गुलदस्ता- ऋणानुबंधातील लोभस मैत्री

>> अनिल हर्डीकर

पहिल्या भेटीचं महत्त्व आगळंच. संगीतकार राम फाटक यांची सुधीर फडके, गदिमा यांच्याशी अगदी सहज म्हणून अल्पावधीत भेट घडली आणि या तिघांनीही मैत्रीच्या ऋणानुबंधातली लोभस नातं कायम टिकवून ठेवलं.

गीत रामायण म्हटलं की, मराठी माणसाच्या डोळ्यांसमोर दोन नावं येतात ती म्हणजे सुधीर फडके अर्थात बाबुजी आणि गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर. या दोघांना अल्पशा कालावधीत भेटण्याचा योग आला होता एका गुणी संगीतकाराला, ज्याचं नाव होतं राम फाटक. ‘माझी स्वरयात्रा’ या पुस्तकात त्यांनी त्या दोघांच्या भेटीचं मोठं रसाळ वर्णन केलं आहे.

राम फाटक यांनी मोजकी गाणी केली असली तरी त्यांनी स्वरबद्ध केलेल्या काही गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. उदाहरणार्थ, ‘आता कोठे धावे मन’, ‘माझा भाव तुझे चरणी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘सती तू दिव्या रूप मैथिली’, ‘उर्मिले त्रिवार वंदन तुला’, ‘अमृताच्या गूढ गर्भी’, ‘डाव मोडू नको’, ‘सगुणाची सेज’, ‘निर्गुणाची बाज’, ‘सूर लागता लागता’, ‘विठ्ठल गीती गावे’, ‘काया ही पंढरी’, ‘इंद्रायणी काठी’, ‘तीर्थ विठ्ठल’, ‘क्षेत्र विठ्ठल’, ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा…’

राम फाटक यांनी गाणे हे उपजीविकेचे साधन करायचे नाही हे ठरवले असताना छोटी-मोठी संधी आली तर ते सोडत नसत. मात्र जेवढं साधेल त्यात आनंद मानण्याची त्यांची वृत्ती होती. साहजिकच त्यांचं गाणं प्रगतिपथावर होतं. समारंभातून, मैफलीतून, नाटकातून, आकाशवाणीवरून त्यांनी सादर केलेल्या संगीताला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. फार मोठी नाही तरी एकंदरीत महत्त्वाकांक्षा चाळवायला लागली होती. रामभाऊंच्या लहानपणी त्यांना लाभलेले गुरुजी तात्या रानडे त्यांची प्रगती पाहत होते. कौतुक करीत होते. रामभाऊंच्या मनात आलं की, आपल्याही ध्वनिमुद्रिका निघायला काय हरकत आहे. रामभाऊंनी आपला मनोदय तात्यांना बोलून दाखवला. ते म्हणाले, “महिन्याभरानंतर मी रेकॉर्डिंग करायला एचएमव्हीवर जाणार आहे. तिथे तुझी एचएमव्हीवरच्या जी. एन. जोशी यांच्याशी गाठ घालून देतो.’’ रामभाऊ तात्यांबरोबर मुंबईला गेले. तात्यांचे बर्वे म्हणून एक मित्र आंग्रेवाडीत राहत. त्यांच्याकडे उतरले.

दुसऱया दिवशी सकाळी 9 वाजता एक छोटेखानी बांध्याचा तरुण तात्यांची चौकशी करत आला. जाड धाग्याच्या कापडाची पांढरी पँट, त्याच कापडाचा कोट आणि शर्ट अशी त्याची वेशभूषा होती. दिसायला चारचौघांसारखा असला तरी चेहऱयावर तरतरी आणि आत्मविश्वास दिसत होता. तात्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि रामभाऊंची ओळख करून देताना म्हणाले, “हे सुधीर फडके. चांगल्या चाली बांधतात. हिराबाईंच्या ‘नंदलाल हास रे, नाच रे ब्रिजलाला’ या गाण्याची चाल यांचीच.’’ नमस्कार चमत्कार झाल्यावर सुधीर फडके यांनी तात्यांना काही चाली ऐकवल्या. सगळ्या भावगीत प्रकारातल्या.

फडके यांनी त्या दिवशी कविवर्य राजा बढे यांचे एक भावगीत ऐकवलं. ‘जाहल्या ताटातुटी काळीज माझे हे तुटे, सोसवेना हे जिणे ग तू कुठे अन् मी कुठे.’ जरी पहिल्या भेटीत ‘जाहल्या ताटातुटी’ हे गाणं सुधीर फडके गायले होते तरी रामभाऊ आणि सुधीर फडके नंतर मात्र जन्मभराचे स्नेही झाले. सुधीर फडके यांची लोकसंग्रहाची हौस आणि हातोटी अशी की, प्रथम भेटीतच रामभाऊंना घरी येण्याचं निमंत्रण दिलं. रामभाऊदेखील माणूसप्रेमी. ते त्यांच्या विनंतीला मान देऊन मुंबईच्या अग्निशमन केंद्रात जिथे सुधीर फडके त्यांचे थोरले बंधू नाना फडके यांच्या घरी राहत तिथे गेले. योग इतका चांगला की, सुधीर फडके घरी होते. ब्लॉकच्या पुढे मोठी मोकळी बाल्कनी होती. बाल्कनीत एक सुंभाने विणलेली बाज टाकलेली होती. त्यावर सतरंजी अंथरून सुधीर फडके आणि त्यांचे एक काळे जाडगेलेसे मित्र असे दोघे बसले होते. त्यांच्या वजनामुळे बाजेला खोलगा पडला होता आणि सतरंजी आकसली होती. सुधीर फडके यांनी रामभाऊंचे स्वागत केले आणि आपल्या मित्राची ओळख करून देताना म्हणाले, “हे ग. दि. माडगूळकर. उत्तम कवी आणि साहित्यिक आहेत.’’ आयुष्यात पुढे राम फाटक यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुधीर फडके यांनी अनेक गीते गायली. ज्याप्रमाणे एखादा वणवा पेटण्यासाठी प्रथम ठिणगी पडावी लागते तसं असतं पहिल्या भेटीचं महत्त्व!

[email protected]