प्रयोगानुभव- ‘पुलकित’ तरुणाईचा जल्लोष

>> पराग खोत

पुलंच्या सोबतीने महाराष्ट्राच्या आवडत्या नाटक, संगीत आणि कविता या कला प्रकारांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा सर्जनशील प्रयोग म्हणजे ‘मुशाफिरी!’ विविध कलांचा कोलाज करीत पुलंच्या लेखणीची जादू जागवत तरुण रंगकर्मींनी पुलंना दिलेली ही मानवंदनाच.

‘पु.ल. देशपांडे’ या नावाची मोहिनी महाराष्ट्राच्या मनमनावर आहे. साहित्य, नाटक, सिनेमा, संगीत अशा कलेच्या सर्वच क्षेत्रांत मुशाफिरी केलेल्या पुलंचा चाहता वर्ग अजूनही टिकून आहे. मात्र नव्या सहस्रकात बरंच काही बदललं. नव्या पिढय़ा आल्या आणि त्यांना `Millennial’, `Gen Z’ अशी नावं आली. अर्थातच या सगळ्या पिढय़ांचा जुन्या कसदार साहित्याशी संपर्क तुटला. ‘मराठी पुस्तकं कोण वाचतंय?’ पासून ‘मुळात पुस्तकच कोण वाचतंय?’चा प्रवास या पिढय़ांनी पाहिला. या सगळ्याला आपणही जबाबदार आहोत ही रुखरुख घेऊन काही मनं वावरत होती. मनोरंजनाची नवी माध्यमं आली. त्यामुळे जुनं टिकवून ठेवण्यासाठीचा आटापिटा वाढला. ते साहित्य, ती नाटकं आणि ती वाचन संस्कृती आता पुढे नेणार कोण? संवेदनशील मनांना डाचत असलेल्या या प्रश्नाला मधूनच येणाऱया काही सर्जनशील प्रयोगांनी उभारी येई, पण जुन्या-नव्याचे ते मनोमीलन मनासारखे होत नव्हते. अशातच शीतल वाऱयाची एखादी सुखद झुळूक यावी तसं आलेलं हे नाटक ‘मुशाफिरी!’

हे नाटक नाही, सांगीतिक कार्यक्रम पण नाही आणि मुक्त-नाटय़सुद्धा नाही. याला एक फॉर्म असला तरी तो विविध कलांचा कोलाज आहे. फँटसीचा आधार घेत, पुलंच्या लेखणीची जादू जागवत तरुण रंगकर्मींनी पुलंना दिलेली ही मानवंदना आहे असं म्हणता येईल. यात लेखकापासून कलाकारांपर्यंत आणि निर्माते, दिग्दर्शकापासून बॅकस्टेजपर्यंत सगळेच `millennials’ किंवा `Gen Z’ असल्यामुळे असेल कदाचित, पण प्रयोग सळसळत्या ऊर्जेने भारलेला आहे.

चित्रगुप्ताच्या दरबारातून पु.ल. गायब झाल्याची बातमी स्वर्गात सर्वत्र पसरते या भन्नाट कल्पनेनेच नाटकाचा (?) प्रारंभ होतो. त्यांचा शोध घेत असताना समजतं की, ते पृथ्वीवर आले आहेत. ते पृथ्वीवर अवतरतात आणि निघतात मुशाफिरीला, आपल्या सर्वांनाच घेऊन. त्यांच्या सोबत असतात त्यांनीच निर्माण केलेली एकापेक्षा एक अफलातून पात्रं. आपल्या त्या लाडक्या पात्रांच्या इच्छेनुसार आणि प्रेक्षकांच्या साक्षीने ते महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचा धांडोळा घेतात आणि हा कार्यक्रम उलगडत जातो. संगीत, नाटक आणि कविता हे पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन पैलू वेगवेगळ्या कला प्रकारांतून मांडले जातात. यात पारंपरिक भारूड, बतावणी आणि लावणीसोबतच संगीत नाटक, भावगीतं, नाटय़ प्रवेश अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यातलं काही साहित्य पुलंचं आहे, तर काही इतर नामांकितांचंसुद्धा आहे. उदाहरणार्थ, गडकरी मास्तरांच्या ‘एकच प्याला’मधलं त्यांचं सुप्रसिद्ध स्वगत इथे आहे. पु.ल. स्वत आपल्याला या कलांची ओळख करून देतात आणि आपल्या समवेत या सगळ्यांचा आस्वादही घेतात. त्यांच्या साहित्यातली त्यांनीच निर्मिलेली पात्रंही या मुशाफिरीत त्यांची सोबत करतात. त्यात अंतू बर्वा, बबडू, रावसाहेब, नाथा कामत, हरीतात्या, सखाराम गटणे, पेस्तनकाका आदी मंडळी आपल्याला पुलंसोबत संवाद साधताना दिसतात.

