आभाळमाया – अंतराळी साहसवीर!

>> वैश्विक, [email protected]

आपण पृथ्वीवरची प्रगत माणसं अंतराळात कुठेतरी आपल्यासारखं कोणीतरी आहे का? याच्या कल्पना करीत असतो. त्यावर हॉलीवूड, बॉलीवूडचे सिनेमे निघतात. 1938 च्या एका काल्पनिक रेडिओ प्रसारणाची गोष्ट तर जगाला ठाऊकच आहे. त्यामध्ये रंजकता असली तरी विज्ञान अभावानेच आढळते. असलेच तर ‘फिल्ममेकिंग’चे प्रगत तंत्र. मात्र अशाच काही कल्पना करता करता एखादी वैज्ञानिक गोष्टही सुचते. शेवटी सखोल विचार हाच महत्त्वाचा. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत एलिव्हेटर किंवा ‘लिफ्ट’ असावी किंवा एका अति उंच टॉवरवरून उपग्रह थेटच अंतराळात सोडावा अशीही दिवास्वप्नं आहेतच. त्यातूनच एखाद्याला वजनाने हलका, परंतु अतिशय कणखर असा धातू शोधण्याची स्फूर्ती मात्र मिळू शकते.

1957 मध्ये गेलेला रशियाचा स्पुतनिक-1, त्यानंतर तर 1961 मध्ये युरी गागारिन यांचा पहिला मानव म्हणून झालेली अंतराळ यात्रा. यातून आणि 1969 मध्ये माणूस चंद्रावर गेल्यावर तर आता अंतराळ जणू कवेत आलं असा आत्मविश्वास व्यक्त केला जाऊ लागला. अर्थात विश्वातील असंख्य रहस्ये अज्ञातच आहेत हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि संशोधन त्या दिशेला वळले. मंगळावर प्रगत वस्ती वगैरे काहीच नसल्याने आणि इतर ग्रहांवर असण्याची शक्यताच नसल्याने रेडिओ, गॅमा-रे टेलिस्कोपद्वारे दूरस्थ अंतराळाचा वेध घेतला जाऊ लागला. त्यातूनच 16 नोव्हेंबर 1974 रोजी आपण ऑरिसिबो येथील रेडिओ टेलिस्कोपद्वारा हर्क्युलस-एम-13 या म्हणजेच शौरी या बंदिस्त तारकासमूहाच्या दिशेने फिक्सेलमधून उलगडणारी मानवी आकृती पाठवून एक संदेश पाठवला. तिथे कोणी असले आणि ‘त्यांना’ तो संदेश डी-कोड करता आला तर आपला त्यांचा संपर्क होऊ शकेल. या एकूण संदेशवहनाला सुमारे 44 हजार वर्षे लागतील!

ती गोष्ट पार पुढची. पण माणूस अंतराळात गेल्यावर तिथून पृथ्वीवरच्या वैज्ञानिकांशी किंवा त्या त्या राष्ट्राच्या प्रमुखांशी संवाद साधण्याइतकी प्रगती अंतराळी संवादात लवकरच झाली. प्रकाशकिरण निर्वात पोकळीत सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने प्रवास करतात. ध्वनीच्या प्रवासाला मात्र माध्यम लागतं. हवा, धातू अशा माध्यमांतून ध्वनी लहरींचा प्रवास होतो. पृथ्वीवर बिनतारी संदेशवहनही होतं. त्याच तत्त्वावर रेडिओ, टीव्ही, मोबाईल चालतात. परंतु अंतराळात माध्यमच नसते.

