मुद्दा – वायुप्रदूषणाच्या विळख्यात मुंबई महानगर 

>> केतन दत्ताराम भोज   

एकीकडे राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. मुंबईची हवा केव्हा बिघडेल वा सुधारेल, हे सांगणे तसे कठीणच. मुंबईतील अनेक भागातील हवेच्या गुणवत्तेने 200 AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) ओलांडला असून ही चिंतेची बाब ठरते आहे. तज्ञांच्या मते, प्रदूषणासाठी वाहनं, सततची बांधकामं आणि पंपन्याच जबाबदार असून त्यासह तापमानात होणारी घट आणि त्यामुळे प्रदूषणाचे कण वातावरणात कायम राहात असल्याचंही कारण सांगण्यात आलं आहे. हल्ली सर्वच ठिकाणी हवामानाबदल मोठय़ा प्रमाणात प्रदूषण जाणवायला लागले आहे. त्यामुळे केव्हाही पाऊस, वादळे, रोगप्रादुर्भाव इत्यादी संकटे उद्भवत असतात. हा बदल खरे म्हणजे मानवी कृत्यांमुळे घडतो आहे. शहराची हवा शुद्ध असेल, तर नागरिकांचे आरोग्य सुधारते. हवा अशुद्ध राहिली तर आरोग्य नक्की बिघडते. हवा प्रदूषित होते ती 90 टक्के मानवनिर्मित कारणांमुळेच. त्यामुळे आपले आरोग्य सांभाळण्याकरिता हे प्रदूषण सर्वांनी हातभार लावून कमी केले पाहिजे. मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत चालली असून प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आतापासून ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मुंबईची हवा आणि आरोग्य दोन्ही बिघडणार, याचे संकेत मिळत आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरात काही लोकांना डोळ्यांची जळजळ होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. अनेकांनी या तक्रारी केल्या आहेत. या सर्व समस्यांनंतर वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या उपाययोजना प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याऐवजी कागदोपत्रीच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाचे विकार झपाट्याने पसरत आहेत. मुंबईतील हवा अशुद्ध होण्यामागे मुख्य कारण बांधकामे. मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू शर्यतच लागली आहे. मुंबईत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींच्या बांधकामासाठी परवानगी दिली जाते ती मुंबई महापालिका प्रशासनाकडून. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला मुंबई महापालिका प्रशासनच कारणीभूत आहे, असा आरोप पर्यावरण तज्ञांनी केला. मुंबईतील अनेक भागात बांधकाम सुरू असून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जाते, याची माहिती विभागीय कार्यालयांना असणे स्वाभाविक आहे. तरीही वर्षानुवर्षे कारवाईचा फक्त इशारा दिला जातो, प्रत्यक्ष कारवाई कागदावरच होत असल्याने मुंबईला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

प्रदूषणामुळे निर्माण होणारे आजार मुंबईच्या आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे करदात्या मुंबईकरांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करत धूळमुक्त मुंबई यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. हिवाळ्यातील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे, कर्करोग, श्वसननलिकेला सूज, दम लागणे असे विकार, समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध व इतर व्याधी असलेल्या लोकांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी व बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी, असे सल्ले तज्ञांनी दिले असून याचे काटेकोर पालन करणे हेच सध्या आपल्या हातात आहे.