर मेहनत केली, कितीही आदळआपट केली तरी त्याची तुलना हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तमत्त्वाचे पिता अमिताभ बच्चन यांच्याशी होते. तशी तुलना होऊ शकते का? तर ते अशक्य आहे. अमिताभ यांचा मुलगा आहे म्हणून जे. पी. दत्तासारख्या मोठय़ा निर्मात्याच्या `रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे त्याचे दणक्यात आगमन झाले. पडद्यावर अभिषेक बच्चन हाच दिसणार होता ना… म्हणजेच पाण्यात पडल्यावर पोहणं हे अभिषेक बाबानेच करणं अपेक्षित होतं. म्हणजे यशस्वी पित्याचा पुत्र म्हणून पहिली संधी मिळाली तरी सिध्द करणं पुत्राची जबाबदारी असते. आज नावापुढे बच्चन आडनावाच्या आधारावर जे मिळेल ते काम तो करतोय आणि याची सल पिता अमिताभ यांना नक्कीच भोगावी लागत आहे, हे त्यांच्या `एक्स’वरच्या पोस्टवरून कळतं.

एके काळी सिनेसृष्टी गाजवलेले ज्युबिली स्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव. याचा पहिलाच सिनेमा `लव्ह स्टोरी’ सुपरडय़ुपर हिट झाला आणि कुमार गौरव रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. स्टारपुत्र म्हणून मिळालेली पहिली संधी धमाकेदार ठरली. पण पुढे घसरगुंडीवरून धाडकन जमिनीवर… जितेंद्रपुत्र तुषार कपूरचीही तीच गत. अशी कितीतरी उदाहरणं सिनेसृष्टीत आहेत. याला अपवाद हृतिक रोशन आणि संजय दत्त, ज्यांनी सूर्योदय पाहिला. परंतु अनन्या पांडे, खुशी कपूर, इब्राहिम अली खान अशा असंख्य ठोकळ्यांपेक्षा फिल्म इंडस्ट्रीत कुणाचेच पाठबळ, ओळख नसलेले शाहरुख खान, मिथुन पावर्ती, राजकुमार राव, आयुष्मान खुराना… या अभिनेत्यांनी स्वबळावर, स्वमेहनतीवर, अभिनय कौशल्याच्या जोरावर आज नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवलाय, हे जास्त उजवे ठरत नाही का?

एखादा निर्माता मोठय़ा अभिनेत्याला खुश करायला त्याच्या मुलगा किंवा मुलीला लाँच करेल, पण जर तो सिनेमा सपशेल आपटला आणि निर्मात्याचे नुकसान झाले तर पुन्हा त्याच अपयशी स्टार पुत्राला घ्यायला तो निर्माता नक्कीच खुळा नसणार? शेवटी सिनेमा उद्योग हा एक व्यवसाय आहे. इथे चढते सूरज को सब सलाम करते है… त्यामुळे हे जे नेपो किड्स आहेत यांना पटकन एखाद्या चित्रपटात काम मिळेल, पण शेवटी तो/ती सिनेप्रेक्षकांच्या पसंतीला उतरले नाहीत किंवा अभिनयात कमी पडले तर पब्लिक सरळ बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवतात. स्पर्धा इतकी आहे की कुवत नसलेल्या लोकांसाठी या क्षेत्रात जागाच नाही.

बरं, हे नेपोटिझम सगळ्या क्षेत्रात आढळतं. सुनील गावसकर आपल्या देशातच नाही तर जगभरातून नाव कमावलेले ािढकेटपटू! रोहन गावसकर त्यांचा मुलगा. गावसकर आडनावाच्या वलयाचा फायदा घेत रोहन काही सामने खेळला, पण जेव्हा वडिलांशी तुलना व्हायला लागली आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत बोंबाबोंब सुरू झाली तसं रोहन गावसकर कोणत्या स्टेशनवर उतरून गेला हे कळलंच नाही. प्रत्येक ािढकेटपटूचा मुलगा ािढकेटपटू झाला पाहिजे किंवा प्रत्येक अभिनेत्याचा मुलगा/मुलगी अॅक्टर झालेच पाहिजे हा आग्रह वा हट्ट कशाला? उद्योग-व्यवसायातसुद्धा आपल्याला ही नेपो किड्स पाहायला मिळतात. मेरिटवर काम मिळणं हे ध्येय असलं पाहिजे. पण आपल्याकडे गादीला फार महत्त्व दिलं जातं. झाडून सगळ्याच क्षेत्रात. यावरून एक गोष्ट स्पष्टपणे कळते की, बाहेरून आलेल्या कलाकारांना जो संघर्ष करावा लागतो तो या नेपोकिड्सना करावा लागत नाही. त्यामुळे जेव्हा एखादा संघर्ष करणारा कलाकार त्याच्या डोळ्यांदेखत आपल्यापेक्षा कमी कुवतीचा असूनही एखाद्या स्टार पुत्राला प्राधान्य दिलं जातंय हे बघतो तेव्हा त्या बिचाऱयाला कसं वाटत असेल याचा विचार न केलेलाच बरा. सर्व क्षेत्रात नेपोटिझमच्या दुर्दैवी वास्तवाला सामोरं जावं लागतं. निदान आपल्या देशात तरी हे आपल्याच प्रारब्धाचे भोग असावे असं नाही का वाटत? तुम्हीच ठरवा!!

[email protected] 

(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)