>> सुनील पुवरे
देशातील बहुतेक प्रमुख शहरे प्रदूषण आणि खराब हवेमुळे गुदमरून गेली आहेत. ढगाळ वातावरणामुळे उदासवाणे वाटू लागले आहे. सर्वत्र प्रदूषित हवेचे स्तर तरंगत आहेत. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमधील एक्यूआय या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणाऱया संस्थेने 2023 च्या अहवालात म्हटले होते की, हवेच्या प्रदूषणामध्ये भारत जगात तिसरा आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात प्रदूषित जी 59 शहरे आहेत, त्यामध्ये भारतातील 42 शहरांचा समावेश होता. प्रदूषणात पहिल्या नंबरवर देशाची राजधानी दिल्ली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद ठेवाव्या लागतात. दरवर्षी हिवाळा सुरू झाला की, दिल्लीच्या खालावलेल्या हवेची चर्चा सुरू होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे प्रदूषण आणि खराब हवामानाच्या विळख्यात सापडले आहे. मुंबईच नव्हे तर राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरांनाही प्रदूषणाचा धोका वाढला आहे. नवीन शहरे प्रदूषणाच्या विळख्यात येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. सामान्यतः उन्हाळ्यात प्रदूषण वाढते असे म्हटले जाते, परंतु अलीकडे हिवाळ्यात प्रदूषण वाढत आहे. हिवाळ्यात डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने हवेतील प्रदूषणाला प्रचंड पोषक असतात. हिवाळ्यातच अशा प्रकारचे प्रदूषण म्हणजे हवा बिघडलेली आहे. यामुळे प्रदूषण आणि हवा आरोग्यास हानीकारक ठरत आहे. देशामध्ये दरवर्षी लाखो माणसे प्रदूषणाने बळी पडतात.
मुंबईच्या हवा प्रदूषण पातळीची रोज जी आकडेवारी प्रसारित होते ती घाबरवून टाकणारी आहे. मुंबईतील हवा अतिशय वाईट असून ही हवा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरून जातोय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 50 असेल तर हवा चांगली व 100 असेल तर ती हवा सर्वसाधारण मानली जाते. जेथे हवेची गुणवत्ता 200 च्यावर आहे तेथील हवा ही आरोग्यास हानीकारक समजली जाते. मुंबईत बोरिवली, माझगाव, भायखळा आदी भागांतील हवेची गुणवत्ता वाईट गणली गेली आहे. प्रदूषण आणि वाईट हवेमुळे नागरिकांना खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे लोक महापालिका दवाखान्यात आणि डॉक्टरांकडे जाऊ लागले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणात वाढ झाल्याने प्रदूषण रोखण्यासाठी काही भागांतील सुरू असलेल्या बांधकामांवर निर्बंध घातले आहेत. तसेच ज्या विभागात हवेचा निर्देशांक 200 च्या वर जाईल तेथीलसुद्धा बांधकामे बंद करणार. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा सरासरी दीडशेच्या पुढे असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्देशांकही आरोग्याला घातक आहे असे म्हटले आहे. महापालिकेने निर्बंध घातले म्हणून प्रदूषण कमी होणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय केले पाहिजेत.
सध्या मुंबईत धुरक्याचे प्रमाण वाढते आहे. शहरीकरण तसेच मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, रस्त्यावरून वाहणारी वाहने व त्यातून बाहेर पडणारा धूर यामुळे मुंबईच्या हवेवर परिणाम होतो असे तज्ञांनी म्हटले आहे. मागील काही दिवसांत मुंबई महापालिकेने जवळपास 900 बांधकाम ठिकाणांची पाहणी केली. त्या वेळी नियम मोडणाऱ्या 28 विकासकांवर कारवाई केली, पण ही कारवाई तात्पुरती असता कामा नये. तेव्हा राजधानीप्रमाणे मुंबईची हवा प्रदूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ सतर्प आहे. प्रदूषण मंडळाने हवा तपासणीसाठी विविध भागांत यंत्रे बसविली आहेत. मुंबई महापालिकेने ‘वातावरण कृती आराखडा’ तयार करून एक चांगले पाऊल उचलले आहे, पण कृती आराखडा कागदावर न राहता प्रत्यक्षात पृतीत आणला जावा. तसेच हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेवटी प्रदूषण हा लोकांच्या आरोग्याशी निगडित विषय आहे आणि त्यांच्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.
एकीकडे राज्य सरकार म्हणते आता महाराष्ट्र थांबणार नाही, परंतु मनुष्य निरोगी राहण्यासाठी मुंबई आणि राज्यातील इतर शहरांतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत. विकास साधत असतानाच दुसरीकडे हवेच्या प्रदूषणाची पातळी कमीत कमी कशी राहील याची दक्षता आगामी काळात सरकारलाच घ्यावी लागणार आहे. कारण प्रदूषण आणि पर्यावरणाचा हा प्रश्न जनतेच्या आरोग्याशी निगडित असल्याने किंबहुना हा लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे.