वेब न्यूज – हसत खेळत घटस्फोट

>> स्पायडरमॅन

यात्रा कंपन्यांचे विशेष ‘हनीमून पॅकेज’ किंवा पर्यटनस्थळांवर मोठमोठ्या हॉटेलांकडून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास हनीमून रूम्स किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी केलेली विशेष व्यवस्था आपण कायम बघत असतो. आजकाल तर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पत्रिका छापण्यापासून ते लग्नासाठी कार्यालय बुक करणे, भटजींची व्यवस्था, खानपानाची व्यवस्था, अगदी पाहुण्यांना नेण्याआणण्याची, सजावट करण्याची सगळ्याची जबाबदारी घेतात. लग्नाचे संपूर्ण पॅकेज तुम्हाला पुरवतात. विचार करा, असे कोणी घटस्फोटाचे पॅकेजदेखील पुरवायला लागले तर? घटस्फोट ही आयुष्यातील एक दुःखद घटना असते. अनेकदा घटस्फोट मिळण्यासाठी वर्ष वर्ष वाट बघावी लागते. अनेकदा आर्थिक आणि मानसिक त्रासातूनदेखील जावे लागते. घटस्फोटाचा हा कालावधी संयमाची परीक्षा बघणारा असतो. आता अशा एकमेकांपासून घटस्फोट घेण्यासाठी तयार असलेल्या जोडप्यांसाठी नेदरलॅंडचा व्यापारी असलेल्या जिम हाफेन्स याने एक योजना सादर केली आहे. त्याने नेदरलॅंडमध्ये The Separation Inn नावाचे हॉटेल उघडले आहे. घटस्फोट अधिक सुकर होण्यासाठी, त्याची प्रोसेस सुरळीत होण्याची इथे मदत पुरवली जाते. शुक्रवारी हॉटेलमध्ये यायचे आणि रविवारी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करून मोकळे व्हायचे. घटस्फोट घेण्यास उत्सुक असलेल्या जोडप्याने तीन दिवसांसाठी The Separation Inn मध्ये मुक्काम करायचा आहे. इथे या जोडप्याला कायदेशीर सल्लागार, मानसिक आधारासाठी मनोचिकित्सक, मेडिटेशन अशा सर्व सुविधा पुरवल्या जातील. घटस्फोटाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, या प्रक्रियेत काही मानसिक ताण आल्यास त्वरित मदत मिळावी आणि मुख्य म्हणजे या संपूर्ण कालावधीत तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहावे याची इथे काळजी घेतली जाणार आहे. 10 ते 15 हजार डॉलर्समध्ये मिळणाऱ्या या संपूर्ण सेवेचा लाभ आतापर्यंत 17 जोडप्यांनी घेतला असून त्यातील 16 जोडप्यांनी समाधानाने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्णदेखील केली आहे. सध्या जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या या हॉटेल्सच्या शाखा जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये उघडण्याचा जिमचा मानस आहे.