वातावरणा पलीकडच्या निर्वात पोकळीत अतिशय सूक्ष्म माध्यमात ध्वनी इकडून तिकडे जाऊ शकत नाही. मात्र मॅक्सवेल यांनी इलेक्ट्रोमॅग्नॅटिक किंवा विद्युत चुंबकीय लहरींचा शोध लावल्यानंतर निर्वात पोकळीतूनही संवाद साधणं शक्य आहे याची कल्पना अंतराळ वैज्ञानिकांना होतीच. त्याप्रमाणे अंतराळ यानातील व्यक्तीचे बोलणे विद्युत चुंबकीय संदेशात रूपांतरित करून त्याचं पुन्हा ध्वनीमध्ये रूपांतर करून संभाषण करता येते. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतरचे ‘मानतेच्या दृष्टीने मोठे पाऊल’ हे शब्द पृथ्वीवर आले. त्यापूर्वी 18 एप्रिल 1961 रोजी गागारिन यांचे ‘निळी पृथ्वी किती विलोभनीय आहे’ अशा आशयाचे उद्गार तर पहिल्या महिला अंतराळ यात्री व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा आवाजही पृथ्वीवर पोहोचला.

3 एप्रिल 1984 रोजी आपले पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला. इंदिराजींनी त्यांना विचारलं ‘भारत पैसा दिखता है आपको?’ त्यावर शर्मा उत्तरले ‘बगैर किसी झिझक के साथ कह सकता हूं की, सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा.’

या सगळय़ाची आठवण आली ती सध्या ‘स्टारलाइनर’ नावाच्या अंतराळकुपीतून अवकाशातील स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बॅरी बिल्मोर यांनी साधलेल्या आश्वासक संवादामुळे स्टारलाइनर-1 मधून अवघ्या आठवडाभरासाठी स्पेस स्टेशनवर पृथ्वीपासून 300 कि.मी. अंतरावरील अंतराळात गेल्यावर काही प्रयोग करून त्यांना परत यायचं होतं. पण स्टारलाइनरच्या ‘थ्रस्टर्स’मध्ये (धक्का देणारे बूस्टर) बिघाड झाल्याने हा लेख लिहीपर्यंत दोघे तिथेच आहेत. त्यानंतर पृथ्वीवरच्या ‘मीडिया’ला खाद्यच मिळाले. स्टारलाइनर उड्डाणाच्या वेळीच बिघडलं होते का? इथपासून आता सुनीता आणि बॅरी कसे परतणार? त्याचा काही पर्यायी विचार झालाय का? याची अफाट चर्चा सुरू झाली.

या दोन्ही अंतराळ यात्रींनी स्पेस स्टेशनवरून साधलेला संवाद पाहिला आणि त्यांच्या धैर्याचे कौतुक नि आदर वाटला. सुनीता विल्यम्स पूर्वीही अंतराळ स्थानकात राहून आलेल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘इथे पुन्हा येताच, घरी परतल्यासारखे वाटले. आम्ही मजेत आहोत. थ्रस्टर्स समस्येची तपासणी सुरू आहे. त्यावर तोडगा निघेलच. सर्व प्रोसेसिंग सिस्टिम उत्तम चाललीय. मी जेनेटिक सिक्वेन्सिंग, मून मायक्रोस्कोप अशा प्रयोगांमध्ये व्यस्त आहे,’’ तर बॅरी यांनी म्हटले की, ‘‘मी स्पेस स्टेशनवर पहिल्यांदाच आलोय. अंतराळ प्रवास ही कठीण गोष्ट (टफ बिझनेस) असतेच. आमच्या स्टारलाइनरची अंतराळस्थानाशी 5 अंशाच्या कोनातून यशस्वी जुळणी झाली आणि आम्ही इथे वैज्ञानिक प्रयोग करत आहोत. पुढे सगळं व्यवस्थित होऊन आम्ही पृथ्वीवर परत येऊ.’’

त्यांचे हे शब्द ऐकून भरून आले. अतिशय कठीण अशा प्रसंगात त्यांनी साहसी कृती आणि उत्साह तसाच जपलाय. हे वैज्ञानिक साहसवीरच आहेत. ते सुखरूप घरी (पृथ्वीवर) यावेत यासाठी सदिच्छा व्यक्त करू या.