लेखक-दिग्दर्शक-निर्मात्यांनी एका वेगळ्या धाटणीचा प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. एक नाटय़ रसिक म्हणून आपण त्याला दाद द्यायला हवी. पण त्यात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. संबंधितांनी त्यावर विचार करून त्यात सुधारणा करायला हवी. एकतर ही सर्व पात्रं आपल्या भूमिका एस्टॅब्लिश करण्यासाठी टिपेचा सूर लावतात. त्यांच्यातील सहजता कुठेतरी हरवते. तसंच सगळेच रंगकर्मी तरुण असल्याने त्यांना त्या पात्रांच्या वयानुसार दिसण्यासाठी रंगभूषाकाराने आपलं कौशल्य पणाला लावायला हवं, पण ते न झाल्याने ती तरुणच दिसतात. अंतू बर्वा आणि पेस्तनकाका थोडे कर्कश होतात, तर नाथा कामत आणि बबडू तितके प्रभावी होत नाहीत. ही सगळी पात्रे वेगवेगळ्या नाटकांतून याआधीही रंगमंचावर येऊन गेल्यामुळे आणि ती प्रथितयश नट मंडळींनी साकार केलेली असल्याने त्यांची तुलना होत राहते. ती पात्रं अजून जिवंत आणि अस्सल करण्याचं आव्हान या नव्या नटांसमोर आहे. नेपथ्य अजून सुबक आणि आकर्षक करता येऊ शकेल. पुलंच्या ‘सिनेमा’ या मोठय़ा पैलूचा अंतर्भाव व्हायला हवा. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी घ्यायला हरकत नव्हती. तसंच एका बाजूला पुलंचा हा साहित्य प्रवास मांडत असताना इतर कला प्रांतात सुरू असलेली त्यांची मुशाफिरी ही ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाची आठवण करून देणारी आहे. त्यातही ‘मराठी बाणा’ची भव्यता इथे नसल्याने पुन्हा नकारात्मक तुलना होते. या बाबींवर विचार करून लेखक, दिग्दर्शकांनी काही सुधारणा केल्यास प्रयोग अधिक नेटका होईल असं वाटतं.

लेखिका ईश्वरी अतुल आणि दिग्दर्शक ऋग्वेद फडके यांनी प्रयोगाची बांधणी छान केली आहे. स्वत ऋग्वेद फडके पुलंचं बेअरिंग उत्तम सांभाळतात. त्यांनी आवाजातूनही पु.ल. छान दाखवले आहेत. फक्त बोलताना हाताने चष्मा सरळ करण्याची लकब थोडी कमी करायला हवी. पुलंच्या पात्रांच्या भूमिकांत स्वानंद केतकर, ऋषीकेश धामापूरकर आणि रंजन प्रजापती यांनी जीव ओतून काम केलं आहे. रंजन प्रजापती या अमराठी कलावंताने सादर केलेला तळीराम लक्षात राहील असा आहे, तर ऋषीकेशने सादर केलेलं भ्रमण मंडळ फर्मास. त्याच्या शारीरिक हालचाली आणि आवाजातील बदल दाद देण्याजोगे. ओंकार प्रभुघाटे, मयूर सुकाळे, रोहन देशमुख आणि श्रद्धा वैद्य या प्रेक्षकांना परिचित असलेल्या प्रतिभाशाली कलाकारांनी गायनाची बाजू उत्तम सांभाळली आहे, तर अक्षता आपटे हिने संगीत नाटकातील प्रवेश आणि कविता सादरीकरणात छान साथ दिलीय. आकांक्षा अशोक हिचा वेगळा उल्लेख करावा लागेल अशी लक्षवेधी कामगिरी ती करून जाते. भारुडातील बुरगुंडा देणारी स्त्राr, बतावणीमधली प्रमुख व्यक्तिरेखा, तर लावणीतील नृत्य बिजली या तीनही भूमिका तिने आपल्या अभिनय आणि अफाट नृत्य कौशल्याने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. मधुरा राऊत आणि इतर दोन सहकलाकारांनी तिला नृत्यात उत्तम साथ दिलीय.

प्रत्यक्ष पुलंच्या सोबतीने महाराष्ट्राच्या आवडत्या नाटक, संगीत आणि कविता या कला प्रकारांचा वेध घेण्याचा हा एक वेगळा प्रयत्न आहे. पुण्यात याचे काही प्रयोग झाल्यानंतर दिव्येश बापट या तरुण निर्मात्याने ऋग्वेद फडके आणि स्वानंद केतकर या मूळ निर्मात्यांसोबत सहभागी होऊन आता मुंबईत त्याचे प्रयोग सुरू केले आहेत. तुमच्या जवळच्या नाटय़गृहात त्याचा प्रयोग असेल तेव्हा पुलंच्या आठवणी जागवणाऱया या उत्साही आणि तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य जा. मराठी साहित्य आणि कलेची जुनी लेणी जपून ती आजच्या नव्या पिढीपुढे आणण्याचं महत्त्वाचं काम ही मंडळी करताहेत आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

n [email protected]